AI lipstick technology | लिपस्टिकमध्येही अवतरले ‘एआय’

AI lipstick technology |
AI lipstick technology | लिपस्टिकमध्येही अवतरले ‘एआय’
Published on
Updated on

आशिष शिंदे

मेकअप करताना कपड्यांना मॅच होणारी किंवा स्किन टोनला सूट होईल, अशी शेड मिळवण्यासाठी महिला तासन्तास खर्च करतात. अनेकदा हवी तशी शेड बाजारात उपलब्ध नसते किंवा ती मिळवण्यासाठी हजारो रुपये खर्च करून वेगवेगळ्या लिपस्टिक विकत घ्याव्या लागतात; पण ‘गॅजेट वर्ल्ड’मध्ये यावर एक अत्यंत हायटेक उपाय आला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून तयार केलेला स्मार्ट लिपस्टिक प्रिंटर तुम्हाला हवी तशी लिपस्टिक शेड काही सेकंदात घरच्या घरी तयार करून देईल.

हे गॅजेट दिसायला अत्यंत स्टायलिश असून, यात रंगांचे तीन वेगवेगळे कॉर्ट्रेज बसवलेले असतात. या डिव्हाईसला स्मार्टफोनशी जोडू शकता. एखाद्या कार्यक्रमाला जायचे आहे आणि तुम्ही घातलेल्या ड्रेसच्या रंगाचीच लिपस्टिक तुम्हाला हवी असेल, तर तुम्ही फक्त तुमच्या ड्रेसचा फोटो काढायचा. एआय सिस्टीम तुमच्या ड्रेसचा रंग स्कॅन करते आणि रंगांचे अचूक मिश्रण करून तुमच्या समोर त्याच रंगाची नवी लिपस्टिक शेड तयार करते. यामध्ये ‘शेड मॅच’ नावाचे विशेष फीचर आहे, ज्यामध्ये तुम्ही कॅमेर्‍यासमोर कोणताही रंग धरला की, हे मशिन त्याच रंगाची लिपस्टिक डोस स्वरूपात बाहेर काढते.

यात ‘शेड स्टायलिस्ट’ नावाचा पर्याय दिला आहे. यामध्ये तुमच्या आऊटफिटचा फोटो काढला की, सिस्टीम तुम्हाला तुमच्या लूकला साजेसे रंगांचे पर्याय सुचवते. रंगांचे मिश्रण वरच्या भागात असलेल्या एका ट्रेमध्ये गोळा होते, जे तुम्ही ब्रशच्या मदतीने लावू शकता. विशेष म्हणजे, या मशिनचे वरचे कव्हर काढून तुम्ही एका छोट्या बॉक्ससारखे सोबत ठेवू शकता. जेणेकरून बाहेर गेल्यावर तुम्हाला पुन्हा लिपस्टिक लावणे सोपे जाईल. या लिपस्टिक प्रिंटरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये वापरलेले व्हर्च्युअल ट्राय-ऑन तंत्रज्ञान. केवळ रंग तयार करणे इतकेच याचे काम मर्यादित नाही, तर तो रंग तुमच्या ओठांवर प्रत्यक्ष कसा दिसेल, हे तुम्ही लिपस्टिक तयार करण्यापूर्वीच मोबाईल स्क्रीनवर पाहू शकता.

यासाठी हे गॅजेट ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटीचा वापर करते. तुमच्या चेहर्‍याचा आकार, ओठांची ठेवण आणि त्वचेचा पोत लक्षात घेऊन एआय तुम्हाला विविध रंगांचे पर्याय सुचवते. यामधील स्मार्ट कॅलिब्रेशनमुळे प्रत्येक वेळी रंगाचे प्रमाण अगदी अचूक राखले जाते, जेणेकरून तुम्हाला दरवेळी तोच गडद किंवा फिकटपणा मिळतो, जो तुम्हाला हवा आहे. एकदा चार्ज केल्यानंतर ही मशिन अनेक दिवस आरामात चालते, त्यामुळे प्रवासातही हे तुमच्या मेकअप किटमधील एक महत्त्वाचा सोबती ठरू शकते. हे लक्झरी गॅजेट सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात 450 ते 500 डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात सुमारे 40 ते 45 हजार रुपयांच्या घरात उपलब्ध आहे. याशिवाय रंगांचे कॉर्ट्रिज तुम्हाला वेगळे विकत घ्यावे लागतात. ज्यांना फॅशन आणि मेकअपमध्ये नवीन प्रयोग करायला आवडतात, त्यांच्यासाठी ही एक मोठी क्रांती आहे. आता तुम्हाला शेकडो लिपस्टिक जमा करण्याची गरज नाही, तर एका स्मार्ट मशिनच्या मदतीने तुम्ही दररोज नवा लूक मिळवू शकता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news