चर्चेतील चेहरा : डॉ. गौरव गांधी | पुढारी

चर्चेतील चेहरा : डॉ. गौरव गांधी

सध्याच्या धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या काळात आरोग्य जपणे ही गांभिर्याने करण्याची बाब बनलेली आहे. सध्याच्या काळात, तर व्यायामशाळेत अगदी फिटनेस ट्रेनर किंवा शरीरसौष्ठवपटूचाही अचानक आलेल्या हार्ट अ‍ॅटॅकमुळे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. लग्नात किंवा अन्य समारंभांत नाचत असताना अचानक हृदयविकाराचा झटका येऊन कोसळणार्‍या व्यक्तींचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झालेले आहेत. अशा वेळीच आता एक चेहरा देशभर चर्चेत आला आहे. हा चेहरा आहे,

गुजरातमधील प्रसिद्ध कार्डियोलॉजिस्ट डॉ. गौरव गांधी यांचा. एक निष्णात हृदयरोग तज्ज्ञ असलेल्या डॉ. गांधी यांचा वयाच्या अवघ्या 41 वर्षीच कार्डियाक अरेस्टने मृत्यू झाला. हृदयाच्या 16 हजार यशस्वी शस्त्रक्रिया केलेल्या या तज्ज्ञाची हृदयक्रिया बंद पडूनच झालेल्या या मृत्यूने सर्वांनाच विचारात पाडले. एमपी शाह मेडिकल कॉलेजच्या डीन डॉ. नंदिनी देसाई यांनी सांगितले की, गांधी यांना मंगळवारी सायंकाळी छातीत दुखू लागल्याने त्यांचा कार्डियोग्राम काढण्यात आला. त्यानंतर त्यांच्यावर पित्ताचे उपचार करण्यात आले. थोडे बरे वाटल्यावर ते घरी गेले आणि दोन तासांनंतर ते बाथरूममध्ये बेशुद्ध होऊन कोसळले. त्यांना तत्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले; पण 45 मिनिटांमध्येच त्यांची प्राणज्योत मावळली होती. ते जामनगरच्या जी जी हॉस्पिटलमध्ये कॉन्ट्रॅक्चुअल बेसिसवर काम करीत असत तसेच एका खासगी हॉस्पिटलमध्येही प्रॅक्टिस करीत होते.

हृदयासंबंधीची संपूर्ण माहिती असलेल्या एखाद्या अशा तज्ज्ञ डॉक्टरचा हृदयक्रिया बंद पडल्याने मृत्यू होणे हे धक्कादायक वाटणे साहजिकच आहे. अर्थात यानिमित्ताने ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ या उक्तीप्रमाणे सर्वांनीच सावध राहणे गरजेचे आहे. डॉ. गांधी यांचा मृत्यू हृदयविकाराचा झटका येऊन नव्हे, तर हृदयक्रिया बंद पडून झाला. या दोन्हीमध्ये फरक आहे; पण दोन्ही प्रकार हृदयाशीच संबंधित असल्याने त्याची माहिती अर्थातच सर्व डॉक्टरांना व जाणकारांना असतेच. डॉ. नीतू मांडके यांचेही वयाच्या अवघ्या 55 व्या वर्षीच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यांनी आपल्या करिअरमध्ये दहा हजारांपेक्षाही अधिक हृदय शस्त्रक्रिया केल्या होत्या. अनेक प्रसिद्ध व्यक्तींचाही त्यांच्या रुग्णांमध्ये समावेश होता. अशा लोकप्रिय व निष्णात हार्ट स्पेशालिस्टचा हृदयविकाराच्या झटक्यानेच अकाली मृत्यू होणे धक्कादायकच होते. अर्थात जन्म आणि मृत्यू कधी होईल हे काही सांगता येत नाही.

संबंधित बातम्या

अगदी हृदयरोग तज्ज्ञ जरी असला, तरी त्याचाही हृदयविकाराने मृत्यू होऊ शकतो. त्याचा अर्थ असा नव्हे की, आपण बेसावध राहावे. सध्याच्या काळात तरुणाईमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढलेले आहे. अनियमित जीवनशैली, फास्टफूड, व्यायामाचा अभाव किंवा व्यायामाचा अतिरेक, ताणतणाव ही यामागील काही कारणे आहेत. केवळ शारीरिक आरोग्याचाच विचार न करता मानसिक आरोग्याचाही विचार करणे सध्या क्रमप्राप्त आहे. अनेक वेळा लोक मनोकायिक आजाराने ग्रस्त होतात. त्याचा अर्थ मन अशांत असेल, तर त्याचा विपरित परिणाम शारीरिक आरोग्यावरही होत असतो व मधुमेह, हृदयविकार असे आजार उद्भवतात. त्यामुळे योगविद्या, ध्यान या गोष्टीही आता गरजेच्याच बनलेल्या आहेत. एका हार्ट स्पेशालिस्टच्या मृत्यूने याबाबतची जागृती आणखी वाढावी हीच अपेक्षा!

– सचिन बनछोडे

Back to top button