

युवराज इंगवले
एखादी गोष्ट मनावर घेतली, त्याद़ृष्टीने मेहनत घेतली, तर नक्कीच यश मिळते. त्याचेच उत्तम उदाहरण म्हणजे तुर्कियेतील हिकमत काया. एक वन अधिकारी असलेले काया यांची कथा आज जगभर प्रेरणेचा स्रोत बनली आहे. सोशल मीडियावर त्यांचे छायाचित्र वेगाने व्हायरल झाले आहे. त्यामध्ये ते 1978 मधील एक जुना फोटो हातात धरून उभे आहेत.
त्या जुन्या फोटोमध्ये त्यांच्या मागे ओसाड, उजाड आणि निर्जीव टेकड्या दिसतात; पण आज त्याच ठिकाणी दाट, हिरवेगार जंगल पसरलेले आहे. हा बदल अचानक घडलेला नाही. सुमारे 41 वर्षांच्या सातत्यपूर्ण परिश्रमांमुळे हिकमत काया यांनी 3 कोटींहून अधिक झाडे लावली आणि सुमारे 25,000 एकर नापीक जमिनीचे समृद्ध जंगलात रूपांतर केले. हा कायापालट तुर्कियेच्या सिनोप प्रांतातील बोयाबत जिल्ह्यात झाला आहे. एकेकाळी या भागात मातीची धूप इतकी तीव— होती की, पूर आणि दुष्काळ या समस्या नेहमीच्या झाल्या होत्या. 1978 मध्ये काया हे बोयाबत येथे वन संचालन प्रमुख म्हणून रुजू झाले. त्या काळात परिसरातील टेकड्या पूर्ण ओस पडलेल्या होत्या. ना झाडे, ना हिरवळ. केवळ दगड आणि सैल माती. परिस्थिती अत्यंत गंभीर होती. राज्याच्या पाठबळाने त्यांनी पुनर्वनीकरण प्रकल्पाची सुरुवात केली; परंतु त्यांची द़ृष्टी अल्पकालीन नव्हती. त्यांनी दीर्घकालीन नियोजन केले.
दरवर्षी नवी रोपे लावणे, त्यांची नियमित निगा राखणे, चरणार्या जनावरांपासून आणि आगीपासून संरक्षण करणे, तसेच मातीची धूप रोखणे, या सर्व बाबींचा त्यांनी काटेकोर विचार केला. त्यांनी हे काम एकट्याने केले नाही. सहकार्यांसह स्थानिक ग्रामस्थांनाही सहभागी करून घेतले. गावकर्यांनीही उत्साहाने पुढाकार घेत रोप लागवड आणि देखभालीत हातभार लावला. सुमारे 20 ते 25 वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी 3 कोटींहून अधिक रोपे लावली.
निवृत्तीनंतरही त्यांचा उत्साह कमी झाला नाही. ते गावकर्यांसोबत काम करत राहिले. त्यांच्या चिकाटीमुळे आज तो परिसर केवळ हिरवागार झाला नाही, तर जैवविविधतेने समृद्ध झाला आहे. आज त्या जंगलात कोल्हे, रानडुक्कर, ससे आणि अगदी अस्वलही दिसू लागले आहे. पूर्वी पूर आणि मातीची धूप होत असल्याने त्रस्त असलेला हा भाग आता स्थिर झाला आहे. जंगलामुळे माती घट्ट बांधली गेली. पाण्याची पातळी सुधारली आणि पर्यावरण अधिक सक्षम बनले आहे.
काया यांनी एकदा म्हटले होते की, या सर्व ओसाड टेकड्या जंगलात रूपांतरित झाल्या, हीच माझ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बाब आहे. यासाठी त्याग, मेहनत आणि मानवतेप्रती प्रेम आवश्यक होते. त्यांचे वय आता 80 वर्षांच्या आसपास आहे, तरीही ते अद्याप कार्यरत आहेत. तुर्कियेमध्ये जिथे जंगलतोडीमुळे वनक्षेत्र कमी होत आहे, तिथे काया यांची कथा आशेचा किरण ठरते. सरकारी यंत्रणा आणि वैयक्तिक समर्पण यांची सांगड घातल्यास किती मोठा सकारात्मक बदल घडवून आणता येतो, याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. एक व्यक्तीची दूरद़ृष्टी, सातत्य आणि समाजाच्या सहभागामुळे निसर्ग पुन्हा फुलू शकतो, हे काया यांच्या कार्यातून स्पष्ट होते.