चिनी हुकूमशाहीचा कलाकारांवर बडगा | पुढारी

चिनी हुकूमशाहीचा कलाकारांवर बडगा

चीनचे कम्युनिस्ट सरकार स्वत:ला खूपच असुरक्षित समजत असून, देशात आपल्याच लोकांवर विविध प्रकारचे निर्बंध घालून स्वत:ला सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. कम्युनिस्ट पक्ष किंवा सरकारविरुद्ध कोणीही आवाज करू नये किंवा रस्त्यावर उतरू नये, याची पुरेपूर खबरदारी चीनचे सरकार घेत आहे. एखादा कोणी सरकारविरुद्ध आंदोलन करण्याचा प्रयत्न करत असेल, तर कम्युनिस्ट पक्षाकडून त्याच्यावर कारवाई केली जाते आणि ताब्यात घेतले जाते.

काही दिवसांपूर्वीच चीनच्या कम्युनिस्ट सरकारने चीनमधील एक स्टँडअप कॉमेडियन लोहाओशर यांच्या कॉमेडी शोवर नुसती बंदी घातली नाही, तर कार्यक्रमाचे प्रसारण करणार्‍या संबंधित टीव्ही चॅनेलला 19 लाखांचा अमेरिकी डॉलरचा दंडही ठोठावला आहे. या कॉमेडियनचा गुन्हा एवढाच की, त्याने चीनचे हुकूमशहा अध्यक्ष शी जिनपिंग यांची भर कार्यक्रमात खिल्ली उडवली. चीनच्या कम्युनिस्ट सरकारने शांघाय श्याओकुओ सांस्कृतिक मीडिया कंपनीवर 21 लाख 30 हजार अमेरिकी डॉलरचा दंड ठोठावला आहे. कारण, त्यांनी या स्टँडअप कॉमेडीच्या माध्यमातून सत्ताधार्‍यांवर विनोद केला होता. प्रत्यक्षात ही माध्यम कंपनी टीव्ही चॅनेलसाठी कन्टेट तयार करण्याचे काम करते. अर्थात, चीनच्या सर्व नागरिकांना अध्यक्ष शी जिनपिंग यांची प्रतिमा मलीन झाल्याचे चांगलेच ठाऊक आहे. त्यांची देशात कोरोना रोखण्यासाठी केलेल्या जाचक उपायांवरून आठवण काढली जाते. त्यांना पॅन्डेमिक प्रेसिडेंट, असेही म्हटले जाते.

कदाचित आपली खराब प्रतिमा सुधारण्यासाठी शी जिनपिंग हे संपूर्ण देशाला युद्धाच्या खाईत लोटू शकतात, अशीही भीती नागरिकांना वाटते. यापूर्वी चीनचे पहिले अध्यक्ष माओ त्से तुंग यांनीदेखील असेच डावपेच आखले होते. ज्या कॉमेडी शोमध्ये शी जिनपिंग यांच्यावर टीका केली गेली, तो कलाकार आता गायब झाला आहे. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने त्याला उचलले असून, तो कोठे आहे, याचा थांगपत्ता लागलेला नाही. तो कोणत्या स्थितीत आहे, याची खबरही कोणाला नाही. असाच प्रकार यापूर्वीही घडला होता. 2021 मध्ये एक संकेतस्थळ चालविणार्‍या दोन चीन निर्मात्यांनीदेखील शी जिनपिंग यांची खिल्ली उडवली होती. तेव्हा त्यांनाही कम्युनिस्ट पक्षाने गायब केले. आजपर्यंत त्या निर्मात्यांचा शोध लागला नाही. कम्युनिस्ट पक्षाची दमनशाही चीनची जनता निमूटपणे पाहत आहे. आता तर आपली डागाळलेली प्रतिमा सुधारण्यासाठी शी जिनपिंग हे आपल्या तरुणांना युद्धासाठी तयार करत असल्याचे बोलले जात आहे. त्यांना सैन्यांचे प्रशिक्षण दिले जात आहेत. युद्ध आणि सैन्याशी संबंधित चित्रपट दाखविले जात आहे. या आधारे युवकांच्या मनात शस्त्रसज्जता निर्माण होईल आणि आपल्याला जे हवे ते करून घेता येईल, असा शी जिनपिंग यांचा इरादा आहे.

शी जिनपिंग यांनी 20 व्या राष्ट्रीय काँग्रेसच्या बैठकीत पीपल्स लिबरेशन आर्मी म्हणजेच पीएलएला 2027-28 पर्यंत जगातील सर्वात शक्तिशाली सैन्य करण्याचे ध्येय ठेवले आहे. जगातील बलाढ्य लष्कर बनल्यानंतर चीन तैवानची सीमा आपल्या देशात सामील करण्यासाठी युद्ध छेडू शकते आणि त्यानंतर अन्य शेजारी देशांशी सुरू असलेले सीमावाद उकरून काढत युद्ध सुरू करू शकते. मग भारत असो किंवा रशिया. कदाचित हल्ला करत चीन सीमाभाग ताब्यात घेण्याचा प्रयत्न करेल, अशी भीती अमेरिकी गुप्तचर यंत्रणा सीआयए आणि अमेरिकी लष्कराच्या निवृत्त अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे. याशिवाय, डोनाल्ड ट्रम्प प्रशासनातील माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एच. आर. मेकमास्टर यांनी, तर शी जिनपिंग हे तैवानसाठी खूप धोकादायक असल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी ते देशातील युवकांना युद्धात ढकलण्याची तयारी करत आहेत, असाही इशारा दिला आहे.

शी जिनपिंग यांनी 2027-28 या वर्षापर्यंत लष्कर सज्जतेचे ध्येय का ठेवले आहे? याचाही विचार करायला हवा. याचे कारण म्हणजे, चीन अमेरिकेला मागे टाकत जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याची शक्यता आहे. चीन जगभरात विस्तारवादाचे धोरण राबवत असताना दुसरीकडे मात्र देशभरात तणावाचे वातावरण आहे. सर्व लोकांना सरकारच्या धोरणांचा त्रास होताना दिसत आहे. काही लोक तर देशातून परागंदा होताना दिसत आहेत. देशाच्या धोरणांविरोधात बोलण्याची कोणाचीच हिंमत नाही. जर कोणी सरकारविरोधात बोलल्यास त्याला तुरुंंगात डांबले जाते. त्याचा अनन्वीत छळ केला जातो. एकूणच चीनमध्ये व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याचे दिसत आहे.

– विशाखा पाध्ये

Back to top button