लवंगी मिरची : कसा निवडावा उमेदवार? | पुढारी

लवंगी मिरची : कसा निवडावा उमेदवार?

लवकरच येऊ घातलेल्या लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुकांच्या संदर्भात आपल्या भारतीय आणि विशेषत: मराठी मतदारांचे प्रबोधन करण्याची जबाबदारी आमच्यावर कोणीही टाकलेली नसताना आम्हीच ती शिरावर घेतली. नको ती जबाबदारी शिरावर घेण्याची आम्हाला सवय आहे. आपले लोकप्रतिनिधी निवडताना मतदारांनी कोणते निकष लावले पाहिजेत, यासंदर्भात आज आपणास सविस्तर मार्गदर्शन करण्यात येत आहे. जरूर विचार करावा, ही विनंती!

उमेदवार निवडताना शक्यतो ब्रह्मचारी, अविवाहित पुरुष किंवा आजन्म कुमारिका यांना प्राधान्य दिल्यास राज्याचा आणि देशाचा गाडा चांगला चालू शकतो, हे तुमच्याही लक्षात येईल. सद्यस्थितीला आपले पंतप्रधान यांच्या पाठीशी कोणताही संसारिक व्याप नाही. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याही पाठीशी संसाराचे कुठलेही झेंगट नाही. त्यामुळे ही सर्व राज्ये आणि देश प्रगतिपथावर आहे, हे आधी समजून घेतले पाहिजे. आपला विचार मांडताना तो मुद्देसूद असला पाहिजे यावर आमचा भर असतो. त्या आमच्या शैलीला अनुसरून खालील मुद्दे मतदारांनी जरूर लक्षात घेतले पाहिजेत.

आजन्म ब्रह्मचारी/अविवाहित किंवा कायम कुमारिका उमेदवार असल्याचे बरेच फायदे संभवतात.

संबंधित बातम्या

1) अपत्ये नाहीत त्यामुळे भविष्यात स्वतःचा मुलगा किंवा मुलगी ते राज्यावर किंवा देशावर थोपवू शकणार नाहीत.

2) अहोरात्र एकच ध्यास असेल. कारण, कुटुंब नसल्यामुळे अन्य ताण नसतील. किराणा, औषधे, मुलांच्या वह्या, पुस्तके आणणे, त्यांचा अभ्यास घेणे, पालकसभांना उपस्थित राहणे अशी कामे त्यांच्या मागे नसतील.

3) गुडघे मजबूत असतील. कारण, शरीराचा बाक हा पाठीच्या कण्यावर अवलंबून असतो. विवाहित नसल्यामुळे मान ताठ आणि पाठीचा कणा मजबूत असल्या कारणाने सांधे भक्कम असतील. असे उमेदवार बरे राहतील.

4) बरेच लोक कार्यालय बंद होते म्हणून नाईलाजाने संध्याकाळी घरी परत जातात. या लोकांना कुठेही जाताना फ्रेश वाटत असणार. कारण, घरीदारी सर्वत्र सारखेच असणार आहे. घरी जाण्याची ओढ असणारे आणि संसारात गुरफटणारे लोक जनसेवेसाठी वेळ देऊ शकत नाहीत. सबब उमेदवाराला मत देताना या बाबीचा विचार मतदारांनी जरूर केला पाहिजे.

5) बायकोची भूणभूण, पोट्ट्यांचा कलकलाट, नातवंडांचे केकाटणे हे सर्व काही मागे नसल्याने या लोकांना सर्वत्र खुशीच खुशी असते.

6) शक्यतो उमेदवाराला भाऊच नसावा, असे पाहिले पाहिजे. अन्यथा निवडून आलेला भाऊ दिल्लीत किंवा मुंबईत कार्यरत असतो तेव्हा त्याची भावंडे मतदारसंघात दादागिरी करत असतात.

7) पैसे कमवायचे कुणासाठी हा प्रश्नच नसला पाहिजे असे उमेदवार निवडले पाहिजेत. पाठीशी संसार नाही, सबब मुले नाहीत आणि असे असेल, तर हे उमेदवार संपत्तीच्या बाबतीत निरिच्छ, निर्मोही असतात.

8) सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरचे जेवण नाही. घरी जेवणार्‍यांनी फार काही दिवे लावल्याचे ऐकिवात नाही.
वरील सर्व निकषांत बसणारा उमेदवार निवडलेला बरा राहील, असे वाटते.

Back to top button