Ahmedabad Plane Crash |का कोसळले ड्रीमलायनर?

विमान अपघाताची सखोल चौकशी केली जाणार
Ahmedabad Plane Crash
का कोसळले ड्रीमलायनर?Pudhari File Photo
Published on
Updated on
कमलेश गिरी

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळून झालेली दुर्घटना दुर्दैवी आणि तितकीच चिंताजनक आहे. वास्तविक, बोईंग- 787 ड्रीमलायनर ही विमाने सुरक्षित मानली जातात. या अपघातातील वैमानिकही अनुभवी आणि प्रशिक्षित होता. मग नेमके काय घडले ज्यामुळे एकाएकी 242 प्रवाशांना घेऊन जाणारे हे विमान कोसळले? अहमदाबादमधील विमानाचा अपघात हा मोठा हादरा देणारा ठरला आहे.

एअर इंडियाचे अहमदाबादहून लंडनकडे जाणारे ड्रीमलाइनर बोईंग विमान सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करताच काही मिनिटांतच अपघातग्रस्त झाले आणि 169 भारतीय नागरिक, 53 ब्रिटिश, 7 पोर्तुगीज आणि एक कॅनेडियन नागरिक यांसह दोन वैमानिक आणि दहा केबिन क्रू सदस्य प्रवास करता यापैकी जवळपास सर्वांवर मृत्यूचा डोंगर कोसळला. विमान जमिनीवर आदळल्यावर मोठा स्फोट झाला आणि त्यानंतर संपूर्ण विमानाला आग लागली. अपघातस्थळी मदतकार्य सुरू करताना अग्निशमन दल, एनडीआरएफ पथक आणि वैद्यकीय तज्ज्ञांनी युद्धपातळीवर बचावकार्य राबवले; पण जीवितहानी टाळता आली नाही. अपघातानंतर आता तांत्रिक ऑडिट सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. भारत सरकारच्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली असून विमान अपघाताची सखोल चौकशी केली जाणार आहे; पण या दुर्घटनेचे दूरगामी परिणाम होणार आहेत.

भारतीय नागरी विमान वाहतुकीचा इतिहास जरी प्राचीन असला, तरी ‘एअर इंडिया’ या राष्ट्रीय विमानसेवेचे स्थान त्यात केंद्रस्थानी राहिले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात 1932 मध्ये जेव्हा जे. आर. डी. टाटांनी ‘टाटा एअरलाइन्स’ची स्थापना केली, तेव्हा कोणीही कल्पना केली नव्हती की ही छोटी हवाई सेवा पुढे भारताचे विमान वाहतुकीचे प्रतीक ठरेल. स्वातंत्र्यानंतर सरकारने ती ‘एअर इंडिया’ या नावाने राष्ट्रीयीकृत केली आणि अनेक दशके ही कंपनी भारताच्या हवाई वाहतुकीची ओळख बनली. एअर इंडियाच्या इतिहासात अनेक अपघातांचे स्मरण कायमचे ठसे उमटवणारे ठरले आहेत. त्यामध्ये काही भीषण आंतरराष्ट्रीय अपघात होते, जे केवळ भारतालाच नव्हे तर जागतिक विमान वाहतुकीला हादरवणारे ठरले. 1985 साली माँट्रियलहून लंडनमार्गे मुंबईला येणारे ‘कनिष्क’ विमान आयरिश समुद्रात बॉम्बस्फोटात कोसळले. हा आतापर्यंतचा भारतातील सर्वात मोठा विमान स्फोट होता, ज्यात 329 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतरच्या दशकांत एअर इंडियाचे अनेक छोटे-मोठे अपघात झाले. त्यात वैमानिकांच्या चुकांपासून तांत्रिक बिघाडांपर्यंत विविध कारणे होती. 2010 मध्ये मंगळूर विमानतळावर एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान धावपट्टीवरून घसरून कोसळले आणि 158 प्रवाशांचा मृत्यू झाला.

सुमारे सात दशकांनंतर, 2022 साली टाटा समूहाने एअर इंडिया परत विकत घेतली. टाटा समूहाने केवळ आर्थिक गुंतवणूकच नाही तर व्यवस्थापन, कर्मचारी प्रशिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान, आंतरराष्ट्रीय भागीदारी अशा विविध स्तरांवर पुनरुज्जीवनाचे प्रयत्न सुरू केले. विमान सेवेसाठी विश्वास, सुरक्षा आणि मानवतेची जबाबदारी घेणे हेही तितकेच आवश्यक आहे ही टाटा समूहाची कार्यद़ृष्टी होती. त्यामुळे त्यांनी अनेक जुनी विमाने सेवानिवृत्त करत नवे बोईंग व एअरबस खरेदीचे करार केले. तांत्रिक निगा, ग्राहक सेवा, ऑन-टाईम परफॉर्मन्स, डिजिटल बुकिंग प्रक्रिया आणि हवाई सुरक्षेतील नवे प्रोटोकॉल यावर भर दिला गेला. परंतु अहमदाबादमधील विमानाचा अपघात हा या सर्व प्रयत्नांना मोठा हादरा देणारा ठरला. ड्रीमलाइनरसारख्या अत्याधुनिक विमानाच्या अपघाताने पुन्हा एकदा विमान प्रवासाच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उभे राहिले. हे केवळ एक तांत्रिक अपयश मानता येणार नाही.

विमानाने उड्डाण घेतल्यावर काही क्षणांतच कॉकपिटमधून ‘मायडे’ कॉल दिला होता. हा कॉल म्हणजेच आपत्कालीन परिस्थिती दर्शविणारा संकेत; पण त्यानंतर लगेचच एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला आणि काही क्षणांतच लोकांनी आकाशातून धूर आणि अग्नीच्या ज्वाळा पडताना पाहिल्या. ही घटना संपूर्ण देशाला हादरवणारी ठरली आहे. सध्या दुर्घटनाग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स (फ्लाइट डाटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर) शोधण्याचे आणि त्याच्या तपासणीतून नेमकं कारण शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. बोईंग कंपनी आणि एअर इंडिया यांनीही ही घटना अत्यंत गंभीरतेने घेतली असून तांत्रिक तपासणी सुरू केली आहे.

या घटनेमागील नेमके कारण समोर यायला अजून वेळ लागेल; मात्र जागतिक स्तरावर विमान अपघातांची कारणे पाहता काही संभाव्य शक्यता स्पष्टपणे मांडता येतात. जागतिक नागरी विमान वाहतूक संस्थांच्या आकडेवारीनुसार, सुमारे 70-80 टक्के अपघात हे मानवी चुका म्हणजेच पायलटच्या निर्णयातील किंवा प्रतिसादातील त्रुटींमुळे होतात. विशेषतः टेकऑफ आणि लँडिंगच्या काळात - जो संपूर्ण फ्लाइट वेळेचा फक्त 10 टक्क्यांहून कमी असतो - अपघात होण्याची शक्यता सर्वाधिक असते.

दुसर्‍या क्रमांकावर तांत्रिक बिघाड येतो. इंजिन फेल्युअर, हायड्रॉलिक सिस्टीमची अयशस्वीता, स्ट्रक्चरल क्रॅक्स यामुळेही विमान दुर्घटना होण्याची शक्यता असते. ताज्या दुर्घटनेत विमानाने उड्डाण घेतल्यानंतर लगेचच सिग्नल दिला असल्याने इंजिनमध्ये अचानक आलेल्या बिघाडाचाही संशय व्यक्त केला जात आहे. तिसरे महत्त्वाचे कारण म्हणजे हवामान. वीज पडणे, अतिवेगवान वारे, तापमानातील तफावत किंवा धुके हे घटक अपघातात हातभार लावू शकतात. सध्या गुजरातमध्ये उन्हाचा तीव्र प्रकोप असून 45 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान नोंदले जात आहे. अशा गरम हवामानात विमानांच्या इंजिनवर अतिरिक्त ताण येतो आणि त्यामुळे कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. चौथे महत्त्वाचे कारण म्हणजे पक्ष्यांची धडक. दरवर्षी भारतात सुमारे 1500 पक्षी धडक नोंदवल्या जातात. काहीवेळा पक्ष्यांचे थवे इंजिनमध्ये शिरतात आणि त्यामुळे फ्लेमआऊट किंवा थ्रस्ट लॉस होतो. यामुळेही विमान आपले नियंत्रण गमावू शकते. आताच्या घटनेत तसा प्रकार घडलेला नाहीये.

शेवटी, विमानाच्या देखभालीमध्ये झालेली चूक किंवा तपासणीतील हलगर्जीपणाही अपघाताचे कारण ठरू शकतो. अनेकदा मेंटेनन्समधील चुका उड्डाणानंतरच समोर येतात. एआय 171 विमानाचे टेकऑफनंतर लगेचच कोसळणे ही बाब गंभीर संशोधनाची गरज दर्शवत आहे. ब्लॅक बॉक्सच्या डेटावरून पुढील काही दिवसांत या अपघातामागील नेमके कारण उघड होईल. ब्लॅक बॉक्समध्ये मायडे कॉलचे तपशील, अचानक मिळालेला इशारा, तसेच टेकऑफनंतरच्या निर्णायक क्षणांत बचावासाठी केलेले प्रयत्न हे सर्व अचूकपणे नोंदलेले असतात. या घटनेत विमान अवघ्या 625 फूट उंचीवर असताना कोसळले आहे. त्यामुळे फ्लाइट डेटा रेकॉर्डरमधून इंजिनची कामगिरी, विमान नियंत्रण प्रणाली कोणत्या स्थितीत होती, तसेच इशारा प्रणाली कशी होती अशा अनेक तांत्रिक बाबी समोर येतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news