

विजय जाधव
सातार्यातील 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भव्यतेने पार पडले, मात्र वैचारिक ठसा उमटवण्यात ते कमी पडले. अध्यक्षीय भाषणाने अपेक्षित मंथन घडवले नाही. काही महत्त्वाचे सामाजिक प्रश्न मांडले गेले, तरी साहित्य-समाजाच्या नात्यावर सखोल विचार अभावानेच झाला.
साहित्य रसिकांची अलोट गर्दी आणि उदंड उत्साहात पार पडलेले सातार्यातील 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तसे कोणत्याच कारणाने गाजले नाही; मात्र ते नेमके कशामुळे लक्षात राहिले, असा प्रश्न पडणे साहजिक. तो याचसाठी की, याधीच्या काही मोजक्या साहित्य संमेलनांशी त्याची तुलनाही आलीच आणि ती करायची झाली, तर उणे-अधिक याची दखल घ्यावी लागेल. संमेलनाच्या यश-अपयशावर झालेली साधकबाधक चर्चा आणि उमटलेल्या प्रतिक्रिया बाजूला ठेवता येणार नाहीत. साहित्यिकांच्या वर्तुळात त्यावर बाळगले गेलेले मौनही दुर्लक्षिता येणार नाही. संमेलनाच्या यशस्वितेबद्दल तसे बोलायला जागा नसली, तरी संमेलनाध्यक्षांच्या भाषणावर ती आहे.
संमेलनाचे नियोजन व्यवस्थापनकेंद्रित आणि नेटके झाले. मोठी गर्दी संमलनाकडे वळवणे आणि तिचे नियंत्रण करताना साहित्य मंडपात येणार्या एकाही रसिकाचा हिरमोड होणार नाही, याची आयोजक कार्यकर्त्यांनी घरच्या पाहुण्यासारखी काळजी घेतली. मराठी भाषा प्रत्येकाच्या मनामनात कशी जिवंत आहे आणि तिच्या भविष्याबद्दलची काळजी करताना तिच्या जतनासाठी कोणते सामूहिक प्रयत्न करता येतील, याचा धडा संमेलनाने घालून दिला. काही गोष्टी ठरवून सिद्ध करता येतात. प्रवाहाला योग्य ते वळण देता येते, याचा हा दाखला म्हणता येईल. हा धागा सांधताना सर्व स्तरांतील वाचक, रसिक, मराठीबद्दल कळवळा असणारे असंख्य लोक, नोंद घ्यावीच लागेल अशा संख्येने ‘जेन-झी’चा प्रतिनिधी हजर राहिला. संमेलनस्थळी ओसंडलेला उत्साह दिलासादायकच. ग्रंथ, पुस्तक विक्रीला मिळालेला मोठा प्रतिसाद वाचन संस्कृती आक्रसली; पण संपली नसल्याची साक्ष देऊन गेला. समाज, संस्कृती प्रवाही करणार्या भाषेबद्दल त्याच जाणिवेने केले गेलेले संघटित प्रयत्न कसे प्रभावी ठरू शकतात, याचे हे संमेलन म्हणजे सकारात्मक उदाहरण ठरावे.
एकीकडे हा संमेलन सोहळा डोलात पार पडला असताना याचे मुख्य आकर्षण असलेल्या संमेलनाध्यक्षांनी त्यांच्याकडून त्यांच्यावर प्रेम करणार्या, साहित्याबद्दलचे ममत्व बाळगणार्या रसिकांचे समाधान केले काय, याचीही चर्चा आवश्यक ठरते. संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची साहित्यिक कामगिरी नाकारता येणार नाही. ‘पानिपत’, ‘झाडाझडती’ या लोकप्रिय साहित्यकृतींसाठी वेडे झालेल्या वाचकांची पिढी आणि त्यांचे प्रतिनिधी साहित्य नगरीत दाखल होणे साहजिक होते. खास त्यांच्यासाठी आलेल्या रसिकश्रोत्यांच्या पदरी काय पडले? आजवरची मराठी साहित्य संमेलनं ही केवळ साहित्यिक व्यासपीठ न राहता राजकारण, समाजकारण, भाषा आणि विचारसरणीचे रणांगण ठरली आहेत. मराठी भाषेच्या जडणघडणीत, साहित्याच्या निर्मितीत संमलनांचे योगदान वादातीत. म्हणूनच काही अध्यक्ष त्यांच्या भाषणांमुळे, वादांमुळे किंवा धाडसी भूमिकांमुळे इतिहासात लक्षात राहिले. संमेलनाच्या आयोजनात कमी-अधिक होत असतेच; पण अध्यक्षांना या सार्याचा तोल सांभाळूनच संमेलनाचा हेतू सिद्ध करावा लागतो. अपेक्षा अधिक आयोजकांकडून नव्हेत, तर अध्यक्षांकडून असतात. शताब्दीवर्षात पदार्पण करणारे 99 वे संमेलन त्या अर्थाने महत्त्वाचे होते.
संमेलनाध्यक्षांनी संमेलनाची ‘आचारसंहिता’ काटेकोर पाळली खरी; पण त्यांनी नेमकी कोणती ‘विचारसंहिता’ मांडली किंवा त्यावर कोणता ऊहापोह केला? संमेलनाध्यक्षांमधला लेखक डावा की उजवा, असा त्यांनीच उपस्थित केलेला प्रश्न नंतर अनेकांना पडला असावा. सनदी अधिकारी असणे हे लेखकाचे विशेषण असू शकते; मात्र ते विश्वास पाटील यांना त्यांच्या अध्यक्षीय भाषणात लपवता आले नाही. त्यांनी त्याच थाटात आणि अभिनिवेशात ‘राजदरबारा’तील अनुभवांचा उल्लेख केला. महाराष्ट्रातल्या शेतकरी आत्महत्येपासून सर्कशीत प्राण्यांचा वावर बंद केल्यापर्यंत आणि पुस्तकावरील 18 टक्के जीएसटीपासून महाराष्ट्राच्या ‘समृद्धी’बद्दल त्यांनी काही मोजकेच पण मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचे विषय मांडले. तेही सत्ताधार्यांच्या तोंडादेखत. विशेषत: शेतकरी आत्महत्येकडे लक्ष वेधत त्यांनी हा प्रश्न संमेलनाच्या ऐरणीवर आणला. याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे लागेल. मराठी भाषेच्या अस्तित्वाच्या उरल्यासुरल्या खुणा जपण्यासाठी करावयाच्या यांत्रिक-तांत्रिक प्रयत्नांची चर्चा घडली खरी; मात्र टोकाचे ध—ुवीकरण सुरू असलेल्या ‘नव्या जगा’तील संवेदनशील माणसाच्या घुसमटीची नोंद झाली नाही.
साहित्य आणि समाज यांचा अन्वय काय असावा, साहित्याचे नेमके प्रयोजन काय, या अनुषंगाने रसिकांना समृद्ध करणारे मंथन घडावे, अशी आशा संमेलनांमधून असते. ती पूर्ण झाली का, हा प्रश्न सनातनच राहिला. वाचकाची ती खरी भूक असते. ती भागवणे दूरच, मावळत्या किंवा माजी संमेलनाध्यक्षांच्या भाषणाचा कोणताच दुवा यावेळी सांधला गेला नाही. घुंगरांच्या नादात लावणीचे बोल हरवून जावेत तसे! अध्यक्षांना त्यांच्या साहित्य संचिताबद्दल हे पद मिळाले. त्यावर घेतले गेलेले आक्षेप आणि व्यक्त केलेली मते बाजूला सारत त्यांनी मोठ्या धिराने अध्यक्षीय भाषणाची मांडणी करण्याचा प्रयत्न केला खरा; पण सन्माननीय मंचाची उंची त्याने खरेच किती वाढली, असा प्रश्न त्यांच्या काहीशा विस्कळीत, प्रभावशून्य आणि सभागृहातील अपवादाने वाजलेल्या टाळ्यांमुळे पडला नसावा काय? ही सारी नैतिक जबाबदारी त्यांचीच. मग, यावेळी काही माजी संमलनाध्यक्षांशी तुलना होते. त्यांच्या प्रगल्भता, आजूबाजूच्या धगधगत्या वास्तवाला कवेत घेणारे विचार आणि ठोस भूमिका समोर येतात. कणा लक्षात राहतो.
अनेक प्रश्न मागे ठेवून, साहित्यबाह्य चर्चेनेच संमेलन पार पडले. नव्या पिढीतील लेखकांना द्यावे किंवा मिळावे असे किमान वैचारिक खाद्य किती मिळाले, हाही प्रश्न निरुत्तर करणारा ठरला. ज्या भूमिका होत्या त्या मांडण्याची घाई झाली. त्यातही स्पष्टतेचा अभाव दिसला. ‘पानिपत’सारखा अस्सल ऐतिहासिक मराठी ऐवज जवळ असताना, जिथे इतिहास घडला त्या सातार्याच्या मराठी मुलखात विश्वासरावांची तलवार तळपली नाही, हे खरे! राजकारण्यांचा वावर आणि साहित्य संमेलने यावर आता नव्याने बोलण्यासारखे काही उरले नाही. दोन्ही घटकांनी सामोपचाराने मान्य केलेली ती एक व्यवस्था आहे. त्यामुळे ती स्वीकारूनच आता पुढे जावे लागेल; मात्र एक चांगले झाले, ज्यांची थेट जबाबदारी आणि उत्तरदायित्व आहे अशा सत्ताधार्यांसमोर काही कळीचे प्रश्न अध्यक्षांकडून तळमळीने मांडले गेले. त्याची चर्चा येत्या काळात होत राहील.
संमेलन सरले, उरले काय, सारस्वतांच्या राजधानीला सातारचा सांगावा काय, हा प्रश्न पुण्यातील आगामी संमेलनापर्यंत महाराष्ट्रातील तमाम वाचक, साहित्य रसिक, अभ्यासक, विचारवंतांच्या मनात घोळत राहील. कुलकर्णी काय आणि पाटील काय या जात विशेषत्वापेक्षा संमेलनाध्यक्षांनी साहित्याला दिले काय, हे महत्त्वाचे! जे फेकून द्या असे सांगायचे, ते कुरवाळायचे तरी किती? ही तर तोंडपाटीलकी झाली.