लवंगी मिरची : काय गंमत आहे नाही! | पुढारी

लवंगी मिरची : काय गंमत आहे नाही!

मित्रा, आजकाल ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ची भानगड सुरू आहे. बहुधा आपल्या देशामध्ये काही आदिवासी जमातींमध्ये आधीपासून ही प्रथा असावी, अशी शक्यता वाटते. म्हणजे बघ, या बातमीत म्हटले आहे की, राजस्थानमधील 70 वर्षे वयाच्या एका गालिया नावाच्या व्यक्तीने धुमधडाक्यात लग्न साजरे केले. त्यांच्या लग्नाला त्यांची मुले, सुना, नातवंडे सर्वजण उपस्थित होते आणि सर्वजण जल्लोषात नाचत होते. मला आधी काळजी वाटली की, या 70 वर्षे वयाच्या वयोवृद्ध माणसाने एखाद्या तरुण मुलीसोबत लग्न केले आहे की काय? परंतु पूर्ण बातमी वाचली तेव्हा सगळा खुलासा झाला. म्हणजे, झाले असे की, तरुण वयामध्ये त्यांचे लग्न त्यांच्या सध्याच्या ज्या पत्नी आहेत त्यांच्याबरोबर झाले. आदिवासी प्रथेप्रमाणे विवाह विधी करून दोघांनी एकत्र राहण्यास सुरुवात केली.

सुखाचा संसार सुरू होता. त्यांना मुले, बाळे, नातवंडे पण झाली; पण नंतर बहुतेक कोणाच्या तरी लक्षात आले की, यांचे सहजीवन चांगले सुरू आहे. परंतु, त्यांचे लग्न अद्याप बाकी आहे; मग त्यांच्या मुलाबाळांनी त्यांच्या लग्नाचा घाट घातला आणि धुमधडाक्यात त्यांचे लग्न लावून दिले. काय गंमत असेल नाही? नातवंडे, मुले, सुना यांच्यासमोर हे गृहस्थ आपली वरात घेऊन आले आणि आपल्या वयोवृद्ध पत्नीसोबत त्यांनी पुन्हा लग्न केले. आजकालच्या काळामध्ये एक लग्न होण्याची मारामार तिथे या गृहस्थांचे एकाच आयुष्यात एकाच स्त्रीबरोबर दोन-दोन लग्न झाले; पण तू म्हणतोस त्याप्रमाणे सहजीवन किंवा ‘लिव्ह इन’ ही प्रथा आदिवासींमध्ये अस्तित्वात असावी, अशी शंका घ्यायला भरपूर वाव आहे.

आजच्या तरुण पिढीमध्ये पाहिले, तर आधीच तर लग्न करायला कोणी तयार होत नाही. म्हणजे, शहरांमध्ये मुलींचे लग्नाचे वय 30 आणि मुलांच्या लग्नाचे वय 32 झालेले आहे. त्यानंतर त्यांना लग्न करण्याची कितपत इच्छा राहत असेल, याची शंकाच वाटते. करिअर, करिअरबरोबर येणारा पैसा आणि त्याबरोबर मिळणारा स्वैराचाराचा परवाना हे असेल, तर कुटुंब पद्धतीमध्ये जायचे कशासाठी?
ग्रामीण भागात वेगळी स्थिती आहे. म्हणजे, विवाह इच्छुक मुलांची, तरुणांची संख्या भरपूर आहे. परंतु, त्यांना कोणी मुली द्यायला तयार नाही. शेतकर्‍यांच्या मुलांना मुलगी देणे म्हणजे, तिला संकटात टाकणे किंवा कष्टात टाकणे, असा गैरसमज असल्यामुळे त्यांची लग्न जुळत नाहीत. या पार्श्वभूमीवर या गालीया नावाच्या राजस्थानमधील व्यक्तीने एकाच स्त्रीबरोबर दोनदा लग्न केले हे फार उठून दिसणारे आहे; पण या प्रकारामुळे जगामध्ये प्रसिद्ध असणारी आपली कुटुंब संस्था धोक्यात येईल की, काय अशी शंका वाटते.

संबंधित बातम्या

अजिबात नाही, मला तशी अजिबात शक्यता वाटत नाही. अपवादत्मक घडणार्‍या घटना म्हणजे, समाजजीवन नाही. आई-वडिलांच्या लग्नाला पंचवीस वर्षे झाली असतील म्हणजे, रौप्यमहोत्सव साजरा करायचा असेल, तर आजकाल शहरांमध्ये पण मुले-मुली आपल्या आई-वडिलांचे पुन्हा लग्न लावतात. तेवढेच उत्साहाने मंगलाष्टक म्हटले जाते आणि तेवढेच उत्साहाने परस्परांना हार घातले जातात. हे चित्र पाहता विवाह संस्थेला काही धोका आहे, असे वाटत नाही. अर्थात, पण त्याच स्त्रीबरोबर दुसर्‍यांदा विवाह करण्याचे दुःख काही पुरुषांना होत असेल; पण त्याला इलाज नसतो. ‘आलीया भोगाशी असावे सादर’या न्यायाने पुरुष आणि त्याची जोडीदार पत्नी हसत-हसत पुन्हा हा विवाह लावत असतील हे नक्की. म्हणजे, आपल्याच देशात एका बाजूला ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ आणि दुसर्‍या बाजूला एकाच जोडप्याने पुन्हा एकमेकांशी विवाह करायचा ही गंमत पाहायला मिळते आणि म्हणूनच आपण मेरा भारत महान म्हणतो.

  • झटका

Back to top button