प्रतिभेच्या लाटा

एआयमुळे कलाकाराविना द़ृश्य चित्रित करणे शक्य
ai-enables-filming-without-actors
प्रतिभेच्या लाटाfile photo
Published on
Updated on

भारतीय चित्रपटसृष्टीच्या पायाभरणीचे काम दादासाहेब फाळके, व्ही. शांताराम, भालजी पेंढारकर, नानासाहेब सरपोतदार तसेच बॉम्बे टॉकीजच्या हिमांशू रॉय आणि देविकाराणी यांनी महाराष्ट्रातच केले. ‘प्रभात’चे चित्रपट मराठीप्रमाणे हिंदीतही निघत असत, तर मुंबईत राजकमल स्टुडिओ स्थापन करून व्ही. शांताराम यांनी ‘सिल्व्हर स्क्रिन एक्स्चेंज’ ही स्वतःची वितरण कंपनीही सुरू केली होती. चित्रपट ही केवळ एक कला नसून, तो व्यवसायही आहे, याचे भान व्ही. शांताराम यांच्यासारख्या मोजक्यांनाच होते.

जाहिरात क्षेत्रातील कलावंतांची येथे मांदियाळी होती. ती आता समृद्ध होताना दिसते. या पार्श्वभूमीवर मुंबईत गेल्या आठवड्यात ‘जागतिक द़ृकश्राव्य आणि मनोरंजन परिषदे’चे (वेव्हज) यथोचित आयोजन केले गेले. आशय, सर्जनशीलता आणि संस्कृती हे रचनात्मक अर्थव्यवस्थेचे तीन स्तंभ असून, सर्जनशील अर्थव्यवस्थेचा पुढील 10 वर्षांत देशाच्या जीडीपीत लक्षणीय वाटा असेल, असे प्रतिपादन ‘वेव्हज’च्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधानांनी केले. माणसाची प्रगती केवळ माहिती, तंत्रज्ञान किंवा वेगाच्या जोरावर न मोजता, संगीत, कला, नृत्य, द़ृश्य कला यांनाही महत्त्व द्यावे लागेल, हे पंतप्रधान मोदी यांचे मत या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांची पाठराखण करणारेच म्हणावे लागेल.

भारताकडे हजारो वर्षांपूर्वीच्या कथांचा कालातीत, विचारप्रवर्तक आणि खर्‍याअर्थाने वैश्विक खजिनाच आहे. त्या बळावर प्रतिभावंत नवनवीन उंची गाठू शकतील. जगातील प्रतिभावंतांनी भारताला सर्जनशीलतेचे केंद्र बनवावे, असे आवाहनही पंतप्रधानांनी या निमित्ताने केले. भविष्यात त्यास जगभरातील मोठमोठे स्टुडिओज आणि कंपन्या सकारात्मक प्रतिसाद देतील, अशी आशा आहे. भारत आज चित्रपटनिर्मिती, डिजिटल सामग्री, गेमिंग, फॅशन, संगीत आणि लाईव्ह कॉन्सर्ट आदींसाठी जागतिक केंद्र म्हणून उदयास येत आहे. सत्यजित राय यांना 1992 मध्ये चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल ऑस्कर मिळाला.

‘स्लमडॉग मिलेनियर’ या ऑस्कर विजेत्या चित्रपटाचे संगीतकार ए. आर. रहमान आणि साऊंड मिक्सिंगबद्दल रसूल पुकुट्टी यांना ऑस्कर मिळाले. राज कपूरचे चित्रपट रशियासह युरोपातील अनेक देशांत आजही लोकप्रिय आहेत, तर ‘आरआरआर’सारख्या चित्रपटाने जगभर व्यावसायिक उच्चांक गाठले. अभिनय, दिग्दर्शन आणि चित्रपटाशी संबंधित, तांत्रिक विभागात कामाशी संबंधित स्वतंत्र विद्यापीठे तयार करण्याच्या हेतूने विविध कलाकार ज्या ‘एफटीआयआय’च्या तालमीत शिकून बाहेर पडले, त्या संस्थेला केंद्र सरकारने अभिमत विद्यापीठाचा दर्जा दिला. त्यामुळे या विद्यापीठालाही आता जागतिक दर्जाचे विद्यापीठ म्हणून लाभ मिळवणे शक्य होईल.

चित्रपट व दूरदर्शन क्षेत्रासाठी लागणारे प्रशिक्षित कलाकार व तंत्रज्ञ या विद्यापीठात मोठ्या संख्येने तयार होऊ शकतील. एआय तंत्रज्ञानाला सामोरे जाण्याचे आव्हान या क्षेत्रासमोर आहे आणि ते आणखी जटील आहे. ‘वेव्हज’च्या जागतिक माध्यमावरील परिसंवादात सहभागी 77 देशांच्या प्रतिनिधींनी एआयच्या नैतिक वापराचा संकल्प सुनिश्चित करण्याची घोषणा केली. हॉलीवूडमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा लेखन-दिग्दर्शन अशा क्षेत्रांत अतिवापर करण्याविरोधात आंदोलनेही करण्यात आली होती.

एआयमुळे कलाकाराविना द़ृश्य चित्रित करणे शक्य झाले आहे. या सर्व बदलांची दखल भारताताच्या द़ृश्य कला क्षेत्रातील लोकांना घ्यावी लागणार आहे. वास्तविक भारताची लोकसंख्या पाहता आपल्याकडे असलेली चित्रपटगृहांची संख्या अल्प, म्हणजे केवळ 10 हजार इतकी आहे, तर भारताच्या एकतृतीयांश लोकसंख्या असलेल्या अमेरिकेत 40 हजार चित्रपटगृहे आहेत. पूर्वी एखादा मोठा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो वर्षभराने दूरचित्रवाहिन्यांवर प्रसारित केला जाई. आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दीड महिन्यात तो ओटीटीवर येतो. त्यामुळे व्यवसायावर विपरीत परिणाम होत आहे. ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी’ (आयआयसीटी) ही देशातील नवी संस्था असून, गुगल, यूट्यूब, मेटा आणि वाकॉम, मायक्रोसॉफ्ट यासारख्या बड्या कंपन्यांनी तिला सहकार्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे भारतातील व्हिज्युअल मीडिया अधिकाधिक तंत्रसमृद्ध होऊ शकेल.

मुंबईसह भारतातील प्रमुख शहरांमधून गेल्या काही वर्षांत कोल्ड प्ले, एड शिरान अशा आंतरराष्ट्रीय म्युझिक बँडस्चे आयोजित करण्यात आलेले कार्यक्रम लोकप्रिय ठरले. त्यामुळे ‘संगीत पर्यटन’ असा नवा उद्योग विकसित होऊ लागला आहे. मुंबईत तर असे कार्यक्रम मोठ्या संख्येत होतात. आता या मायानगरीत गोरेगावच्या फिल्मसिटीसोबतच आणखी एक नवी चित्रनगरी उभारली जाणार आहे. या दोनशे एकरांमधील नगरीत जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. तसेच मनोरंजन पार्क व पर्यटकांना राहण्यासाठी सुविधाही असतील. हॉलीवूडमध्ये युनिव्हर्सल स्टुडिओ वगैरे पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक जात असतात. महाराष्ट्र सरकारने मुंबईत चित्रपट पर्यटनावर अधिक भर देण्याची गरज आणि संधी आहे. त्यावर ठोसपणे काम होणे अपेक्षित आहे.

‘वेव्हज’ बाजारात जपान, दक्षिण कोरिया, रशिया, हॉलंड, न्यूझीलंड, अमेरिका अशा एकूण 22 देशांतील बडे उद्योग समूह सहभागी झाले. त्यातून चित्रपट, संगीत, अ‍ॅनिमेशन्स, रेडिओ, व्हीएफएक्स अशा विविध विभागांतून सुमारे 800 कोटी रुपयांची उलाढाल झाली. शिवाय भारत व बि—टन यांची पहिली निर्मिती असलेल्या संयुक्त चित्रपटाची घोषणाही करण्यात आली. सुषमा स्वराज केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री असताना चित्रपट क्षेत्रास उद्योगाचा दर्जा मिळाला. त्यानंतर गेल्या 15-20 वर्षांत चित्रपट व दूरचित्रवाणी क्षेत्रांत कॉर्पोरेटस्चे अस्तित्व वाढले. पूर्वी अंडरवर्ल्डचा काळा पैसा या क्षेत्रात येत असे.

चित्रपटात अमुकतमुक कलाकार घ्या, असा दबावही असे. हे चित्र पालटले असून व्यवस्थापन, मार्केटिंग, तंत्रज्ञान या क्षेत्रांतील असंख्य तरुण-तरुणी चित्रपट, दूरचित्रवाणी, जाहिरातपट, रेडिओ व इव्हेंटस् याकडे वळत आहेत. जनतेची द़ृश्य साक्षरता वाढली असून, माहिती क्रांतीमुळे जगातील विविध भाषा, विविध माध्यमांतील कार्यक्रम बघता येऊ लागले आहेत. त्याची निकोप वाढ होणे जसे गरजेचे, त्यात कलेच्या सर्व घटकांना न्याय मिळेल याचे भानही तितकेच गरजेचे. अशा कल्पक उपक्रमांमुळेच प्रतिभेच्या लाटांना बळ मिळत असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news