प्रासंगिक : अमली पदार्थांचे दुष्टचक्र | पुढारी

प्रासंगिक : अमली पदार्थांचे दुष्टचक्र

अमली पदार्थांची बेकायदा तस्करी ही केवळ भारतासाठीच नाही, तर जगासाठी चिंतेची बाब आहे. देशाची तरुणाई अमली पदार्थांच्या आहारी जाण्यापासून रोखण्याचे काम प्रशासनाला सातत्याने करावे लागते. यासाठी पोलिस आणि अमली पदार्थ नियंत्रण विभागाला (एनसीबी) संशयित भागात छापेमारी सत्र राबवावे लागते. आता तर तस्करीसाठी ऑनलाईन, अ‍ॅपचा वापर केला जाऊ लागल्याने तरुणांच्या हाती अमली पदार्थ सहजपणे पडताना दिसून येते.

अमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) ला मोठे यश मिळाले. ‘एनसीबी’ने मंगळवारी सुमारे 15 हजार एलसीडी ब्लॉटस्ची खेप जप्त केली असून, ती आतापर्यंतची सर्वात मोठी खेप मानली जात आहे. डार्क नेटच्या माध्यमातून अमली पदार्थांची तस्करी करणार्‍या टोळीचा भांडाफोड केल्यानंतर सहाजणांना अटक करण्यात आली आहे. जप्त केलेल्या अमली पदार्थांची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात दहा कोटींपेक्षा अधिक आहे. देशात गोपनीय इंटरनेट (डार्क नेट) आधारित अ‍ॅप आणि ‘डब्ल्यूआयसीकेआर’सारख्या मेसेंजर सेवेच्या माध्यमांतून अमली पदार्थांची तस्करी केली जात होती. ‘एलसीडी’ म्हणजेच लिसर्जिक अ‍ॅसिड डायथिलेमाईड. त्याला एलएसडी ब्लोटर असेही म्हटले जाते. हा एक शोषून घेणारा कागद असतो. त्यावर नशा करण्यासाठी पातळ एलएसडीला भिजवले जाते. लिसर्जिक अ‍ॅसिड डायथिलेमाईड हा सिंथेटिक रसायन आधारित अमली पदार्थ आहे. त्यास स्टॅप पेपरपेक्षा निम्म्या आकारात असलेल्या ब्लॉटस्वर पेंट करून त्याची तस्करी केली जाते. त्याला चाटले किंवा गिळले जाते. जप्त एलएसडी ही पोलंड आणि नेदरलँडहून तस्करी करत भारतात आणली होती. यापूर्वी कर्नाटक पोलिसांनी 2021 मध्ये एलएसडीचे सर्वाधिक 5 हजार ब्लॉटस् जप्त केले होते आणि कोलकाता पोलिसांनी 2022 मध्ये एवढ्याच प्रमाणात ब्लॉटस् पकडले होते.

यंदाची जप्ती ही मोठी मानली जात आहे. ‘एलएसडी’मुळे आरोग्य संकटात सापडते. विशेषत:, मेंदू आणि हृदयासाठी हे द्रव्य धोकादायक आहे. ‘एनसीबी’च्या मते, 0.1 ग्रॅम एलएसडी (सुमारे 6 ब्लॉट) जरी कोणाकडे सापडली, तर त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार कडक कारवाई होऊ शकते. आर्यन खानच्या प्रकरणानंतर देशातील अमली पदार्थांचे भयावह चित्र समोर आले आहे. धनाढ्य कुटुंबातील मुले कशा रीतीने अमली पदार्थांच्या विळख्यात अडकत आहेत, हे कळते. भारतात अमली पदार्थांची बेकायदा तस्करी वाढण्यामागे गोल्डन ट्रँगल आणि गोल्डन क्रिसेंट कारणीभूत आहे. गोल्ड ट्रँगल (त्रिकोण) हे असे क्षेत्र असून, त्यात थायलंड, लाओस आणि म्यानमारच्या सीमा रूक आणि मेकांग नदीच्या संगमाला मिळतात. या ठिकाणी जगातील एकूण हेरॉईनच्या तुलनेत 75 टक्के उत्पादन होते. गोल्डन क्रिसेंट (अर्धचंद्र) क्षेत्रात पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि ईराणचा समावेश आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान, म्यानमार आणि नेपाळमधून हेरॉईन, कोकेन आणि मार्फीन हे भारतामार्गे जगभरात वितरीत करण्यात येते.

संबंधित बातम्या

जगभरात अमली पदार्थांच्या सेवनामुळे सुमारे दोन लाख जणांचा मृत्यू दरवर्षी होतो. आपल्या देशात 2.1 टक्के लोक बेकायदापणे अमली पदार्थांचे सेवन करतात. भारतात सिंथेटिक अमली पदार्थाव्यतिरिक्त गांजा, चरस, अफीम आदी तस्करी मोठ्या प्रमाणात होते. रक्तदाब कमी करणारे औषध एफेड्रिन आणि अनेक प्रकारचे कफ सीरपचा वापरदेखील नशा येण्यासाठी केला जातो. डार्क नेट आणि क्रिप्टो करन्सीने अमली पदार्थांच्या तस्करांचे काम सोपे केले आहे. त्यामुळे पुरवठादार आणि ग्राहक यांच्यात लिंक शोधणे कठीण जाते. एका अंदाजानुसार भारतात अमली पदार्थांची वार्षिक बेकायदा उलाढाल सुमारे 10 लाख कोटी रुपये आहे. राष्ट्रीय गुन्हे ब्युरो (एनसीबी) च्या आकडेवारीनुसार, भारतात दररोज अमली पदार्थांच्या सेवनामुळे दहाजणांचा मृत्यू किंवा आत्महत्या होण्याचे प्रकार घडतात. सर्व प्रकारच्या अमली पदार्थांच्या विरुद्ध व्यापक मोहीम आणि कडक कारवाई करणे गरजेचे आहे. ‘एनसीबी’कडून सातत्याने काम केले जात आहे. परंतु, मोहीम आणखी प्रभावीपणे राबविणे तितकेच महत्त्वाचे आहे. पुरेशा मनुष्यबळासह आणखी स्रोत ‘एनसीबी’ला उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. एकुणातच देशात अमली पदार्थांचा बाजार मोडून काढणे गरजेचे आहे. तूर्त डार्क नेटचा भांडाफोड करत ‘एनसीबी’ने ड्रग्ज सिंडिकेटची कंबर मोडून काढण्याचे केलेले काम प्रशंसनीय आहे.

– शैलेश धारकर

Back to top button