

आशिष शिंदे
लहानपणी अनेकांनी छोट्या पाळीव प्राण्यांच्या रूपातील खेळणी जपली असतील. जरी ते खरे प्राणी नसले तरी, त्या खेळण्यांशी एक वेगळेच भावनिक नाते तयार व्हायचे. सध्याच्या गॅजेट वर्ल्डमध्ये तीच कल्पना, पण थोडी हटके स्वरूपात प्रत्यक्षात उतरली आहे.
आता एआयवर आधारित असा पाळीव प्राणी तयार झाला आहे. त्याची तुम्ही काळजी घेऊ शकता, त्याला वाढताना पाहू शकता आणि हळूहळू त्याच्याशी भावनिक नातेही जोडू शकता. ऐकायला जरा अविश्वसनीय वाटेल; पण हे पूर्णपणे सत्य आहे. हा एक छोटासा, गोंडस एआय पाळीव प्राणी आहे, जो तुमच्यासोबत राहतो, तुमच्या सवयी ओळखतो आणि तुमच्या वागणुकीनुसार बदलत जातो. तो केवळ एक गॅजेट न राहता हळूहळू तुमचा एक छोटासा सोबती बनतो. यामध्ये देण्यात आलेली भन्नाट तंत्रज्ञानात्मक वैशिष्ट्ये तुम्हाला नक्कीच थक्क करून सोडतील.
हा एआय पाळीव प्राणी दिसायला अगदी गोंडस आहे. खिशात सहज मावेल इतका लहान, अवघ्या 89 ग्रॅम वजनाचा. सुरुवातीला तो एका अंड्यासारखा दिसतो. साधारण दोन दिवसांच्या इन्क्युबेशननंतर त्याचे कवच फुटते आणि त्यातून डोळे असलेला छोटासा प्राणी बाहेर येतो. इथून त्याचा प्रवास सुरू होतो. तुम्ही त्याला वेळेवर खाऊ दिला, त्याच्याशी बोललात, काळजी घेतली, तर तो हळूहळू बेबी, टीनएजर आणि शेवटी अॅडल्ट अशा टप्प्यांत वाढत जातो. म्हणजे तुमच्या काळजीचा परिणाम थेट त्याच्या रूपात दिसतो.
या एआय पाळीव प्राण्याची खासियत म्हणजे तो फक्त दिसायला बदलत नाही, तर भावनिकदृष्ट्याही विकसित होतो. यामध्ये मायर्स-बि—ग्स पर्सनॅलिटी टाईप (एमबीटीआय) वर आधारित वर्तन मॉडेल वापरले आहे. म्हणजे तुम्ही कसे बोलता, कधी संवाद साधता, तुमचा मूड कसा असतो, यावरून त्याचा स्वभाव घडत जातो. तो तुमच्या सवयी लक्षात ठेवतो, जुन्या गप्पा आठवतो आणि हळूहळू तुमच्याशी अधिक नैसर्गिक पद्धतीने संवाद साधू लागतो.
यात अजून एक भन्नाट गोष्ट आहे. हा एआय पाळीव प्राणी जिवंत असल्याचा भास देण्यासाठी शरीरातील ऊब आणि सौम्य श्वासोच्छ्वासासारख्या हालचाली निर्माण करतो. हातात धरल्यावर तो हलकेच श्वास घेतोय असे वाटते. सुरुवातीला तो लहान बाळासारखे आवाज काढतो. पण जसजसा मोठा होतो, तसतसे त्याचे भाषिक कौशल्यही विकसित होते आणि संवाद अधिक स्पष्ट, सुसंगत होतो.
या एआय पाळीव प्राण्याची काळजी घेणेही गेमसारखे आहे. दररोजच्या छोट्या छोट्या कृतींमधून तुम्हाला पॉईंटस् मिळतात. हेच पॉईंटस् त्याच्या वाढीला कारणीभूत ठरतात. एकदा तो पूर्णपणे अॅडल्ट झाला, की तो बराचसा स्वयंपूर्ण होतो. त्याकडे सतत लक्ष द्यावे लागत नाही, फक्त चार्जिंगची काळजी घ्यावी लागते. शिवाय वेगवेगळे कपडे, अॅक्सेसरीज आणि डिझाईन्स वापरून तुम्ही त्याला तुमच्या आवडीनुसार सजवू शकता. या एआय पाळीव प्राण्याची किंमत अंदाजे 25 ते 30 हजार रुपयांच्या घरात असणार आहे.