भारतीय टेलिकॉम टेक्नालॉजी आणि 6- जी इंटरनेट सेवा विकसित करण्यासाठी भारत 6-जी अलायन्स ही मोहीम नुकतीच लाँच करण्यात आली. दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात टेलीकॉम आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही घोषणा केली. येत्या काही आठवड्यात गुजरातमध्ये भारतातील पहिल्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचा शिलान्यास होणार आहे. आम्ही डेटा संरक्षण विधेयक तयार केले असून येत्या पावसाळी अधिवेशनात ते सादर होण्याची अपेक्षा वैष्णव यांनी व्यक्त केली.
दोन टप्प्यात होणार काम
भारत 6-जी नावाची एक संस्था तयार करण्यात आली आहे. ही संस्था लवकरच 6-जी इंटरनेट नेटवर्कसाठी चाचणी सुरू करणार आहे. औद्योगिक संस्था, अॅकेडमिक संस्था, राष्ट्रीय संशोधन संस्था आणि सरकारच्या सहकार्याने ही सेवा कार्यान्वित केली जाणार आहे. यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील संस्था सरकारला मदत करतील. 6-जी सेवा विकसित करण्यासाठी संशोधन आणि स्टार्ट-अप इकोसिस्टमचा वापर केला जाणार आहे. ही मोहीम दोन टप्प्यात पूर्ण केली जाईल. पहिला टप्पा 2023-2025 आणि दुसरा टप्पा 2025-2030 पर्यंत पूर्ण होईल. म्हणजे देशभरात 6-जी सेवा सुरू होईल.
5-जीच्या 2.70 लाख साईट तयार
भारताच्या 6-जी तंत्रज्ञानासाठी 200 पेक्षा अधिक पेटंट प्राप्त झाले आहे. यामुळे 2030 पर्यंत 6-जी तंत्रज्ञान आणि उत्पादन भारताला जगातील अग्रणी देश म्हणून ओळख निर्माण करून देईल. जगातील सर्वाधिक मोठ्या तीन 5-जी इकोसिस्टिममध्ये भारत सामील झाला आहे. देशात 5-जीच्या सुमारे 2.70 लाख साईट तयार झाल्या आहेत.
किती असेल 6-जीचा वेग
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, 6-जी सेवेची इंटरनेट स्पीड 5-जीपेक्षा 100 पटीहून अधिक असू शकते. म्हणजेच प्रति सेकंद 100 गीगाबाईट! 6-जी सेवेमुळे नेटफ्लिक्सचा 142 तासांचा कंटेंट केवळ एका सेकंदात डाऊनलोड केला जाऊ शकतो. 5-जी सेवा प्रत्येक सेकंदाला 10 गीगाबाईटपर्यंत स्पीड देऊ शकते, तर 6-जी सेवा सेकंदाला1 टेराबाईटपर्यंत स्पीड देऊ शकते.
मानवी जीवनावर काय परिणाम होईल?
6-जी सेवेमुळे ऑटोमेटिक पद्धतीने मेट्रो आणि अन्य गाड्या अगदी सहजपणे चालकाशिवाय चालवल्या जाऊ शकतात. या सेवेमुळे रोबोटचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढेल आणि औद्योगिक संस्थाच्या विकासास चालना मिळेल. ही सेवा आल्यानंतर अपडेटेड स्मार्टफोनचा वापर करावा लागेल. तसेच साइबार्ग आणि ब्रेन कॉम्युटरसारखे तंत्रज्ञान थेट मानवी शरीराशी जोडलेले असेल. साइबार्गचा अर्थ आहे चिप्स आणि अन्य तंत्रज्ञान मानवी शरीराशी फिट केले जाईल. या तंत्रज्ञानाद्वारे माणसाच्या कोणत्याही अवयवाला कोणत्याही मशीनच्या माध्यमातून बदलले जाऊ शकते.