Uri Terror Attack | उरी हल्ल्याची दशकपूर्ती अन्‌ नवा भारत

Uri Terror Attack |
Uri Terror Attack | उरी हल्ल्याची दशकपूर्ती अन्‌ नवा भारत
Published on
Updated on

डॉ. हर्षवर्धन यादव

उरीच्या जखमेने भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेची दिशा बदलली आणि संयमाच्या भूमिकेतून निर्णायक प्रतिकाराच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. दहशतवादाला प्रत्युत्तर देण्याच्या रणनीतीपासून संरक्षण, मुत्सद्देगिरी आणि तंत्रज्ञानातील बदलांपर्यंत ‘नवा भारत’ आज अधिक सुरक्षित, सतर्क, आक्रमक आणि आत्मनिर्भर बनत आहे.

१८ सप्टेंबर २०१६ ची काळी पहाट भारत कधीही विसरू शकत नाही. जम्मू-काश्मीरमधील उरी येथील भारतीय लष्कराच्या प्रशासकीय मुख्यालयावर ‘जैश-ए-मोहम्मद’च्या चार दहशतवाद्यांनी केलेला हल्ला हा भारताच्या सार्वभौमत्वावर आणि आत्मसन्मानावर झालेला मोठा आघात होता. या हल्ल्यात महाराष्ट्राच्या ५ सुपुत्रांसह डोग्रा व बिहार रेजिमेंटचे एकूण २० जवान शहीद झाले. आज या घटनेला १० वर्षे पूर्ण होत असताना, उरी हल्ला हा केवळ एका शोकांतिकेची आठवण करून देत नाही; तर तिथून पुढे भारताने आपल्या संरक्षण, रणनीती आणि परराष्ट्र धोरणात केलेल्या ऐतिहासिक व मूलभूत बदलांची साक्षही देतो.

उरी हल्ल्यानंतर अवघ्या दोनच आठवड्यांत, २८-२९ सप्टेंबर २०१६ च्या मध्यरात्री भारतीय पॅरा कमांडोजने नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रवेश केला. दहशतवाद्यांचे अनेक लाँच पॅडस्‌ उद्ध्वस्त करत भारतीय सैन्याने स्वतःची कोणतीही जीवितहानी होऊ न देता ३५-४० दहशतवाद्यांचा सफाया केला. हा ‘सर्जिकल स्ट्राईक’ भारताचा केवळ एक यशस्वी लष्करी विजय नसून ‘भारत आता गप्प बसणार नाही; गरज पडल्यास शत्रूच्या घरात घुसून मारेल,’ असा जगाला दिलेला एक स्पष्ट व कठोर संदेश होता. पुढे २०१९ मधील पुलवामा हल्ल्यानंतरचा ‘बालाकोट एअरस्ट्राईक’ आणि २०२५ मधील ‘ऑपरेशन सिंदूर’ हे याच बदललेल्या ‘न्यू नॉर्मल’, दहशतवादविरोधी ‘झिरो-टॉलरन्स’ आणि ‘ऑफेंसिव्ह डिट्रन्स’ धोरणाचे पुढील टप्पे ठरले.

१९९८ च्या अण्वस्त्र चाचणीनंतर भारताने बहुतांशी ‘स्ट्रॅटेजिक रिस्ट्रेंट’ या सिद्धांताचा अवलंब केला होता. यामध्ये सीमेपलीकडून होणाऱ्या कारवायांना उत्तर देताना लष्करी बळाऐवजी मुत्सद्दी इशारे देणे, आंतरराष्ट्रीय स्तरावर निषेध नोंदवणे आणि पुरावे देणे यावर भर दिला जात असे. परंतु, उरी हल्ल्यानंतर भारताने या पारंपरिक चौकटीला छेद देत ‘प्रोॲक्टिव्ह डिट्रन्स’ (शत्रूच्या हल्ल्याची वाट न पाहता, त्याचा संभाव्य धोका आधीच रोखण्यासाठी आक्रमक पावले उचलणे) आणि ‘कॅलिब्रेटेड कोअर्सिव्ह कॅपेबिलिटी’ (शत्रूला आक्रमकतेची किंमत मोजावी लावण्यासाठी योग्य प्रमाणात, अचूक व मोजक्याच लष्करी बळाचा वापर करणे, जेणेकरून पूर्ण युद्ध न पेटता शत्रूवर दबाव निर्माण होईल) या सिद्धांतांना प्राधान्य दिले. याशिवाय, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या ‘ऑफेंसिव्ह-डिफेंसिव्ह’ धोरणाचा वापर करत भारताने पाकिस्तानच्या आण्विक धमक्यांचा फुगा फोडला. याच पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याने आपल्या युद्धतंत्रात आमूलाग्र बदल घडवून आणला असून, पूर्वीच्या ‘कोल्ड स्टार्ट’ची जागा ‘कोल्ड स्ट्राईक’ या नव्या सिद्धांताने घेतली आहे. ‘कोल्ड स्ट्राईक’ रणनीतीनुसार शत्रूच्या आण्विक मर्यादेखाली राहून जलद आणि निर्णायक कारवाई केली जाते. यात शत्रूचा प्रदेश व्यापण्याऐवजी पूर्व-तैनात एकात्मिक युद्ध गट (आयबीजी’ज), सायबर, हवाई, जमीन, सागरी आणि इलेक्ट्रॉनिक युद्धाच्या एकात्मिक वापराद्वारे शत्रूची यंत्रणा तत्काळ निष्क्रिय करून मर्यादित राजकीय उद्दिष्टे साध्य केली जातात. ‘रुद्र ब्रिगेडस्‌’ आणि ‘भैरव कमांडो युनिट’ची निर्मिती ही याचीच ठळक उदाहरणे आहेत.

लष्करी आक्रमकतेला राजनैतिक मुत्सद्देगिरीची जोड देत भारताने ‘दहशतवाद आणि प्रादेशिक सहकार्य एकत्र चालू शकत नाहीत’ ही कठोर भूमिका मांडली. नोव्हेंबर २०१६ मध्ये इस्लामाबाद येथे प्रस्तावित १९ वी सार्क परिषद रद्द होणे, ‘रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही’ म्हणत १९६० च्या सिंधू पाणीवाटप कराराचा पुनर्विचार करणे, २०१९ मध्ये पाकिस्तानचा ‘सर्वाधिक पसंतीचा देश’ (एमएफएन) दर्जा काढून घेत सीमापार व्यापारावर अत्यंत कडक निर्बंध लादणे आणि ‘एफएटीएफ’ च्या मंचावरून पाकिस्तानला प्रदीर्घ काळ ‘ग्रे लिस्ट’मध्ये ठेवणे, या सर्व पावलांनी पाकिस्तानची मोठी आर्थिक व राजकीय कोंडी करण्यात आली. उरी हल्ल्याच्या विश्लेषणादरम्यान उघडकीस आलेल्या त्रुटींमधून धडा घेत भारताच्या सुरक्षा संरचनेत अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले. ज्यामध्ये आणीबाणीच्या प्रसंगी भूदल, नौदल आणि वायुदल यांमधील समन्वयाचा अभाव दूर करण्यासाठी ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ची नियुक्ती व ‘एकात्मिक थिएटर कमांड्स’ची आखणी करण्यात आली. केंद्रीय आणि राज्य यंत्रणांमधील माहितीची देवाणघेवाण जलद करण्यासाठी ‘MAC-SMAC’ ही एकात्मिक गुप्तचर प्रणाली सक्षम करण्यात आली. ‘यूएपीए (२०१९)’ दुरुस्तीद्वारे व्यक्तींना थेट दहशतवादी घोषित करण्याचे अधिकार देण्यात आले. ‘एनआयए’चे अधिकार व क्षमता वाढवण्यात आली. दहशतवाद्यांचे आर्थिक जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी दहशतवादी वित्तपुरवठाविरोधी कठोर कारवाई सुरू करण्यात आली. शिवाय, फेब्रुवारी २०२६ मध्ये निर्मिलेल्या ‘प्रहार’ आराखड्याअंतर्गत प्रतिबंध, तत्पर प्रतिसाद, संपूर्ण प्रशासकीय समन्वय आणि सर्वसमावेशक सामाजिक सहभाग या चार प्रमुख स्तंभांची सांगड घालण्यात आली.

उरी घटनेनंतर नियंत्रण रेषेच्या २० किलोमीटरच्या परिघातील सर्व लष्करी तळ व ब्रिगेड मुख्यालये पक्क्या आणि अग्निरोधक स्ट्रक्चर्समध्ये परावर्तित केली आहेत. सीमेवर ‘कॉम्प्रेहेन्सिव्ह इंटिग्रेटेड बॉर्डर मॅनेजमेंट सिस्टीम’ लागू करून थर्मल इमेजिंग, कॅमेरे, सेन्सर्स, रडार, रीअल-टाईम सॅटेलाईट सर्व्हिलन्स आणि अत्याधुनिक ड्रोन नेटवर्कद्वारे स्मार्ट फेन्सिंग केली आहे. यामुळे प्रतिकूल हवामानात आणि दुर्गम भूप्रदेशातही सीमेवरील घुसखोरीचे प्रयत्न वेळीच शोधून उधळून लावणे शक्य झाले आहे.

दहशतवादविरोधी या कठोर उपायांचे दृश्य परिणाम जम्मू-काश्मीरमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहेत. पीआयबीच्या माहितीआधारे, दहशतवादी घटनांमध्ये लक्षणीय घट झाली असून, जम्मू-काश्मीरमधील हिंसाचार, नागरिकांचे मृत्यू आणि सुरक्षा दलांची जीवितहानी अत्यंत कमी झाली आहे. दगडफेक, संप आणि बंद पूर्णपणे बंद झाल्याने परिसरात सामान्य परिस्थिती बहाल झाली आहे. या शांततेमुळे वाढती गुंतवणूक, विकासप्रकल्प निर्मिती आणि पर्यटकांचे आगमन याद्वारे प्रदेशाचे आर्थिक पुनरुज्जीवन झाले असून, जनता आणि शासनामधील विश्वास अधिक दृढ झाला आहे. अलीकडेच जागतिक स्तरावर १ सप्टेंबर २०२६ च्या बिश्केक येथील ‘एससीओ’ परिषदेत आणि १२-१३ सप्टेंबर २०२६ रोजी नवी दिल्लीत पार पडलेल्या १८ व्या ‘ब्रिक्स’ परिषदेतील ‘दिल्ली जाहीरनाम्यात’ भारताने दहशतवादाविरुद्ध जागतिक कटिबद्धतेवर ठामपणे भर दिला आहे .तथापि, पारंपरिक युद्धात पराभव उघड असल्याने पाकिस्तानने ड्रोन्सच्या साहाय्याने हत्यारे-अंमली पदार्थांची तस्करी, माहिती युद्ध, सायबर हल्ले आणि डिजिटल नेटवर्कचा वापर करत ‘ग्रे-झोन युद्ध पद्धतीचा’ आश्रय घेतला आहे. या आव्हानांचा सामना करण्यासाठी भारताला कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर डिफेन्स आणि क्वांटम तंत्रज्ञान आधारित सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत करावी लागणार आहे. उरी हल्ल्याची दशकपूर्ती ही केवळ हुतात्मा सैनिकांच्या बलिदानाचा शोक करण्याचा दिवस नाही, तर तो भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या पुनरुज्जीवनाचा टप्पा आहे. उरीच्या बलिदानातून जन्म घेतलेला ‘नवा भारत’ आज अधिक सुरक्षित, सतर्क, आक्रमक आणि आत्मनिर्भर बनत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news