

मुरलीधर कुलकर्णी
दुसर्या महायुद्धाच्या काळात नाझी जर्मनीच्या ‘होलोकॉस्ट’ या क्रूर नरसंहाराचे सर्वात भीषण केंद्र म्हणजे पोलंडमधील ऑशविट्झ-बिर्केनाऊ छळछावणी. 1940 ते 1945 या काळात हिटलरच्या राजवटीत येथे 10 लाखांहून अधिक ज्यू धर्मीय, राजकीय विरोधक आणि युद्धकैद्यांना अत्यंत अमानवीय परिस्थितीत डांबून ठेवले गेले. 27 जानेवारी 1945 रोजी दुपारी 3 च्या सुमारास सोव्हिएत रशियाची लाल सेना (रेड आर्मी) या छावणीच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचली, तेव्हा सोव्हिएत सैनिकांना तिथे केवळ सात हजार जिवंत पण मरणासन्न अवस्थेतील लोक आढळले. नाझींनी जाताना पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता, तरीही तिथे सापडलेले सात टन मानवी केस, लाखो कपडे आणि चपलांचे ढीग हे एका भीषण ‘मृत्यूच्या कारखान्याची’ साक्ष देत होते. या ऐतिहासिक मुक्तीला 80 वर्षे पूर्ण झाली आहेत. आज आठ दशकांनंतरही ऑशविट्झचे ते लोखंडी दरवाजे आणि त्यावरील ‘आर्बिटल माख्त फ्राई’ ही अक्षरे छळाच्या त्या भीषण स्मृतींना जिवंत ठेवतात.
या 80 व्या स्मृतिदिनानिमित्त जगभरात महत्त्वाच्या शहरांत विविध कार्यक्रमांतून या हत्याकांडातील पीडितांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पोलंडमधील मुख्य सोहळ्यात बि—टनचे राजे तिसरे चार्ल्स, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, जर्मनीचे चॅन्सलर ओलाफ शोल्झ उपस्थित होते. पॅरिसमध्ये युनेस्कोच्या मुख्यालयात विशेष प्रदर्शनांचे आयोजन केले होते, तर वॉशिंग्टन डी. सी. येथील ‘होलोकॉस्ट मेमोरियल म्युझियम’मध्ये पीडितांच्या नावांचे वाचन झाले. लंडनमध्ये बि—टिश संसदेत विशेष स्मृती सभा झाली, तर इस्रायलमधील ‘याद वाशेम’ स्मारकात मेणबत्त्या प्रज्वलित करून मृतांचे स्मरण करण्यात आले. बेल्जियम आणि हंगेरीत शैक्षणिक संस्थांनी विशेष व्याख्याने आयोजित केली. ही जागतिक एकजूट हेच दर्शवते की, सोव्हिएत सैन्याने 80 वर्षांपूर्वी जगासमोर उघड केलेले हे अमानवीय सत्य जग कधीही विसरणार नाही.
हा इतिहास आजच्या पिढीला सांगणे अधिक गरजेचे झाले आहे. कारण, ही भीषणता प्रत्यक्ष अनुभवलेले ‘सर्व्हायव्हर्स’ आता आपल्यातून कमी होत आहेत. तिथे सापडलेल्या 600 मुलांपैकी काही जण आजही या आठवणी सांगण्यासाठी हयात आहेत. केवळ राजकीय स्वार्थासाठी एखाद्या समुदायाला लक्ष्य करणे किती भयानक ठरू शकते, याचे ऑशविट्झ हे जिवंत उदाहरण आहे. आज रशिया-युक्रेन असो वा मध्यपूर्वेतील संघर्ष, युद्धाच्या धगधगत्या ज्वाळांमध्ये सामान्य माणसाचे होणारे हाल पाहून ऑशविट्झची भीषणता पुन्हा पुन्हा डोळ्यांसमोर उभी राहते.
हा स्मृतिदिन साजरा करणे म्हणजे केवळ इतिहास आठवणे हा उद्देश नाही, तर त्या इतिहासातून धडा घेणे हा आहे. द्वेष हा किती भयानक असतो आणि तो लोकशाहीच्या मुळावर कसा येतो, हे ऑशविट्झने जगाला शिकवले. जेव्हा आपण या छळछावणीच्या भिंतींकडे पाहतो, तेव्हा तिथे मारल्या गेलेल्या निष्पापांच्या वस्तूंचे ढीग आपल्याला ओरडून सांगतात की, द्वेषाचा शेवट हा नेहमीच विनाशात होतो. 80 वर्षांनंतरही ऑशविट्झची ही धगधगती आठवण आपल्याला सावध करतेय की, शांतता ही गृहित धरण्याची गोष्ट नसून, ती टिकवण्यासाठी पुढच्या प्रत्येक पिढीला जागरूक राहावे लागेल. ‘पुन्हा कधीही नाही’ ही आता केवळ घोषणा न राहता ती प्रत्येक मानवाच्या वर्तणुकीचा भाग बनली, तर ती या हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.