ए. जी. नुराणी : ज्ञानदर्शी विश्लेषक

ए. जी. नुराणी यांच्या लिखाणाचा व्याप आणि आढावा खूप मोठा
A. G. Nurani : Insightful analyst
ए. जी. नुराणीPudhari File Photo
Published on
Updated on
शिवाजी राऊत

भारतीय पत्रकारितेमध्ये धर्मनिरपेक्षता, समानता आणि प्रागतिक विचारसरणी यासाठी पत्रकारिता करण्याचे उद्दिष्ट ठेवून निरंतर कार्यरत राहणारी मूल्येही स्वातंत्र्यपूर्व काळात आणि त्यानंतरही काही दशके तशीच राहिली. स्वातंत्र्योत्तर काळात या मूल्यांसाठी सतत विविध ज्ञान शाखांचा अभ्यास करून एक पत्रकारांचा पत्रकार बनलेले अब्दुल गफूर नुराणी अर्थातच ए. जी. नुराणी या वैचारिक लेखन करणार्‍या भारताच्या श्रेष्ठ वकिलाचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करताना अनेक प्रश्न मनात उभे राहतात.

ए. जी. नुराणी हे व्यक्तिमत्त्व संघर्षातून, त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातून, त्यांनी दीर्घकाळ केलेल्या लेखनातून समजावून घेणे हे नव्या पत्रकारितेचे उद्दिष्ट असले पाहिज. एक बहुविध विषयाचा ज्ञानवंत वकील, चरित्रकार, इतिहासकार आणि राजकीय विश्लेषक या बहुविध भूमिका एकाच आयुष्यात निभावणारे नुराणी एक आदर्श पत्रकार, आदर्श इतिहासकार, आदर्श राजकीय विश्लेषक म्हणून समकालीन पिढीला सतत आदर्श ठरतील. सुप्रीम कोर्टात वकिली करणारे नुराणी हे मुंबई सुप्रीम कोर्टातही वकिलीचे प्रॅक्टिस दीर्घकाळ करीत होते. त्यांच्या लिखाणाचा व्याप आणि आढावा खूप मोठा आहे.

नुराणी यांनी भारत-पाक फाळणीबद्दल म्हटले होते की, जगातील दहा ऐतिहासिक चुकांमधील भारत-पाक फाळणी होय. नुराणी हेच भारत आणि पाकिस्तानच्या सांस्कृतिक एकात्मतेचे अभ्यासक असल्यामुळेच त्यांनी हे वक्तव्य केले होते. माजी राष्ट्रपती हमीद अन्सारी आणि नुरानी यांची मैत्री ही अनेक देशांतील आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासाच्या चर्चातून द़ृढ झाली होती. नुरानी हे राजकारण्यांपेक्षा वैचारिक क्षेत्रातील भाष्यकारांना, विचारवंतांना खूप आदर देत असत, याची आठवण करून देऊन अन्सारी म्हणाले होते की, नुराणी यांचे काश्मीर व पाकिस्तानवरील लेखन खूपच मौलिक ठरले आहे. नुराणी यांनी ‘काश्मीरवाद 1947 ते 2012’, ‘घटनेचे 370 वे कलम’, ‘भारतीय घटनेचा इतिहास’, ‘जम्मू आणि काश्मीर’, ‘भारतीय घटनेचे वादविवाद’, ‘राष्ट्रपती राजवट’, ‘शहीद भगतसिंगाचा खून खटला’, ‘हैदराबादचा विध्वंस’, ‘बाबरी मशिदीने उपस्थित केलेले प्रश्न’, ‘बद्रुद्दीन तय्यबजी यांचे चरित्र’, ‘झाकीर हुसेन यांचे चरित्र’ यासारखी अनेक पुतस्के लिहिली आहेत. बहुविध विषयांचा अभ्यास, तार्किक विचार पद्धती, घटनांचा खोल अभ्यास करणे व सर्व तपशिलवार घटक समजावून देणे हे नुराणी यांच्या लेखन शैलीचे वैशिष्ट्य होते. जात, धर्म व सर्व प्रकारच्या मतभेदापलीकडे जाऊन विचारसरणीच्या आग्रहाचे नुराणींचे व्यक्तिमत्त्व कायम महत्त्वाचे वाटत होते, असे लेफ्ट वर्ल्डचे व्यवस्थापकीय संचालक सुधन्वा देशपांडे यांनी सांगितले. पत्रकार लैला बावधम या नुराणी यांच्या लेखन शैलीबद्दल म्हणतात की, नुराणी हे उत्कृष्ट पेन व कागद वापरत. त्यांच्या लेखनातील वैचारिकता आणि सखोलता विचार करायला लावणारी आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, नुराणी यांच्या जीवनात दीर्घकाळ सहायक म्हणून काम करणारे कयूम म्हणतात की, ते लेखन केल्याशिवाय जेवत नसत, इतके ते लेखनात मग्न असत. लेखन हेच त्यांचे अन्न झाले होते. न आवडणार्‍या लोकांपासून ते सतत दूर राहत असत. अनावश्यक मैत्री ते कधीच करत नसत.

नुराणी यांच्या पत्रकारितेचा आदर्श आजची पत्रकारिता समोर ठेवेल का? भारतीय पत्रकारिता धर्मनिरपेक्ष या ऐतिहासिक संदर्भाच्या आधारे लेखन करणारी, घटनेच्या मूल्यांचा पाठपुरावा करण्यासाठी वृत्तांकन करणारी, जातीय दंगलींच्या कारणाचा शोध घेणारी व राजकारणातील अंतरंग उघड करणारी अशी निर्माण होण्याची खूप गरज आहे. अशावेळी भारतीय हिंदू- मुस्लीम संस्कृतीचा संदर्भ घेऊन त्यासाठी लेखन करणारी पत्रकारिता निर्माण व्हायला हवी आहे. नुराणी यांच्या सुमारे तीन दशकांच्या लेखन, वाचनाच्या प्रभावातूनच नवा पत्रकार घडवता येतो. म्हणूनच नुराणी हे पत्रकारांचे पत्रकार ठरले आहेत. त्यांच्या स्मृतीला, ज्ञानदर्शी व्यक्तिमत्त्वाला, संविधान मूल्यांच्या अथक विश्लेषणाला सर्वदूर पोहोचवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news