बँकांचे गर्भश्रीमंत गुन्हेगार | पुढारी

बँकांचे गर्भश्रीमंत गुन्हेगार

सामान्य माणूस प्रतिष्ठेला जपत असतो, त्याचमुळे पोटाला चिमटा घेऊन का होईना बँकेच्या कर्जाचे हप्ते वेळच्या वेळी भरण्याचा प्रयत्न करीत असतो. काही अडचणींमुळे विलंब झाला, तर पैसे हाती आल्याआल्या दंड व्याजासह रक्कम भरून निश्चिंत होतो. दारात सावकाराने किंवा बँकेच्या प्रतिनिधीने कर्ज वसुलीसाठी येणे ही त्याच्या द़ृष्टीने सर्वाधिक नामुष्कीजनक घटना असते. केवळ याच स्वाभिमानामुळे विषाचा प्याला जवळ करून जीवनयात्रा संपवल्याची सामान्य शेतकर्‍यांची शेकडो उदाहरणे महाराष्ट्रात पाहावयास मिळतात. छोटे-छोटे व्यावसायिकही पैसा पैसा जमवून कर्जफेड करण्याचा प्रयत्न करीत असतात. त्याचवेळी गर्भश्रीमंत म्हणून मिरवणारे कित्येक जण कर्जाच्या ओझ्याखाली असतात. परंतु, तरीही त्याबद्दल काही न वाटता कर्जाच्या पैशातून श्रीमंतीची मिजास मिरवत असतात. आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध असलेल्या केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच एका समारंभात बोलताना समाजातील याच वास्तवावर नेमके बोट ठेवताना समाजातील श्रीमंत कर्जबुडव्यांच्या मनोवृत्तीवरही प्रकाश टाकला. विविध बँकांचे कर्ज बुडवणारे सर्वाधिक ग्राहक हे श्रीमंत गटातील असतात, असे गडकरी यावेळी म्हणाले. गडकरी यांचे हे विधान म्हणजे, केवळ बातम्यांमध्ये स्थान मिळवण्यापुरते मर्यादित नाही, तर समाजात सध्या तेच वास्तव असल्याचे आढळून येते. नागपूरमधील एका समारंभात बोलताना गडकरी यांनी श्रीमंत कर्जबुडव्यांना उघडे करतानाच छोट्या कर्जदारांचे तोंडभरून कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून मुद्रा लोन, स्टार्टअपच्या माध्यमातून तरुणांना स्वयंरोजगाराच्याही अनेक संधी मिळाल्या आहेत. त्यासाठी बँकांनी मोठ्या प्रमाणावर अर्थसहाय्य केले आहे. तरुणांनी केवळ नोकर्‍यांच्या मागे न लागता छोटे-मोठे व्यवसाय सुरू करावेत, अशा व्यापक हेतूने अनेक योजना राबवण्यात आल्या. त्यातून अनेक व्यावसायिक उभे राहिले आणि त्यांनी आपल्यासारख्या इतर अनेकांना रोजगार दिले. अशाच लोकांसंदर्भातील निरीक्षण नोंदवताना गडकरी यांनी काही महत्त्वपूर्ण निरीक्षने नोंदवली. गरीब ग्राहक नियमित कर्ज भरताना दिसतात, मध्यमवर्गीय ग्राहक अधून-मधून हप्ता चुकवतात, तर श्रीमंत गटातील ग्राहक मोठ्या प्रमाणावर कर्ज बुडवताना दिसतात, असे ते म्हणाले. ई-रिक्षा घेणार्‍यांकडून नियमित कर्जाचे हप्ते भरले जात असल्याचेही त्यांनी मुद्दाम होऊन नमूद केले. सरकारच्या प्रयत्नाने आता युवकांना कौशल्य विकासातून विविध क्षेत्रांत चांगल्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यांनी कौशल्याच्या जोरावर स्वत:चा उद्योग उभारून नोकरी मागणारे होण्याऐवजी नोकरी देणारे व्हावे, असेही आवाहन गडकरी यांनी केले. भारतीय समाजव्यवस्थेतील विविध सामाजिक, आर्थिक गटातील लोकांच्या मानसिकतेचे दर्शन यातून घडते. देशात गेल्या काही वर्षांमध्ये आर्थिक क्षेत्रात जे वास्तव समोर आले आहे, ते या निरीक्षणाला पुष्टी देणारेच आहे.
श्रीमंत गटातील लोक कर्ज बुडवतात, हे खरे असले, तरी गर्भश्रीमंत गटातील लोक कर्जच नव्हे, तर बँका बुडवून परदेशी पलायन करतात, हे त्यापुढच्या टप्प्यावरील वास्तव आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्याची सातत्याने चर्चा होत आली आहे. भारतातील गेल्या काही वर्षांतील ठळक उदाहरणे पाहिली, तरी त्याची प्रचिती येते. विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांच्यासारखे व्यावसायिक तर जागतिक पातळीवरील चेहरे बनले आहेत. भारतीय बँकांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावून ही मंडळी परदेशात ऐशोआराम करीत आहेत. विजय मल्ल्याने भारतीय बँकांना सुमारे नऊ हजार नऊशे कोटी रुपयांना गंडा घातला आहे. हिरेव्यापारी नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार 540 कोटी रुपयांना डुबवले आहे. मेहुल चोक्सी, ललित मोदी अशी आणखी काही ठळक नावेही यासंदर्भाने समोर येतात. परंतु, गडकरी जेव्हा श्रीमंत बँक बुडव्यांसंदर्भात बोलत होते, त्याच सुमारास भारतातील आणखी एका मोठ्या बँक बुडव्यावरील कारवाईची प्रक्रिया सुरू होती. भूषण स्टील लिमिटेड या कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक असलेल्या नीरज सिंघल याने 36 हून अधिक बँकांमध्ये 56 हजार कोटींचा घोटाळा करून संबंधित बँकांचे कंबरडे मोडले आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नीरज सिंघल याला अटक केली असून, याचसंदर्भाने यापूर्वीही त्याला दोनवेळा अटक करण्यात आली होती. भूषण स्टील ही कंपनी दिवाळखोरीत निघाली असून, तिचा ताबा टाटा स्टीलने घेतला आहे. ‘ईडी’ आणि ‘सीबीआय’कडून बराचकाळ या प्रकरणाचा तपास सुरू होता, त्यातूनच 56 हजार कोटींच्या घोटाळ्याचे हे प्रकरण समोर आले आहे. नीरज सिंघल विरोधात आर्थिक गैरव्यवहाराचे अनेक आरोप आहेत. कंपनीच्या नावावर त्याने कोट्यवधींची अफरातफर केली. शेल कंपन्या स्थापन करून पैशांचा अपहार केला, तसेच बँकांकडून कंपनी आणि व्यवसायासाठी कर्ज घेऊन त्याचा वापर व्यक्तिगत कारणांसाठी केला. कंपनीसाठी घेतलेल्या कर्जातून व्यक्तिगत मालकीच्या मालमत्ता खरेदी केल्या. महागड्या वस्तूंची खरेदी केली, पार्ट्या केल्या, महागड्या मोटारी खरेदी केल्या आणि हे सगळे करीत असतानाच बनावट कागदपत्रांचाही त्याने वापर केल्याचा आरोप आहे. ज्या बँकांची नीरज सिंघलने फसवणूक केली त्यामध्ये नामांकित राष्ट्रीयीकृत बँकांसह अनेक खासगी बँकाही आहेत. नीरजचे वडील बृजभूषण सिंघल यांनी 1987 मध्ये भूषण स्टीलची सुरुवात केली होती. सुरुवातीला ते दरवाजांचे हँडल, हँगर अशा छोट्या वस्तू बनवत होते. 2003 मध्ये त्यांनी ओडिशामध्ये मोठा स्टील प्रकल्प सुरू केला आणि ते भूषण स्टीलला देशातील सर्वात मोठा स्टील प्रकल्प बनवण्याचे स्वप्न पाहत होते. कंपनीची जबाबदारी मुलाकडे आल्यानंतर व्यवसायात लक्ष घालण्याऐवजी तो चंगळवादात वाहवत गेला आणि परिणामी वाढत्या कर्जांमुळे कंपनीचे दिवाळे निघाले. नीरज सिंघलला यापूर्वी 2014 आणि 2018 मध्येही अटक झाली होती. घोटाळ्याच्या प्रचंड रकमेमुळे तो विजय मल्ल्या, नीरव मोदी वगैरेंच्या पंगतीत जाऊन बसला आहे.

Back to top button