

लोककल्याणकारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी धर्मभेद, वर्णभेद, जातिभेद मोडून काढला. मानवतावादी द़ृष्टिकोन त्यांनी सदैव आचरणात आणला. आज अहिल्यादेवी यांची 300 वी जयंती साजरी होत आहे. त्यानिमित्ताने...
अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील चौंडी या गावातील माणकोजी शिंदे यांच्या घरी 31 मे 1725 रोजी झाला. हा भाग नेहमीच दुष्काळी आणि राजकीयद़ृष्ट्या मागासलेला भाग म्हणून त्यावेळी प्रसिद्ध होता. ही परिस्थिती अहिल्यादेवी यांनी त्यांच्या कार्यसेवेतून पुढे बदलली. त्यांनी सजवलेली अहिल्यानगरी आज मोठ्या दिमाखात पाहताना, अनुभवताना वेगळे समाधान वाटते. बाजीराव पेशव्यांचे सुभेदार मल्हारराव होळकर यांचे चिरंजीव खंडेराव होळकर यांच्यासोबत 1733 मध्ये त्यांचा विवाह झाला.
सासरे मल्हारराव होळकर यांच्या घरी मोकळे वातावरण असल्याने पुराण वाचन, व—तवैकल्य यामध्ये आणि राजकारणाचे धडे घेण्यामध्ये त्यांचा बराच वेळ जात होता. पण हा आनंद फार काळ नियतीला मान्य नव्हता. सुरजमल जाट आणि होळकर यांच्यात झालेल्या युद्धात खंडेराव होळकर यांचे 19 मार्च 1754 रोजी निधन झाले; तर सासरे मल्हारराव होळकर यांचे 1766 मध्ये निधन झाले आणि अहिल्यादेवींच्या जीवनात अंधार पसरला. पित्याची ममता आणि जिव्हाळा देणारा सासरा गेल्यानंतर राज्यकारभाराची संपूर्ण जबाबदारी अहिल्यादेवी यांच्यावर आली. होळकर घराण्याची राजधानी इंदूर होती. महेश्वरी हे प्राचीन नगर आज अहिल्यानगर या नावाने प्रसिद्ध आहे. हजारो पर्यटक अहिल्यादेवी यांच्या जन्मगावी चौंडी येथे 31 मे (जयंती) रोजी एकत्र येत असतात.
अहिल्यादेवी यांचा चौंडी येथील वास्तव्याचा पुरावा म्हणजे सध्याचा राजवाडा आणि तेथील परिसर होय. भारतात अनेक तीर्थक्षेत्रस्थळी त्यांनी घाट बांधले आहेत. भाविकांसाठी बांधलेल्या धर्मशाळांचे अनेक पुरावे सध्या उपलब्ध आहेत. अहिल्यादेवी यांचे कार्य डोळसपणे पाहणे म्हणजेच त्यांचे कार्य समजून घेणे होय. धर्माची विविध अंगे आणि धर्मपरायणता दूरद़ृष्टीपणे जतन करणारी देवी, उत्कृष्ट प्रशासक म्हणून त्यांची ओळख आहे. जातिभेद नष्ट करण्यासाठी स्वतः त्यांनी कृती आराखडा तयार केला.
धर्मभेद, वर्णभेद, जातिभेद मोडून काढला. मानवतावादी द़ृष्टिकोन सदैव आचरणात आणला. आपल्या राज्यातील पशू-पक्षी यांचीही काळजी करणार्या व स्वतःच्या पतीलाही पाच मोहरा दंड शिक्षा ठोठावणार्या, स्वतःच्या खजिन्यातून संस्थानातील तीर्थस्थळांचा जीर्णोद्धार करणार्या, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची इतिहासात नोंद आहे. इंग्रज इतिहासकार जॉन माल्कम अहिल्यादेवी यांच्याविषयी म्हणतो की, हिंदुस्थानातील लोक या अहिल्या यांना देवी म्हणतात. त्या लढाऊ वृत्तीच्या होत्या. सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी दरबारात सिंहासनावर बसत होत्या. त्यांच्या न्यायनिवाड्याची अनेक उदाहरणे प्रसिद्ध आहेत. कोणताही भेदाभेद न करता त्या न्यायनिवाडा करत होत्या.
रयतेला त्रास देणारे लुटारू, ठग, चोर, गुंडांचा पूर्ण बंदोबस्त करूनच त्या शांत बसल्या. त्यांच्या राज्यात जनता सुखी-समाधानी आणि समृद्ध होती. अहिल्यादेवी चाणाक्ष आणि चतुर राज्यकर्त्या होत्या. नात्यागोत्याचे व्यवहार आणि राजकारण त्यांनी कधीच केले नाही. जाट, भिल्ल, रामोशी या जमातींचा उपयोग त्यांनी स्वराज्य रक्षणासाठी करून घेतला. गोरगरिबांची काळजी त्या घेत होत्या. संस्थानातील प्रजेला जाण्या-येण्यासाठी संस्थान खर्चातून रस्ते तयार केले. रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावून पर्यावरण रक्षणाचा संदेश त्यांनी रयतेला दिला. चिंचवड, चिखलदरा, रामेश्वर वृंदावन, पंढरपूर येथे त्यांनी अन्नछत्रे उभारली. अनेक तीर्थस्थळे आणि मंदिरांचा त्यांनी जीर्णोद्धार केला आहे. काशी, वाराणसी, पंढरपूर येथे त्यांनी अन्नछत्रे आणि धर्मशाळा बांधल्या आहेत. जयंतीनिमित्ताने त्यांच्या या कार्याचा आणि विचारांचा जागर व्हावा हीच अपेक्षा.