

सध्या हिवाळ्याची जोरदार चाहूल सुरू झाली आहे. या हुडहुडी भरविणार्या थंडीत सर्वजण अक्षरशः गारठून जात आहेत. अशावेळी थंडीने गारठलेल्या पायांपेक्षा त्रासदायक दुसरे काही नसते. थंडीत बुटात देखील पाय बर्फासारखे गार होतात. ट्रेकिंग किंवा बर्फाळ प्रदेशात फिरायला गेले की सॉक्स, डबल सॉक्स, थर्मल सॉक्स असे थरावर थर घातले तरीही पाय पूर्णपणे उबदार राहात नाहीत. अंगावर कितीही कपडे चढवा; पण पायांत झालेला बर्फासारखा गारवा दिवस खराब करून टाकतो. ट्रेकिंग करताना तर पाय गोठून अक्षरशः वेदना होतात. मात्र, आता तुम्हाला तुमच्या पायाचे टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण सध्याच्या गॅजेट वर्ल्डमध्ये असे स्मार्ट शूज तयार झाले आहेत जे फक्त चालण्यासाठी किंवा धावण्यासाठीच नव्हे, तर तुमचे पाय गरम ठेवण्यापासून ते तुमचा फिटनेस डेटा ट्रॅक करण्यापर्यंत सर्व काही करतात.
या स्मार्ट शूजमधील इन्सोल्स छोटेसे स्मार्ट गॅजेटच आहेत. शूजच्या तळाशी बसवले जाणारे हे इन्सोल्स आर्टिफिशिअल इंटेलिजन्स व सेन्सरद्वारे तुमच्या प्रत्येक पावलाची गणना करतात. किती स्टेप्स चाललात, किती कॅलरीज बर्न झाल्या, याचा हिशेब ठेवतात आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पाय गरम ठेवण्यासाठी हीटिंग सिस्टीमही देतात. हे इन्सोल्स स्मार्टफोन अॅपशी ब्ल्यूटूथद्वारे जोडले जातात. अॅपमध्ये तुमचे वय, उंची, वजन टाकल्यानंतर तो तुमचा कॅलरी बर्निंगचा अचूक अंदाज काढतो. कारण स्टेप काऊंटर थेट पायाखाली असल्याने तो हातावरील बँडपेक्षा जास्त अचूक डेटा देतो.
या इन्सोल्सचे फोनवरील अॅपमधून तुम्ही तापमान नियंत्रित करू शकता. म्हणजे बाहेर बर्फ पडत असेल, थंडी कडाक्याची असेल, तरीही शूजच्या आतला उबदारपणा तुम्ही स्वतः ठरवू शकता. स्की बूट, स्नो बूट, वर्क बूट, रनिंग शूज, जवळपास कोणत्याही शूजमध्ये हे इन्सोल्स वापरता येतात. हीटिंग मोड सतत वापरला तरी देखील याची बॅटरी साधारण सहा तास चालते. हीटिंग बंद ठेवून फक्त ट्रॅकिंगसाठी वापरल्यास बॅटरी एका दिवसापेक्षा जास्त टिकते. यातील काही शूजचे डिझाईन फ्यूचरिस्टिक आहेत. यातील स्पोर्टस् मॉडेलला लेसेसच नाहीत. पायात शूज घातले की, अॅपमधून तो आपोआप घट्ट आणि सैल करता येतो. म्हणजे सेल्फ टायटनिंग फीचर. त्याचबरोबर यामध्ये शॉक अॅब्जॉर्बशन मापनाची सुविधाही आहे. धावताना किंवा चालताना पायावर किती ताण येतो, इम्पॅक्ट किती आहे, याचाही डेटा मिळतो.
दररोज पायात घालणारे शूजही आता फक्त फॅशन किंवा प्रोटेक्शनसाठी नसून पूर्णपणे कनेक्टेड आणि स्मार्ट होत चालले आहेत. पाय उबदार ठेवणे, फिटनेस डेटा ट्रॅक करणे, चालण्याचा पॅटर्न मोजणे आणि त्याच वेळी मोबाईलमधून सर्व काही कंट्रोल करणे. हे सगळे आता एका शूजमध्ये मिळते. सध्या हे स्मार्ट शूज प्री-ऑर्डरवर उपलब्ध असून त्यांची किंमत सुमारे 350 डॉलर्स म्हणजे भारतीय चलनात साधारण वीस ते पंचवीस हजार रुपयांच्या घरात आहे.