

विनायक सरदेसाई
महापुरासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये ड्रोन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वापर झपाट्याने वाढत आहे. मदत व बचावकार्यात हे तंत्रज्ञान जलदगतीने आणि प्रभावीपणे काम करत असल्यामुळे अनेक जीव वाचवण्यास मदत होते आहे. मात्र अजूनही काही महत्त्वाच्या अडचणी आहेत, ज्या सोडवल्याशिवाय या तंत्रज्ञानावर पूर्णपणे अवलंबून राहता येणार नाही.
पुरानंतर अनेक लोक बेपत्ता होतात. अशा वेळी ड्रोनद्वारे आकाशातून छायाचित्रण केले जाते आणि त्याद्वारे पूरग्रस्त भागाचा आढावा घेतला जातो. एका ड्रोनने अवघ्या 20 मिनिटांची उड्डाण झेप घेतली, तरीही ते सुमारे 800 हून अधिक उच्च दर्जाच्या छायाचित्रांची नोंद करू शकते. अशा 10 झेपांमध्ये 8000 पेक्षा जास्त फोटो गोळा होतात. हे सर्व फोटो पाहण्यासाठी जर एखाद्या माणसाला प्रत्येकी 10 सेकंद दिले, तरीही एकूण वेळ 22 तासांहून अधिक लागतो. इतका वेळ सतत एकाच लक्ष्याने फोटो पाहणे कोणत्याही माणसासाठी कठीण असते. याच ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयची भूमिका महत्त्वाची ठरते. एआयमधील क्लासिफायर प्रणाली काही सेकंदांमध्ये हे फोटो तपासते आणि ज्या छायाचित्रांमध्ये पूरग्रस्त किंवा त्यांचे सामान दिसण्याची शक्यता असते, ते फोटो लगेच ओळखून वेगळी ठेवते. उदा. रंगीत कचरा, बॅग, माणसांनी तयार केलेल्या गोष्टींसारख्या चिन्हांचा शोध घेऊन असे फोटो शोध व बचाव पथकांकडे पाठवले जातात. त्यानंतर जीपीएस स्थानाच्या आधारे त्या भागात थेट तपासणी केली जाते.
तंत्रज्ञान प्रगत असले तरीही यामध्ये काही महत्त्वाच्या अडचणी आजही कायम आहेत. पहिली अडचण म्हणजे पूरग्रस्तांची ओळख पटवणे फार कठीण असते. पुरात अनेकजण चिखल, झाडेझुडपे, माती किंवा वस्तूंमध्ये अडकलेले असतात. त्यामुळे त्यांच्या शरीराची बाह्यरचना लपलेली असते आणि चेहरा किंवा हालचाल स्पष्ट नसते. यामुळे एआयला ते ओळखणे अधिक कठीण जाते. दुसरी अडचण म्हणजे एआयला शिकवण्यासाठी आवश्यक असलेल्या डेटाचा अभाव. पूरग्रस्त भागांतील छायाचित्रांचा मोठ्या प्रमाणावर डेटासेट आजही उपलब्ध नाही. त्यामुळे एआय प्रणालीला पुरेसे शिक्षण मिळत नाही आणि त्यामुळे अचूकता कमी होते.
तिसरी अडचण म्हणजे जीपीएसमधील चुकांची शक्यता. अनेकवेळा ड्रोनचे छायाचित्रण थेट वरून न होता थोडे तिरके घेतले जाते, त्यामुळे जीपीएस स्थान थोडे इकडे तिकडे होते. शोध पथक चुकीच्या ठिकाणी पोहोचते आणि वेळ वाया जातो. या सर्व अडचणींचा सामना करण्यासाठी मानवी निरीक्षक आणि एआय यांचे योग्य समन्वय अत्यावश्यक आहे. संशोधकांच्या मते, एआय मलब्यातील कृत्रिम रंग, सरळ रेषा, नव्वद अंशाच्या कोपर्यांची रचना ओळखू शकतो. अशा ठिकाणी माणूस अडकलेला असण्याची शक्यता अधिक असते.
अशा छायाचित्रांवर प्राथमिकता देऊन शोध पथक त्या ठिकाणी लगेच पोहोचू शकते. संकटानंतरचे पहिले काही तास महत्त्वाचे असतात. कारण त्याच कालावधीत अनेक जीव वाचवण्याची शक्यता जास्त असते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, एआय प्रणालीत अजून सुधारणा करणे आवश्यक आहे. प्रशिक्षणासाठी अधिक दर्जेदार आणि पुराशी संबंधित छायाचित्रांचा डेटा गोळा करणे, जीपीएस अचूकता वाढवणे आणि एआय प्रणालीला अधिक संवेदनशील बनवणे या बाबींवर काम झाले तर हे तंत्रज्ञान आणखी प्रभावी होईल.
सध्या तरी एआय आणि माणूस यांचा समन्वय हाच सर्वात चांगला पर्याय आहे आणि याची यशस्वी चाचणी टेक्सासमध्ये आलेल्या पुरात पाहायला मिळाली आहे. ही प्रणाली अजून पूर्णपणे परिपूर्ण नसली तरी ती एक आशेची किरण आहे. योग्य दिशेने आणि नवनवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने हे साधन भविष्यात अधिक जीव वाचवू शकेल.