प्रासंगिक : ‘हायटेक सुपरपॉवर’च्या दिशेने

प्रासंगिक : ‘हायटेक सुपरपॉवर’च्या दिशेने
Published on
Updated on

– महेश कोळी, संगणक अभियंता

भविष्यकाळाबद्दल भाकित करणे जवळजवळ अशक्य असले, तरीसुद्धा भविष्याबद्दल लोकांमध्ये एक प्रकारचे कुतूहल असतेच. येत्या 25 ते 30 वर्षांत म्हणजे 2050 पर्यंत भारताचे चित्र कसे असेल, याचे कुतूहल सर्व भारतीयांना असणे स्वाभाविक आहे.

वर्तमानाचे आकलन योग्य प्रकारे केले, तर भविष्याबाबतीत बर्‍याच अंशी अंदाज बांधता येऊ शकतो. इंटरनेटवर सर्च केले, तर दर पाच वर्षांनी किंवा दहा वर्षांनी भविष्याबाबतच्या हजारो प्रश्नांच्या निकषांवर जगाचा आढावा घेतला जात असल्याचे दिसून येईल. याच आधारावर किती दिवसांनी कोणत्या क्षेत्रात कोणते बदल घडून येतील, याबाबत अंदाज बांधले जातात. उदाहरणार्थ 2012-13 मध्ये भारतात असे मानले जात होते की, 2020 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था चीनला टक्कर देण्याच्या स्थितीपर्यंत पोहोचेल.

आता ही परिस्थिती आणखी काही वर्षांनी येईल, असा अंदाज वर्तविला जात आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी भारत ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकून जगातील पाचवी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनेल अशा स्थितीला पोहोचला होता; परंतु गेल्या दोन वर्षांत अर्थव्यवस्थेने बरीच घसरण अनुभवली. त्यामुळे जगातील सहावी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था हे स्थानही मोठ्या प्रयत्नांती आपण कायम राखू शकलो.

या घडामोडींवरून असा अंदाज बांधता येतो की, 2050 पर्यंत जगातील पहिल्या पाच क्रमांकात असेलच, किंबहुना तो पहिल्या तीन क्रमांकांमध्येही असू शकतो. 2050 पर्यंत भारतात 100 पेक्षा जास्त बुलेट ट्रेन धावत असतील आणि देशातील सर्व महानगरे सुमारे 50 टक्के वीज सौरऊर्जेपासून प्राप्त करू लागलेली असतील. रस्त्यांवर धावणार्‍या 100 टक्केनव्हे; पण 90 टक्के गाड्या विजेवर चालणार्‍या असतील. इंटरनेटचा वेग सध्याच्या वेगापेक्षा कितीतरी पटींनी अधिक असेल.

कोरोना काळाने आपले भविष्याबद्दलचे अनेक अंदाज बदलून टाकले आहेत. परंतु, काही अंदाज मात्र पहिल्यापेक्षाही अधिक स्पष्ट झाले आहेत. उदाहरणार्थ, शहरीकरणाचा वेग. 2050 पर्यंत भारताची 60 टक्के लोकसंख्या शहरांमध्ये स्थायिक झालेली असेल, हा अंदाज बदलला असून, 2050 पर्यंत 65 टक्के लोकसंख्या शहरी असेल, असे मानले जाऊ लागले आहे.

शेतजमिनीत आजच्या तुलनेत 20 टक्क्यांची घट झालेली असेल. परंतु, शेती उत्पादन मात्र 30 ते 40 टक्के वाढलेले असेल. वस्तुतः त्या काळापर्यंत शेतीचे मोठ्या प्रमाणावर आधुनिकीकरण आणि यांत्रिकीकरण झालेले असेल. पर्यावरणाची परिस्थिती सध्याच्या परिस्थितीपेक्षा काहीशी चांगली झालेली असेल. अर्थात, आपली लोकसंख्या मात्र त्यावेळी 161 कोटींवर गेलेली असण्याचा अंदाज आहे. सुमारे एक अब्ज लोकांना आरोग्य विम्याचे कवच प्राप्त झालेले असेल आणि विमा व्यवसाय हा देशातील सर्वांत मोठा उद्योगांमधील एक बनलेला असेल.

भारतात 2050 पर्यंत केवळ संगणक साक्षरताच 100 टक्केअसेल असे नाही, तर सामान्य साक्षरताही 100 टक्के झालेली असेल. प्रत्येक घरात लॅपटॉप असेल. अनेक घरांमध्ये तर 8 ते 10 लॅपटॉप असण्याची शक्यता आहे. एवढेच नव्हे, तर 2050 पर्यंत सुमारे अडीच अब्ज मोबाईल फोन असतील आणि ते सर्व कार्यरत असतील.

70 टक्के लोक लॅपटॉपमध्येच टीव्ही पाहतील आणि बिग बजेट चित्रपट त्यावेळी गायब झालेले असतील. छोटे-छोटे चित्रपट तयार होतील आणि त्यात वापरलेले तंत्रज्ञान मात्र अत्युच्च प्रतीचे असेल. परंतु, चित्रपट तयार करण्यात आज एवढा उत्साह नसेल. सांगण्याचे तात्पर्य असे की, 2050 मधील भारताच्या संभाव्य परिस्थितीवर आज जरी आपला विश्वास बसला नाही, तरी कमी-अधिक फरकाने हेच चित्र आपल्याला दिसू शकते.

भारत ही 2050 मध्ये जगातील एक मोठी ताकद असेल. भारत त्यावेळी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा कायमस्वरूपी सदस्य देश असेल. 2050 मध्ये भारत कमीत कमी 25 देशांच्या आरोग्य आणि शिक्षण व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावेल. देशात विजेची कमतरता नसेल आणि बेरोजगारीही जवळजवळ समाप्त झालेली असेल.

कारण, जगातील जवळजवळ 47 देशांची लोकसंख्या खूपच मोठ्या प्रमाणात घटलेली असेल किंवा अस्तित्वासाठीच झगडत असेल. भारतीय उपखंडातील पाकिस्तान आणि बांगलादेश हे दोन मोठे देश लोकसंख्येच्या समस्येतून काहीअंशी सावरून भारताशी मजबूत आर्थिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत असतील. भारताकडे रोजगारांची कमतरता नसेल. कारण, तोपर्यंत जगातील कमीत कमी 12 देशांना मनुष्यबळ पुरविण्याची जबाबदारी भारताने स्वीकारलेली असेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news