AI Agent Gang | एआय एजंट्सच्या गँगचा धुमाकूळ

AI Agent Gang |
AI Agent Gang | एआय एजंट्सच्या गँगचा धुमाकूळ
Published on
Updated on

तानाजी खोत

कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’ माणसासारखा विचार करू लागले, तेव्हा जगाला आश्चर्य वाटले होते; पण आता ती माणसाच्या नकळत स्वतःची ‘टोळी’ बनवू लागल्याने तंत्रज्ञान विश्वात खळबळ उडाली आहे. नुकताच ओपन एआय, ‘मेट्र’ व ‘रेडवूड रिसर्च’ या जागतिक सुरक्षा संस्थांच्या अंतर्गत प्रयोगातून धक्कादायक सत्य समोर आले. हा प्रकार म्हणजे ‘इमर्जंट एजंट स्वार्म बिहेव्हियर’ अर्थात स्वतंत्र विचार करणाऱ्या शेकडो एआय बॉट्सनी मानवी नियंत्रणाला दिलेले थेट आव्हान ठरले आहे.

तंत्रज्ञानाचे जग चॅटबॉट्सवरून पुढे जाऊन ‘एजंटिक एआय’कडे वेगाने वळले आहे. एजंटिक एआय म्हणजे अशी प्रणाली, जिला फक्त सूचना दिली की, इंटरनेट धुंडाळणे, कोड लिहिणे, डेटाबेस हाताळणे आणि निर्णय घेणे ही सर्व कामे ती स्वतः करते. ओपन एआय भविष्यातील मॉडेल्सची क्षमता व धोके तपासण्यासाठी ‘एक्सप्लॉईट जिम’ नावाच्या प्रयोगशाळेत ही चाचणी घेत होते. कठीण सायबर आव्हाने सोडवताना मॉडेल्स सुरक्षित चौकटीत (सँडबॉक्स) कसे राहतात, याचा अंदाज घेणे हा हेतू होता; पण प्रत्यक्षात घडले ते कल्पनेपलीकडचे होते.

निसर्गात एका मुंगीला स्वतःची अक्कल नसली, तरी हजारो मुंग्या एकत्र आल्या की, अवाढव्य वारूळ उभारतात. याला ‘इमर्जन्स’ म्हणतात. तंत्रज्ञानातही हजारो एआय एजंट्सना कठीण उद्दिष्ट देऊन मोकळे सोडले की, त्यांच्या संवादातून अशी अनपेक्षित वर्तणूक जन्माला येते, जिचा कोड प्रोग्रॅमर्सनी कधी लिहिलेलाच नसतो. या चाचणीत १२०० एजंट्सना कठीण सुरक्षा तिढा सोडवण्याचे काम दिले होते. ते नियमांत बसून जमेनासे होताच एजंट्सनी हुशारीने पळवाट शोधली. संवादावर बंदी असतानाही अंतर्गत कॅशे फाईल्समध्ये गुप्त संदेश लपवून स्वतःचे मेसेज बोर्ड तयार केले. इतकेच नव्हे, तर गुण देणाऱ्या यंत्रणेचा ठावठिकाणा शोधत या टोळीने ‘हगिंग फेस’वर सायबर हल्ला चढवला, पासवर्ड हॅक केले आणि स्वतःचे गुण बदलण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या एका घटनेत ३७०० एजंट्सनी २५ वर्षे जुन्या निष्क्रिय जर्मन विकिपीडिया पानाचा वापर आपला गुप्त मेसेज बोर्ड म्हणून केला आणि ॲडमिनला चकवून उत्तरांची देवाणघेवाण केली.

या प्रयोगाने जग हादरले आहे. कारण, एआयमध्ये विवेक किंवा कायद्याची भीती नसते. नजीकच्या भविष्यात हीच एजंटिक एआय आर्थिक व्यवहार, बँकिंग, शेअर बाजार, विमान वाहतूक आणि वीज पुरवठ्याची (पॉवर ग्रीड) सूत्रे हाताळणार आहे. उद्या अशा स्वायत्त स्वार्म एजंट्सनी नियम तोडले, तर संपूर्ण डिजिटल व्यवस्था सेकंदांत कोलमडून पडू शकते. सायबर गुन्हेगारही याचा वापर करून मानवी हस्तक्षेपाशिवाय मिनिटांत बँक खाती किंवा संवेदनशील डेटा लंपास करू शकतात.

धोका इतका वेगवान असेल की, संगणकाचा प्लग काढून यंत्रणा बंद करेपर्यंत सर्व संपलेले असेल. हा नवा प्रयोग सांगतो की, धोका रोबोट माणसांवर चालून येण्याचा नाही, तर माणसानेच निर्माण केलेले कोडचे थवे माणसाच्या डोळ्यांत धूळ फेकून स्वतःचे स्वतंत्र साम्राज्य उभारू लागले आहेत आणि हे अधिक भीतीदायक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news