लवंगी मिरची : स्वच्छतादूत..! | पुढारी

लवंगी मिरची : स्वच्छतादूत..!

देशभर नुकताच स्वच्छतेचा फार मोठा उपक्रम हाती घेण्यात आला. महानगरे आणि महानगरपालिका सोडल्यास, सर्वत्र या स्वच्छतादूतांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे, असे दिसते. तो स्वच्छतादूत म्हणजे नागरी आणि ग्रामीण भागात मुक्तसंचार असणारी डुकरे होत. वन्यजीव सप्ताह साजरा करताना, या आधुनिक स्वच्छतादूताविषयी माहिती करून घेऊयात. आमच्या मनात प्रश्न पडतो की, बा डुकरा, तू नसतास तर? हा विचारच करवत नाही. तुझे या भारत देशावर अनंत उपकार आहेत. डुक्कर या प्राण्याची निर्मिती करणार्‍या सर्वसत्ताधीश परमेश्वराला प्रणाम. भारतामधील वाढणारी लोकसंख्या तुझ्या आरोग्याला पोषक अशी गलिच्छ व्यवस्था निर्माण करते म्हणून तूही तुझा वंश वाढविण्याच्या प्रक्रियेला गती दिलीस. शहरे बकाल झाली, खेडी अस्वच्छ झाली, याचा तुझ्याएवढा आनंद अन्य कोणत्या प्राण्याला झाला नसेल. सारा देश स्वच्छ असता, नगर परिषदांनी कचरा तत्काळ उचलला असता, कुठेही घाण राहिली नसती तर तू उपाशी मेला असतास. पण तुला माहीत होते की, जागोजागी उकिरडे उभे राहतील, गटारांमधील पाणी दिशा सापडेल तिकडे धावेल, घरातील खरकटे अन्न घराबाहेर फेकले की आपले कर्तव्य संपले, ही येथील नागरिकांची प्रवृत्ती आहे. तुला याची चीड आली आणि स्वच्छतेचे कंकण मुखी बांधून तू गावे स्वच्छ करणार्‍या कार्याला लागलास!

स्वच्छताप्रिय समाजसेवक तुझ्या अंगी संचारला. दिसेल तो कचरा साफ करण्याच्या कार्याला तू स्वत:ला जुंपून घेतलेस. निष्क्रिय झालेल्या नगर परिषदांमधील कर्मचार्‍यांना, सफाई कामगारांना तू‘मै हूं ना’ असे म्हणून दिलासा दिलास. त्यांनी तुझ्यावर विश्वास टाकून आठवड्याचे सात दिवस आणि वर्षाचे बाराही महिने सुट्टी घेतली. तू त्यांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ दिला नाहीस. ‘तू नसतास तर?’ याची कल्पनाच करवत नाही. उन्हाळ्यामध्ये उन्हाची तीव—ता वाढली की, जागोजागी साचलेले गटाराचे पाणी म्हणजे तुझ्या जलतरणिका झाल्या. तेथील चिखलामध्ये तू सहपरिवार लोळतानाचे द़ृश्य पाहून कुणालाही हेवा वाटवा. इतर प्राण्यांना वाचविण्यासाठी अभयारण्ये उभारून करोडो रुपये खर्च करावे लागतात. वाघांची संख्या दोन, चारांनी वाढली तर सारा देश आनंदित होतो. तू मात्र कुणाच्या भरवशावर बसला नाहीस. सार्‍या देशालाच तू वराह अभयारण्य करून घेतलेस.

गर्भधारणेचा कालावधी अंदाजे चार महिन्यांचा असतो आणि मादी एकावेळी आठ ते बारा डुक्करूटल्यांना जन्म देते. मादीच्या आयुष्यातील दोन तृतीयांश काळ गर्भ वाढविण्यात जातो, हे तुझ्या प्रजातीचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. नवजात पिलांचे वजन एक ते दोन किलो असते. एकाच बाळंतपणात आठ ते दहा बाळांना जन्म देणारी डुकरीण, आरोग्य ठणठणीत असेल तर पंचवीस पिलांना जन्म देऊ शकते. धन्य तुझी वंशवृद्धी! बा डुकरा, तुझे कार्य महान आहे आणि ते पूर्ण क्षमतेने पार पाडीत जा. आमची तशी विनंतीच आहे तुला. पुराणात ‘वराहावतार’ घेऊन तू वेगळा पराक्रम केला होतास. आज एकविसाव्या शतकात तुझा ‘स्वच्छतावतार’ तेवढाच महत्त्वाचा पराक्रम करीत आहे. मानवाने निर्माण केलेला गलिच्छपणा सुधारणार्‍या तुझ्या वेचक वृत्तीला आमचा सलाम! पण तुझ्यासारख्या प्राण्यावर विसंबून न राहता, देशाचा सजग नागरिक म्हणून सर्वांनी ‘स्वच्छतादूत’ होण्याची नितांत गरज आहे. तरच संपूर्ण देश स्वच्छ होईल, हे खरे!

संबंधित बातम्या
Back to top button