

आशीष शिंदे
घराच्या अंगणात किंवा परड्यात एक छोटीशी बाग असावी, असे प्रत्येकालाच वाटते. सध्याच्या अपार्टमेंट कल्चरमध्ये ही बाग आता बाल्कनीमध्ये आणि टेरेसवर जागा घेत आहे. या छोट्या बागेतील हिरवीगार गवताची चादर, सुबक झुडपे आणि व्यवस्थित लेन ही घराच्या सौंदर्यात भर घालते. पण या सौंदर्याची निगा राखणे मात्र सोपे काम नाही. गवत वाढले की, याला कसे आणि कोणाकडून कट करून घ्यायचे, त्यात जर कोणी सापडले नाही तर स्वतःच कात्री हातात घेऊन घाम गाळावा लागतो. त्यामुळे अनेकदा बाग अस्ताव्यस्त होते.
आधुनिक जीवनशैलीत ही जबाबदारी सगळ्यांनाच जड वाटते. पण तुमच्या या सार्या समस्यांवरही सध्याच्या गॅजेट वर्ल्डमध्ये भन्नाट तोडगा आला आहे. तुमच्या अंगणातील असो किंवा टेरेसवरील बागेची एआय रोबोट सर्व काळजी घेईल. सेन्सर्सद्वारे हा रोबोट सर्व जागा स्कॅन करेल. यानंतर कुठे गवत वाढले आहे, कुठे कमी आहे, हे तपासेल आणि त्याची लेव्हल करून देईल.
याशिवाय अनेक भन्नाट फीचर्स या लॉनमोअरमध्ये दिले आहेत. हा एआय लॉनमोअर दिसायला कॉम्पॅक्ट आणि आकर्षक आहे. एकदा बागेत सोडले की तो स्वतः गवत कापतो. यात बसवलेले एआय अल्गोरिदम आणि एलआयडीएआर सेन्सर्स बागेतील प्रत्येक कोपरा स्कॅन करतात. हा एआय रोबो झाडे, फुलांच्या कुंड्या, बाकडे ओळखून त्याभोवती सहज मार्गक्रमण करतो. कुठेही धडकत नाही, अडकत नाही. गवताची उंची लक्षात घेऊन लेन काटणी व्यवस्थित करतो.
याचे खास वैशिष्ट्य म्हणजे ऑटो चार्जिंग सिस्टीम. बॅटरी कमी झाली की तो स्वतःहून चार्जिंग स्टेशनकडे परत जातो आणि पुन्हा चार्ज झाल्यावर नव्या उत्साहाने काम सुरू करतो. याशिवाय मोबाईल अॅपद्वारे त्याला नियंत्रित करता येते. शेड्यूल सेट करा, बागेचा नकाशा तयार करा आणि कुठे किती गवत कापायचे ते ठरवा. हा पूर्णपणे इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणारा असल्याने धूर, आवाज किंवा प्रदूषण नाही. शांतपणे आणि परिणामकारकपणे बागेचे सौंदर्य तो जपतो. आजच्या व्यस्त जीवनशैलीत ज्यांना बाग आवडते पण वेळ नाही, त्यांच्यासाठी हा एकदम परफेक्ट पर्याय आहे.
मुलांसाठी तो मजेदार रोबोटिक खेळणे तर प्रौढांसाठी वेळ आणि श्रम वाचवणारा खरा एआय साथीदार आहे. सध्या हा गॅजेट विदेशी बाजारात उपलब्ध असून लवकरच भारतात येण्याची शक्यता आहे. किंमत साधारणपणे 80 ते 90 हजार रुपयांच्या दरम्यान असण्याचा अंदाज आहे. हा केवळ लॉनमोअर नाही, तर बाग हिरवीगार ठेवणारा, वेळ वाचवणारा आणि आधुनिक जीवनशैलीला स्मार्ट टच देणारा गोंडस रोबोटिक साथीदार आहे.