पर्यटनात नव्या संधींची चाहूल

पर्यटनात नव्या संधींची चाहूल

[author title="डॉ. जयंतीलाल भंडारी, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ" image="http://"][/author]

अलीकडेच जागतिक आर्थिक मंचाने प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक (टीटीडीआय) 2024 जारी केला असून त्यात 119 देशांच्या यादीत भारत 39 व्या स्थानावर आहे. 2019 मध्ये भारत 54 व्या स्थानावर होता. नव्या 'टीटीडीआय'च्या निर्देशांकात नैसर्गिक निकषांनुसार भारत सहाव्या तसेच संस्कृती, बाजारपेठ, आरोग्य उपचार आणि शिक्षणाच्या द़ृष्टीने प्रवासासाठी भारत नवव्या स्थानी आहे. किंमत प्रतिस्पर्धेच्या प्रकरणात (हवाई भाडे, फिरण्याचा, राहण्याचा, खाण्यापिण्याचा खर्च) 18 व्या, तर हवाई प्रवासातील स्पर्धेच्या बाबतीत 26 व्या आणि पायाभूत सुविधांच्या बाबतीत 25 व्या स्थानावर आहे. पर्यटन निर्देशांकांचे विश्लेषण पाहिल्यास स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण, इंटरनेट सुविधा आणि पर्यटनाचा सामाजिक आणि आर्थिक परिणाम यासारख्या निकषांवर भारताने आघाडी घेतल्याचे दिसून येते.

देशांतर्गत पर्यटनही वेगाने वाढत आहे आणि प्रामुख्याने धार्मिक पर्यटनात बूम आले आहे. देशांतर्गत पर्यटनस्थळी जागतिक पर्यटनाप्रमाणे सुविधा उपलब्ध करून दिल्यास आणि सौंदर्यीकरण केल्यास परदेशातील पर्यटनास प्राधान्य देणारे भारतीय देशातच फिरण्याबाबत उत्सुक राहतील. विशेष म्हणजे, जगाला सर्व प्रमुख पर्यटनस्थळांची ओळख ही खर्‍या अर्थाने निसर्ग सौंदर्याबरोबरच व्यावसायिक पद्धतीने तयार केलेल्या संग्रहालयानेही होते. शिवाय पायाभूत सुविधांची गुणवत्ता, सामान्यातील सामान्य पर्यटकांसाठीही उच्च गुणवत्तेची स्थानिक पातळीवरची परिवहन सेवा आणि वाजवी किमतीत निवासाची सोय, स्वच्छता तसेच सुरक्षित संचाराचीही गरज असते.

विशेष म्हणजे, जगातील सर्वाधिक परदेशी पर्यटक प्रामुख्याने फ्रान्स, स्पेन, अमेरिका, चीन आणि इटलीला जातात. याशिवाय सिंगापूर, व्हिएतनाम, थायलंड, इंडोनेशिया, हाँगकाँग, मलेशिया आणि संयुक्त अरब अमिरात (दुबई) यासारखे देशही आपल्या वैशिष्ट्यामुळे परदेशी पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात. आजही जगातील एकूण परकी पर्यटकांचा विचार केला, तर दरवर्षी दोन टक्क्यांपेक्षा कमी पर्यटक भारताला भेट देत असल्याचे निदर्शनास आले आहे. पर्यटन उद्योग भारताच्या जीडीपीत सुमारे 6 टक्के योगदान देतो; परंतु यात केवळ 8 कोटी नागरिक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे रोजगाराशी जोडले गेलेले आहेत. भारताकडे जगातील सर्वच पर्यटकांना आकर्षित करण्याची क्षमता आहे, यात कोणाचेही दुमत नाही; परंतु आपण अजूनही खूपच मागे आहोत. भारतात अनेक अनोखी पर्यटनस्थळे असून ती देशातील पर्यटन व्यवसायाला चालना देत आहेत. भारताच्या सांस्कृतिक वारशाने, संगीत, हस्तकला, खाद्यपदार्थांबरोबरच नैसर्गिक सौंदर्याने देशी आणि परदेशी पर्यटकांना नेहमीच भुरळ पाडली आहे.

सध्याच्या काळात पर्यटन क्षेत्रातील आघाडीचे देश आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळे असललेल्या शेजारील देशांकडून भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्याची चढाओढ लागली आहे. या देशांनी भारतीय नागरिकांची मानसिकता ओळखली आहे. अलीकडच्या काळात मध्यमवर्गीयांचे वाढते उत्पन्न आणि खर्च करण्याच्या प्रवृत्तीने त्यांच्यात परदेश पर्यटनांची आवड वाढली असून ही बाब शेजारील देशांनी ओळखली आहे. यामुळेच एकीकडे परदेशी पर्यटक भारताकडे संथ गतीने येत असताना भारतीय पर्यटकांच्या मात्र परदेशात उड्या पडत आहेत. सरकारने 4 डिसेंबर 2023 रोजी दिलेल्या माहितीनुसार, 2022 मध्ये भारतात आलेल्या परकी पर्यटकांची संख्या 85.9 लाख होती, तर त्याचवर्षी सुमारे दोन कोटी भारतीयांनी जगात भ्रमंती केली. 23 मे 2024 मध्ये प्रकाशित झालेल्या 'आरबीआय'च्या अहवालानुसार भारतीयांनी 2023-24 मध्ये परदेशात फिरण्यावर सुमारे 17 अब्ज डॉलर म्हणजेच 1.41 लाख कोटी रुपये खर्च केले. भारताची परदेशी पर्यटकांच्या आगमनाने कमाई वाढलेली असली, तरी भारतीयांकडून परदेशात जाण्यापोटी होणार्‍या खर्चाच्या तुलनेत परदेशी पर्यटकांकडून भारताला मिळणारा पैसा हा खूपच कमी आहे.

गेल्या दशकभरात देशांतर्गत पर्यटकांना, भाविकांना आणि परदेशी पर्यटकांना पर्यटनाचा अनुभव चांगला होण्यासाठी प्रयत्न केले जात असून त्याचबरोबर पर्यटन क्षेत्रात व्यापक पायाभूत सुविधा आणि त्याला जागतिक दर्जा देण्याचे काम केले जात आहे. पर्यटन बजेटमध्ये सातत्याने वाढ करण्यात आली. 2023 मध्ये जी-20 परिषदेच्या काळात देशातील कानाकोपर्‍यात झालेल्या दोनशेपेक्षा अधिक बैठकांत सहभाग घेण्यासाठी आलेल्या परदेशी प्रतिनिधी आणि पाहुण्यांना भारताच्या पर्यटनस्थळांचे दर्शन घडविले. यानुसार भारताला देशातील पर्यटन केंद्रांची जागतिक पातळीवर प्रसिद्धी आणि प्रचार करण्याची नामी संधी मिळाली. तसेच भारताची जगात वाढणारी पत आणि राजकीय पातळीवरची प्रतिष्ठा पाहता परदेशी पर्यटक भारतात येण्यासाठी अधिक उत्सुक असून ती एक नवीन संधी म्हणून समोर येत आहे. अशावेळी भारताच्या पर्यटन क्षेत्राला अधिक सक्रिय करावे लागेल. यासाठी केंद्र, राज्य आणि पालिकेला समन्वयाने काम करावे लागेल.

भारताच्या सांस्कृतिक वारशाने, संगीत, हस्तकला, खाद्यपदार्थांबरोबरच नैसर्गिक सौंदर्याने देशी आणि परदेशी पर्यटकांना नेहमीच भुरळ पाडली आहे. भारताकडे हिमालयाचा सर्वाधिक भाग असून विशाल समुद्र किनारा, राजस्थानातील वाळवंट, कच्छ येथे पांढर्‍या मिठाचे आगर, मध्य प्रदेश, कर्नाटकातील घनदाट जंगल, लडाखमधील कडाक्याची थंडी, देशाच्या कानाकोपर्‍यात युनोस्कोने निवडलेल्या वारसास्थळांसह अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यान, नैसर्गिक संपदा आहे. ताज्या पर्यटन निर्देशांकाच्या निमित्ताने काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या असून त्याकडे भारताने लक्ष दिल्यास देशांतर्गत पर्यटन व्यवसाय आणखी बहरू शकतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news