

एखादा निबंध लिहिण्यासाठी विद्यार्थी चॅटजीपीटीचा वापर करतात तेव्हा ते शिकण्याची क्षमता नकळतपणे कमी करतात. विद्यार्थ्यांना त्यांच्या बुद्ध्यांकाचे होणारे नुकसान कळत नाही.
प्रमिला भालके, शिक्षण क्षेत्राच्या अभ्यासक
एआयच्या अतिरेकामुळे मुलांचे केवळ भावनात्मक आरोग्यच नाही, तर त्यांची कल्पनाशक्तीदेखील खुंटण्याची शक्यता आहे. विचार करण्याचा कंटाळा येणे आणि त्यासाठी एआय टुल्सवर अवलंबून राहणे यात मनुष्यप्राणी पारंगत आहे. एखाद्या शहराकडे जाण्याचा रस्ता जीपीएस दाखवू शकतो, तर कागदावरचा नकाशा पाहायचा कशाला? चॅटजीपीटी आणि जेमिनी विचार करण्यासाठी उपलब्ध असतील, तर विचार करण्यात वेळ का दवडायचा? मात्र, जेव्हा शिकण्याचा मुद्दा येतो तेव्हा त्यात विचार करणे अणि मेहनत करणे क्रमप्राप्त ठरते. यातूनच विश्लेषणात्मक विचार करण्याचे कौशल्य विकसित होते. जसे व्यायाम केल्याने शरीर सुडौल होते, तसेच विचार केल्याने मेंदूचा विकास होतो. प्रामुख्याने मानसिक आणि शारीरिक विकास होत असलेल्या वयातील मुलांसाठी ही बाब आवश्यक आहे.
ओपन एआयच्या दाव्यानुसार, चॅटजीपीटीमधील स्टडी मोडची रचना विद्यार्थ्यांची आकलन क्षमता ओळखणारी आहे; मात्र जेव्हा हे टुल्स विद्यार्थ्यांसाठी विचार करण्याचे काम करू लागतात तेव्हा हे टुल्स उपयुक्त ठरत नाहीत. दुर्दैवाने मुले आणि तरुण मंडळीदेखील एआयचा वापर विचार करण्यासाठीच करत आहेत. एखादा निबंध लिहिण्यासाठी किंवा अन्य कामासाठी विद्यार्थी किंवा तरुण चॅटजीपीटीचा वापर करतात तेव्हा ते शिकण्याची क्षमता नकळतपणे कमी करतात.
एमआयटीच्या अभ्यासात लेखन कौशल्यावर एआयचा वाढत्या प्रभावाचे विश्लेषण करण्यात आले. त्यांनी 18 ते 39 वयोगटातील विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या तीन गटांना विभागले. एकाने प्रारंभीपासूनच चॅटजीपीटीची मदत घेतली, दुसऱ्याने स्वत: लिखाण केले; मात्र ते गुगल सर्चचा वापर करू शकत होते आणि तिसऱ्या गटाला कोणत्याच टुलचा वापर करण्यास परवानगी नव्हती. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी चॅटजीपीटीचा वापर करून स्वत:च्या लेखनाला दुरुस्त करण्यास सांगण्यात आले.
ज्या लोकांनी सुरुवातीपासूनच चॅटजीपीटीचा आधार घेतला होता, त्यांचे लेखन सर्वात सुमार असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या विचारशक्तीचे आकलन केले असता त्यांच्यात शिकण्याच्या संबंधित असलेला भाग कमी सक्रिय असल्याचे निदर्शनास आले. परिणामी, त्यांना लेखनात दुरुस्ती करताना अडचणी आल्या. कारण, लेखनाचे काम त्यांनी स्वत: केलेले नव्हते. लेखनाची सुरुवात आणि शेवट कसा झाला आहे, हे विद्यार्थ्यांना ठाऊकच नसल्याने त्यात दुरुस्ती करताना गोंधळ उडाला; मात्र ज्या उमेदवारांनी कोणत्याही टुलची मदत न घेता लेखन केले, त्यांचे लिखाण सर्वोत्तम ठरले.
एआयच्या प्रभावापासून विद्यार्थी आता वंचित राहू शकत नाहीत, हे या अभ्यासाने दाखवून दिले. विचारासाठी एआयवर अवलंबून राहणाऱ्यांचे भविष्यात काय होणार, यावरही अभ्यासात प्रकाश टाकण्यात आला. शिकण्याची एक प्रक्रिया असते.
ग्रामरली एआय टूल मशिन हे लर्निंग आणि डीप लर्निंगच्या मदतीने भाषेचे विश्लेषण करते. हे टूल चोवीस तास एका शिक्षकाप्रमाणेच यूजरच्या मदतीसाठी सदैव सज्ज असते. यूजरला शिकवताना हा टूल किचकट वाक्यात सुटसुटीतपणा आणतो आणि शॉर्टकट सांगतो. मूलभूत व्याकरण, ओळीतील विराम चिन्हांची तपासणी करण्याबरोबरच संक्षिप्त आणि स्पष्टता आणण्यासाठी एआयचा वापर करतो. तसेच विचार अणि मंथनासाठीदेखील मदत करतो. यात अनेक एक्स्टेंशन आणि इंटिग्रेशन आहेत. म्हणूनच ज्या ठिकाणी टेक्स्ट बॉक्स असतो तेथे तेथे यूजर त्याचा वापर करतात.