लवंगी मिरची : वादळ

लवंगी मिरची : वादळ
Published on
Updated on

तुम्ही काय पण म्हणा तात्या; पण मोदी साहेबानी पार गाव पातळीपर्यंतचं राजकारण सगळं हलवून सोडलं बघा! आता बघा, अमित शहा साहेब मंजे मोदी साहेबांचा खासमखास माणूस. म्हणजे जसं राज कपूरला मुकेशचा आवाज फिट बसायचा, तसेच मोदी साहेब अन् शहा साहेब 'दो दिल एक जान' असेच हैत. त्यांनी घड्याळीवाला पक्ष फोडला. तिकडे मुंबईत काय झालं आसंल ते आसंल; पण इकडे आपल्या गावात त्याच्याने उलथापालथ सुरू झाली, त्याच्याकडे कोनाचं लक्ष गेलं नाही. काय सांगता येत न्हाई अण्णा. अहो, गेले चार वर्षे तुम्ही सरपंच आहात. तुम्हाला कशाचा धोका आहे? आपल्या ग्रामपंचायतमधी तुमच्याकडे मेजॉरिटी आहे. ज्याची मेजॉरिटी त्याची पोस्ट असते. त्याच्यामुळे मला तर वाटत नाही का, तुमच्या सरपंच पदाला काही धोका निर्माण झाला आहे म्हणून!

अरे तात्या, इथं आजघडीला कुणाचीच कोणती पोस्ट साबित नाही. म्हंजे बघ, सभापती, उपसभापती, मंत्री, संत्री यांना कुणालाच आपली पोस्ट राहील का जाईल, याची गॅरंटी नाही. सगळ्यांच्या काळजात कसं धडधड धडधड होतंय, तसंच माझ्या पण काळजामध्ये धडकी भरली आहे आसं झालंय. म्हंजे, आपलं सरपंचपद जाते का राहते, याचा विचार करता करता रात्र, रात्र डोळ्याला डोळा लागत नाही. तुम्हाला तर माहीतच आहे की, आपल्या गावच्या बारा पंचांपैकी सहा सेनेचे होते. त्यांच्यात फाटाफूट होऊन तीन उद्धव साहेबांबरोबर गेले अन् तीन शिंदे साहेबांबरोबर गेले. मी आपलं कसंबसं सगळ्यांना सांभाळून घेत सरपंचपद टिकवलं.

बाकीच्या पाच जणांमध्ये जे का घड्याळाचे होते त्यांच्यात फाटाफूट झाली. तीन दादा बरोबर गेले दोन ताईच्या मागे गेले. तवा पण माझं पद धोक्यात आलं होतं. मी ते कसंबसं बाबापुता करून सगळ्यांच्या नाकदुर्‍या काढून टिकवून ठेवलं. राह्यला एक अपक्ष, त्याचा रुबाब तर मुख्यमंत्र्याच्या वर राहते. कारण, सरपंच कोनालाबी करायचा असला, तरी त्याचं एक मत लाखमोलाचं असते. माझा अर्धा दिवस त्याच्या पुढे, पुढे करण्यात जातो. कवा कवा वाटते सोडून द्यावं हे राजकारण अन् गुमान आपली शेती करावी; पण सोडू वाटत न्हाई. जसं तंबाखूचं, बिडीकाडीचं व्यसन असतंय तसंच हे राजकारणाचं व्यसन आहे.

तुम्ही राजकारण सोडल्यावर आपल्या गावाच्या राजकारणात काहीच मजा राहणार नाही अण्णा! केवढा मान आहे तुम्हाला सगळीकडे. पार मंत्रालयात जरी पाय टाकला तुम्ही, तरी मुजरे झडतात तुमच्यासाठी. राजकारण सोडून असं कसं चालंल म्हंतो मी! आता येवढे वर्ष तुम्ही सरपंच आहात, पुढे जिल्हा परिषद सदस्य, मग अध्यक्ष होताल. येत्या दहा वर्षांत तुम्हाला आमदार झालेलं पाहायचं आहे आम्हाला. शिवाय पुढच्या इलेक्शनला तुमचा युवराज सरपंचपदावर बसवायचाय आपल्याला.

अरे तात्या, आमदारकी जाऊ दे, सरपंचपद टिकलं, तरी खूप झालं म्हंतो मी; पण तसं पाहिलं तर फार काही धोका होईल असं वाटत नाही. फुटलेले घड्याळवाले मंत्री, आमदार थोरल्या साहेबांचा आशीर्वाद घ्यायला गेले त्या दिवशी पेढेच वाटले मी. म्हटलं एकाच घरातली माणसं आहेत. आज ना उद्या एकत्र येतेलंच. आता भावकीचा वाद काय कुणात नसतो का? आज ना उद्या हा वाद मिटंल अन् समदे एकत्र येतीलच. त्याच्यामुळे आजघडीला सरपंचपदाला काही धोका आहे, असा विषय नाही; पण पुढे भविष्यात काय करावे, याचे नियोजन आताच करावे लागते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news