

उमेश काळे
लातूर येथे एका भोंदूने कुंडलीत दोष असल्याचे सांगून पूजाविधीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीशी लैंगिक संबंध ठेवले. त्यात ही मुलगी गर्भवती राहिली. गेल्या तीन-चार महिन्यांत घडलेल्या काही घटनांवर नजर टाकली असता भोंदूगिरीच्या विळख्यातून समाज कधी बाहेर पडणार, हा प्रश्न सतावतो.
नाशिकच्या अशोक खरात प्रकरणाने महाराष्ट्राला हादरवून सोडले. त्यानंतर समाज अधिक सावध होईल, भोंदूबाबांच्या भूलथापांना बळी पडण्याचे प्रकार कमी होतील, अशी अपेक्षा होती. मात्र मराठवाड्यात अलीकडे उघडकीस आलेल्या घटनांनी ही अपेक्षा फोल ठरल्याचे दिसते. लातूरमधील १७ वर्षीय मुलीचे प्रकरण तर या प्रवृत्तीचा अत्यंत घृणास्पद चेहरा समोर आणणारे आहे. मुलीच्या कुंडलीत दोष असल्याचे सांगून तो दूर करण्यासाठी पूजापाठ करण्याच्या बहाण्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. पूजाविधीच्या निमित्ताने घरात ये-जा करीत आरोपीने कुटुंबीयांचा विश्वास संपादन केला आणि त्याच विश्वासाचा गैरफायदा घेतला. मुलगी गर्भवती राहिल्याने कुटुंबावर मोठे संकट कोसळले. रामेश्वर हणमंतराव रामदासी ऊर्फ रामेश्वर महाराज या ४५ वर्षीय भोंदूचे हे कृत्य. कुटुंब हादरून गेले असून, त्यांना धीर द्यावयास हवा. त्याचबरोबर कठोर पोलिस कारवाईचीही अपेक्षा आहे. पोलिसांनी पोक्सो कायद्यासह अन्य कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. मात्र केवळ गुन्हा दाखल करून थांबणे पुरेसे नाही. धार्मिकतेचा मुखवटा धारण करून समाजात वावरणाऱ्या व्यक्तींच्या कारवायांवरही यंत्रणेने लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
लातूर जिल्ह्यातील उदगीरमधील कथित ‘पैशांचा पाऊस’ प्रकरण अंधश्रद्धेच्या धोकादायक स्वरूपाची आणखी एक झलक आहे. कोट्यवधी रुपये मिळवून देण्याच्या आमिषातून अघोरी विधी आणि बळी देण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले. पोलिस आणि जागरूक नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. दोन महिन्यांपूर्वी ही घटना घडली होती. उदगीरमध्ये तेलंगणामधून आणलेल्या मुलीचा १५ ते २० कोटींचा पाऊस पाडण्यासाठी बळी देण्याचा प्रयत्न झाला होता. पोलिस आणि जागरूक नागरिकांमुळे हा प्रकार टळला. तेलंगणातील या मांत्रिकाने आंध्र प्रदेशातील एका पंधरावर्षीय मुलीचा त्यासाठी वापर करण्याचे ठरविले होते. पैशाचा पाऊस पाडण्यासाठी लक्ष्मीपूजेचा कथित अघोरी विधी करण्याची तयारी करण्यात आली होती. पण ही माहिती पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर तातडीने हालचाली झाल्या आणि पूजा विधी बारगळला. या गुन्ह्यात १५ जणांना पकडले असून, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांत टोळीच सक्रिय असल्याचे उघड झाले. पैसा मिळविण्याची हाव आणि झटपट श्रीमंतीचे स्वप्न यांचा गैरफायदा घेऊन भोंदूगिरी करणारे लोक किती दूर जाऊ शकतात, याचे हे उदाहरण आहे.
धाराशिवच्या भूम तालुक्यात आजार आणि भूतबाधा बरी करण्याच्या नावाखाली कथित दरबार भरत असल्याचेही समोर आले आहे. आजारावर वैद्यकीय उपचार घेण्याऐवजी अशा तथाकथित उपचारांकडे नागरिक वळत असतील, तर त्यातून आरोग्याचेही गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्याहून चिंतेची बाब म्हणजे अशा प्रकारांविरोधात आवाज उठविणाऱ्या कार्यकर्त्यांनाच धमक्या दिल्या जातात. नांदेडमधील अंधश्रद्धाविरोधी कार्यकर्ते कमलाकर जमदाडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे प्रकरण त्यामुळे अधिक गंभीरपणे पाहण्याची गरज आहे. अंधश्रद्धा ही केवळ ग्रामीण किंवा अशिक्षित समाजाची समस्या आहे, असे समजणेही चुकीचे आहे. शिक्षण वाढले, तंत्रज्ञान हाताशी आले आणि माहितीचे स्रोत विस्तारले तरी भीती, असहायता, आजार, कौटुंबिक अडचणी, आर्थिक संकटकाळात माणूस चमत्काराच्या आश्रयाला जातो. नेमकी हीच मानसिकता भोंदूबाबांसाठी संधी ठरते. म्हणूनच भोंदूगिरीविरोधातील लढा केवळ पोलिसांवर सोपवून चालणार नाही. समाजाने अशा दाव्यांकडे चिकित्सक नजरेने पाहणे, संशयास्पद प्रकारांची माहिती प्रशासनाला देणे आणि पीडितांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे.
शाळा-महाविद्यालयांत वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोपासना, सामाजिक संस्थांची जनजागृती आणि पोलिसांची तत्पर कारवाई यांचा समन्वय झाला पाहिजे. श्रद्धा ठेवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. परंतु श्रद्धेच्या नावाखाली फसवणूक, शोषण किंवा हिंसा करण्याचा अधिकार कोणालाही नाही. भोंदूबाबांचा प्रश्न हा केवळ काही व्यक्तींचा प्रश्न नाही; तो समाजाच्या विवेकबुद्धीसमोरील आव्हान आहे. अशोक खरात प्रकरणाची चर्चा ओसरल्यानंतर पुन्हा त्याच अंधारात नवी भोंदूगिरी फोफावू नये, यासाठी आता केवळ चर्चा नव्हे, तर सातत्यपूर्ण आणि कठोर सामाजिक व कायदेशीर कृतीची गरज आहे.