जागतिक पर्यावरण दिन : आता ठोस कृती हवी

जागतिक पर्यावरण दिन : आता ठोस कृती हवी

'गुंतवणूक करा, आपल्या ग्रहासाठी' हे यंदाच्या आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिनाचे घोषवाक्य आहे. यामध्ये आपल्याला आपले मनुष्यबळ गुंतवायचे आहे. आपल्याला आपले बुद्धिबळ गुंतवायचे आहे. आपल्याला आपला थोडा वेळ गुंतवायचा आहे आणि आपल्याला तंत्रज्ञान जे प्राप्त झालेले आहे, ते विकसित होते आहे ते पृथ्वीच्या रक्षणासाठी गुंतवायचे आहे.

आज आपण सर्वजण पावसाचा अनिश्चित आणि अनियमित व्यवहार पाहत आहोत. वेगवेगळ्या प्रकारची वादळे येत आहेत. 'अंटार्क्टिका'चा बर्फ वितळत आहे. समुद्राची पातळी वाढत आहे. तापमान वेगाने वाढत आहे. जमिनीचे भूस्खलन होत आहे. त्यामुळे हजारो लोकांचे जीव जात आहेत. महापुरामुळे दैना उडत आहे. पाणी आणि अन्न विषारी बनत आहे. रोगराई तर वाढलेलीच आहे. यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. पर्यावरण रक्षणासाठी 2030 पर्यंत ठोस पावले उचण्याची गरज आहे; अन्यथा आपण निसर्गाचा विनाश थांबवू शकणार नाही. पर्यावरणाच्या समस्येला अनेक द़ृष्टिकोनातून पाहण्याची आवश्यकता आहे. पाणी प्रदूषण, हवा प्रदूषण, जमिनीचे प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण सातत्याने वाढत आहे, 'अंटार्क्टिका'मधील बर्फ वितळू लागला असल्याने भविष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. तसेच ओझोनच्या स्तराला धोका तर निर्माण झालाच आहे, त्याचबरोबर 'ग्रीन हाऊस गॅस इफेक्ट'मुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. हे एकप्रकारे मानव जातीला धोक्याचा इशाराच आहे.

नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर सर्वजण करत असतात, मग सर्वांनी त्याची किंमत मोजायला नको काय? आपल्या आयुष्यामध्ये जर 200 झाडांची ऊर्जा वापरत असू, तर 200 झाडे लावायला नकोत काय? आपण जितके पाणी वापरतो तितकेच पाणी टाकून मोठ्या प्रमाणात प्रदूषित करण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला आहे? 70-75 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या शैक्षणिक संस्थांची जोडलेली असते. कोणाचे विद्यार्थी असतात. कोण शिक्षक असतात. कोण संचालक असतात. कोण शिक्षकेतर कर्मचारी असतात, तर कोण शैक्षणिक संस्थांना काहीतरी सेवा पुरवणारे वस्तू पुरवणारे असतात. त्यामुळे इथून होणारे काम हे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचते. ज्वलंत प्रश्नावर उत्तर शोधणारी प्रक्रिया जर या संस्थांमधून होत असेल, तर यांचे महत्त्व आणखीनच वाढेल. तेही केवळ काल्पनिक अथवा भावनिक नाही, तर व्यावहारिक अर्थानेसुद्धा! पाण्याची कमतरता, पाण्याची शुद्धता या सगळ्या गोष्टींची जाणीव उन्हाळ्यात होत असते. तर यावेळी केवळ टीका टिपणी आणि चिंतन करण्यापेक्षा त्यावर काय उपाययोजना करता येईल? याला प्राधान्यक्रम द्यायला हवा.

उन्हाच्या झळा सोसाव्या लागल्या की, अरे, आपणच झाडे तोडून ही बकाल अवस्था निर्माण केली आहे. याची संवेदनशील मनाला नक्कीच जाणीव होत असते. त्यावेळी आपण जूनमध्ये कुठे रोपे लावणार? कोणती रोपे लावणार? ती कुठून उपलब्ध करणार? याचे नियोजन करण्याचीसुद्धा गरज आहे. या कामात सरकारी यंत्रणांनी मोलाचा सहभाग घेतला पाहिजे. विकासाच्या या प्रक्रियेत ती पर्यावरणाची हानी झाली म्हणजे आतापर्यंत आपण म्हणत होतो की, एक झाड तोडले, तर वीस झाडे लावावीत असे म्हटले जाते. कार्बनचे किती उत्सर्जन होत असते त्याचे मोजमाप करून ते कार्बनचे अवशोषण करण्यासाठी काय करावे लागेल, ते पाहून ती गोष्टसुद्धा तातडीने, तितक्याच तत्परतेने आणि त्याच बजेटमध्ये केली पाहिजे. पर्यावरणासारखे कृतिप्रधान विषय वार्षिक नियोजनामध्येच घ्यायला हवेत.

  • डाॅ. मनोज पाटील, पर्यावरण तज्ज्ञ

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news