

आशिष शिंदे
घरात लहान बाळाचे आगमन होताच कुटुंबातील आनंदाला उधाण येते खरे; पण त्यासोबतच नव्या आई-वडिलांच्या उडालेल्या झोपेची आणि धाकधुकीच्या अस्वस्थ रात्रींची एक अखंड मालिका सुरू होते. मध्यरात्री गाढ झोपेतून दचकून उठणे, बाळ व्यवस्थित श्वास घेते आहे ना, हे पाहण्यासाठी त्याच्या नाकाजवळ हळूच बोट नेणे, पांघरूण तोंडावर तर गेले नाही ना, याची पुन्हा पुन्हा खात्री करणे हा प्रत्येक पालकाच्या जगण्याचा एक अपरिहार्य आणि मानसिक तणावाचा भाग बनतो. पारंपरिक पाळण्यांनी बाळाला केवळ झोपवण्यासाठी सुरक्षित जागा दिली. पण, पालकांच्या मनातील ही अनामिक भीती आणि काळजी दूर करणे कोणत्याही लाकडी वा लोखंडी पाळण्याला कधीच जमले नाही. मात्र, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या झंझावातात आता याच साध्या पाळण्याचे रूपडे पूर्णपणे पालटले असून, तंत्रज्ञानाने थेट बाळाच्या सुरक्षिततेची आणि आरोग्याची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. सध्याच्या गॅजेट वर्ल्डमध्ये आता थेट पाळण्यातच ‘एआय’ अवतरले असून, हा केवळ बाळाला झुलवणारा पारंपरिक पाळणा राहिलेला नाही, तर चोवीस तास त्याच्या प्रत्येक श्वासावर बारीक नजर ठेवणारे एक प्रगत डिजिटल आयसीयू केंद्रच बनला आहे.
या स्मार्ट एआय पाळण्याची खरी ताकद दडली आहे ती यातील प्रगत सेन्सर्सच्या त्रिवेणी संगमात. यामध्ये अत्यंत कमी प्रकाशातही स्पष्ट चित्रण करू शकणारा ४ के फुल कलर कॅमेरा, मिलिमीटर वेव्ह रडार आणि थर्मल इन्फ्रारेड सेन्सर्स बसवण्यात आले आहेत. बाळाच्या अंगाला कोणतेही वायर किंवा उपकरण न लावता, हे सेन्सर्स बाळाच्या हृदयाचे ठोके, श्वसनाचा वेग, शरीराचे तापमान आणि झोपेचा दर्जा यावर अविरत नजर ठेवतात. मध्यरात्रीच्या तीन वाजता बाळ का रडते आहे, याचा अंदाज बांधत बसण्याऐवजी बाळाच्या रडण्याच्या पद्धतीचे विश्लेषण करून पालकांच्या मोबाईलवर थेट अचूक माहिती दिली जाते. झोपेत बाळाचा चेहरा पांघरुणाखाली झाकला गेला किंवा बाळ लोळत जाऊन पाळण्याच्या कठड्याला अगदी खेटून झोपले, तर धोकादायक परिस्थिती निर्माण होण्याआधीच हा पाळणा काही सेकंदांत पालकांच्या मोबाईलवर थेट धोक्याचा अलर्ट पाठवतो.
बाळाच्या शांत झोपेसाठी पाळण्याच्या अंतर्गत वातावरणाचीही चोख काळजी घेण्यात आली आहे. यामध्ये इन बिल्ट ‘निगेटिव्ह आयन एअर प्युरिफायर’ प्रणाली दिली आहे, जी पाळण्याभोवतालची हवा सतत शुद्ध, ताजी आणि जंतूमुक्त ठेवते. शिवाय, बाळ जागे होऊन चुळबुळ करू लागल्यास त्याला शांत करण्यासाठी आणि गोड स्वप्नांत घेऊन जाण्यासाठी यात मंद, कर्णमधुर आणि सुखद आवाजांची विशेष सुविधा आहे. त्यामुळे बाळाला नैसर्गिक आणि निर्धोक झोपेची अनुभूती मिळते.
अवघ्या एका बटणाच्या स्पर्शावर हा संपूर्ण पाळणा एखाद्या सुटकेसप्रमाणे चपखल घडी घालून ठेवता येतो. शिवाय, बाळ जसजसे मोठे होते, तसतशी पाळण्याची उंची आणि कठडे बाळाच्या वाढीनुसार ॲडजस्ट करता येतात. जागतिक गॅजेट प्लॅटफॉर्म्सनुसार या ‘स्मार्ट बेबी क्रिब’ ची किंमत साधारणपणे ३६९ डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात अंदाजे ३४ हजार रुपये आहे. भारतात हा एआय पाळणा अद्याप उपलब्ध नसून, आगामी काळात तो भारतीय बाजारात येईल.