चिनी संशयकल्लोळाचा नवा अंक

चिनी संशयकल्लोळाचा नवा अंक
Published on
Updated on

चीनमधील अलिबाबाचे मालक जॅक मा, अनेक सिनेकलावंत यानंतर राजकीय नेत्यांचा अज्ञातवास हीदेखील आता नवी बाब राहिलेली नाही. जुलै महिन्यात चीनमधील परराष्ट्रमंत्री गायब झाले. दोन महिन्यांपूर्वी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी सैन्याच्या रॉकेट फोर्समधील दोन वरिष्ठ अधिकार्‍यांना घरचा रस्ता दाखवला होता. आता ऐन लढाईचे दिवस समोर दिसत असताना खुद्द संरक्षणमंत्री ली शांगफू हेच गायब झाले आहेत.

चीनच्या राजकारणात उच्च पदस्थांचे बेपत्ता होणे हे आता नित्याचेच झाले आहे. त्यामुळे चिनी हुकूमशहा राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे वर्णन आता 'आशियातील जादूगार' असेच केले जात आहे. एखाद्या रोमहर्षक कादंबरीप्रमाणे त्यांचे एकामागून एक सहकारी गायब होत आहेत आणि 'गायब आया, गायब आया, किसलिये आया? किसीको फसाने आया, किसीको डराने आया' असे एका कवितेत उपहासाने जे म्हटले होते ते आता चीनच्या बाबतीत खरे होताना दिसत आहे. चीनमधील अलिबाबाचे मालक जॅक मा, अनेक सिनेकलावंत यानंतर राजकीय नेत्यांचा अज्ञातवास हीदेखील आता तितकीच चिंतेची बाब बनून गेली आहे. जुलै महिन्यामध्ये चीनमधील परराष्ट्रमंत्री गायब झाले. दोन महिन्यांपूर्वी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी सैन्याच्या रॉकेट फोर्समधील दोन वरिष्ठ अधिकार्‍यांना घरचा रस्ता दाखवला होता. आता ऐन लढाईचे दिवस समोर दिसत असताना खुद्द संरक्षणमंत्रीच गायब झाले आहेत. चीनला सामरिक सामर्थ्याच्या बळावर तैवानचे एकीकरण करायचे आहे, शिवाय भारतीय सीमेवर चीनच्या हालचाली वाढत आहेत, अशा राजकीय द़ृष्टीने संघर्षशील कालखंडात संरक्षणमंत्री ली शांगफू हेच गायब होणे यामुळे चीनपुढे एक यक्षप्रश्न उभा राहिला आहे.

भारतामध्ये नुकत्याच झालेल्या जी-20 शिखर परिषदेला शांगफू यांनी उपस्थिती लावली होती. त्याचा संदर्भ त्यांच्या बेपत्ता होण्याशी जोडला जात आहे. तथापि, खोलात जाऊन पाहिल्यास चीनमधील वाढती अस्थिरता, अर्थकारणातील चढउतार आणि टांगता तैवानचा प्रश्न आपण आपले आसन सोडून बाहेर जावे, अशी परिस्थिती आजमितीला तरी जिनपिंग यांच्यापुढे नाही. कारण ते बाहेर गेल्यास त्यांचीही जागा कुणी बळकावेल की काय, अशी आजची चीनची स्थिती आहे. जिनपिंग यांनाही पॉलिट ब्युरो कधी अज्ञातवासात पाठवेल सांगता येत नाही. त्यामुळे खुद्द जिनपिंगच आहे त्या परिस्थितीत राजकारणाचे प्यादे मागेपुढे करून बुद्धिबळाचा खेळ चालवत आहेत.

ऑगस्ट महिन्याच्या शेवटी चीनचे संरक्षणमंत्री ली शांगफू यांना शेवटचे पाहिले गेले होते. तेव्हा त्यांनी आफ्रिकन देशांच्या सुरक्षा मंचावर मुख्य भाषणही दिले होते; परंतु व्हिएतनामचे शिष्टमंडळ आले असताना ते दिसले नाहीत. पुढे त्यांची अनुपस्थिती लक्षणीय राहिली. आता त्यांच्या बेपत्ता होण्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित राहिले आहेत. खरे तर संरक्षणमंत्री असताना सिंगापूर येथे जूनच्या सुरुवातीच्या काळात कांग्रीला डायलॉगमध्ये भाग घेतला होता. ते त्यांचे शेवटचे भाषण ठरले. आता जवळपास तीन आठवड्यांपासून ली शांगफू हे सार्वजनिक जीवनातून गायब झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण जगभरात याची चर्चा होत आहे. यासंदर्भातील वृत्त सर्वप्रथम अमेरिकेतील वॉल स्ट्रीट जर्नलने दिले आणि जगाचे लक्ष चीनमधील या नव्या घडामोडींकडे वळले. बि—टनमधील फायनान्शियल टाईम्स या वृत्तपत्रातील माहितीनुसार, या 65 वर्षीय चिनी संरक्षणमंत्र्याला सेवेतून अर्धचंद्र देण्यात आला असून त्यांना त्यांच्या घरी नजरकैदेत ठेवले आहे. तसेच चिनी अधिकार्‍यांकडून त्यांची गोपनीय चौकशीही करण्यात येत असल्याची चर्चा आहे. शांगफू यांच्यावर संरक्षण खरेदी प्रकरणात गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आल्याचीही चर्चा सुरू आहे. तथापि, या गैरव्यवहाराचे नेमके स्वरूप काय आहे ते अद्याप जगासमोर आलेले नाही. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या व्हिएतनामच्या संरक्षण अधिकार्‍यांबरोबर झालेल्या बैठकीपासूनही ली शांगफू यांना दूर ठेवण्यात आले होते.

चीनने तैवानच्या फुजियांग या प्रांतात प्रवेश करून काहीतरी आक्रमण करावे, अशा विशेष उपायांची तेथील सत्तावर्तुळात चर्चा होत असताना संरक्षणमंत्रीच गायब झाल्याने चिंता वाढली आहे. काही दिवसांपूर्वी तैवानभोवती 68 चिनी युद्धविमाने घिरट्या घालत असल्याचे आणि 10 चीनची नाविक जहाजे आपल्याभोवती फिरत असल्याचे वृत्त तैवानकडून दिले होते. या पार्श्वभूमीवर चिनी संरक्षणमंत्र्यांच्या गायब होण्याने तैवानने काहीसा सुटकेचा निःश्वास टाकल्याचे दिसत आहे.

चिनी राजकारणाचा इतिहास पाहिल्यास तेथील सत्ताधार्‍यांना नकोसा झालेल्या व्यक्तीला एखाद्या चुकीचे निमित्त करून अंधारात ढकलले जाते आणि त्याचे शुद्धीकरण झाले की, पुन्हा त्याला समाजासमोर आणतात. कारण सामूहिक समाजाची स्मृती अल्पकालीन असते, असे त्यांचे मत आहे. गायब झालेल्या ली शांगफू हे चिनी लष्करी अधिकार्‍यांचे पुत्र आहेत. त्यांच्या वडिलांना पीपल्स लिबरेशन आर्मीमध्ये महत्त्वाचे स्थान होते. मार्च 2023 मध्ये ली शांगफू यांची वेई फेंगे यांच्या जागी चीनचे नवीन संरक्षणमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये कम्युनिस्ट पार्टी काँग्रेसमध्ये केंद्रीय लष्करी आयोगाचा राजीनामा दिला होता. सरसेनापती असताना या पदावर त्यांनी संरक्षण मुत्सद्देगिरीच्या द़ृष्टीने महत्त्वाची कामे करावीत, अशी अपेक्षा असते. यामध्ये लष्कराची पुनर्रचना करणे, नूतनीकरण करणे अद्ययावतीकरण करणे आणि जागतिक स्तरावरील युद्धमोहिमांचे धोरण ठरवणे यांचा समावेश होतो. मागील जून महिन्यात सिंगापूरमध्ये झालेल्या परिषदेत त्यांची उपस्थिती अनेक जागतिक नेत्यांनी जवळून पाहिली होती, पण ते त्यांचे शेवटचेच मोठे राजकीय दर्शन झाले. बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांचीही त्यांनी भेट घेतली होती. ली शांगफू हे चीनमधील पाच स्टेट कौन्सिलपैकी एक होते. चिनी मंत्रिमंडळामध्ये संरक्षणमंत्रिपद हे अन्य मंत्र्यांपेक्षा अधिक महत्त्वाचे मानले जाते. अशा उच्च पदावर पोहोचल्यानंतर त्या व्यक्तीला गुप्तता, गोपनीयता, हेरगिरी अशा बाबतीत अत्यंत सावध राहावे लागते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news