मजबुतीच्या दिशेने विरोधी आघाडी! | पुढारी

मजबुतीच्या दिशेने विरोधी आघाडी!

सलग तिसर्‍यांदा केंद्रातील सत्तेचे सोपान गाठण्याचे लक्ष्य ठेवलेल्या भारतीय जनता पक्षाला आगामी लोकसभा निवडणुकीत चितपट करण्यासाठी विरोधी पक्षांनी चांगलीच कंबर कसली आहे. हिमाचल प्रदेश आणि त्यापाठोपाठ कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या विजयामुळे आपण भाजपला पराभूत करू शकतो व मोदी लाट परतवू शकतो, असा आत्मविश्वास विरोधी पक्षांत निर्माण झाला आहे.

लोकसभेच्या निवडणुकीला एक वर्षापेक्षा कमी काळ राहिला असल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची मोट आणखी मजबूत करण्यासाठी संयुक्त जदचे नेते नितीशकुमार यांनी पुढील आठवड्यात पाटणा येथे तमाम विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर विरोधी आघाडीचा ठोस कृती कार्यक्रम निश्चित केला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. भाजप जाणूनबुजून संयुक्त जदचे खच्चीकरण करीत असल्याचा ठपका ठेवत नितीशकुमार यांनी गतवर्षीच्या ऑगस्ट महिन्यात भाजपसोबतची युती तोडली होती. त्यानंतर तेजस्वी यादव यांच्या राजदसोबत सख्य करीत कुमार यांनी नवे सरकार बनविले. दरम्यानच्या काळात केंद्रातील भाजपचे सरकार उलथवून लावण्याचा चंग बांधलेल्या नितीशकुमार यांनी तमाम विरोधी पक्षांना एका व्यासपीठावर आणण्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. अलीकडील काळात देशभर दौरे करून कुमार यांनी विरोधी नेत्यांची चाचपणी केली आहे. आठव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री पद भूषवत असलेल्या नितीशकुमार यांनी आघाडीसाठी पुढाकार घेतल्यानेच की काय तृणमूल काँग्रेस आणि आपसारख्या पक्षांनाही विरोधी आघाडी ही अपरिहार्यता वाटू लागली असल्यास नवल वाटू नये.

सर्व पक्षांतील नेत्यांशी मैत्रीचे संबंध ठेवणार्‍या नितीशकुमार यांनी तृणमूल नेत्या ममता बॅनर्जी तसेच आप नेते अरविंद केजरीवाल यांची भेट घेत विरोधी आघाडीत सक्रिय होण्याचा सल्ला दिला आहेच; पण कोणत्याही आघाडीत सामील नसलेल्या बिजू जनता दलाचे नेते नवीन पटनाईक यांनाही या आघाडीकडे वळविण्याचा प्रयत्न चालविला आहे. पटनाईक यांच्यासोबत वायएसआर काँग्रेसचे जगनमोहन रेड्डी आणि भारत राष्ट्र समितीचे के. चंद्रशेखर राव हे विरोधी आघाडीत सामील झाले होते, तर भाजपचा धुव्वा उडविणे अधिक सोपे जाणार असल्याची नितीशकुमार यांना पुरेपूर कल्पना आहे. या व याच्याशी अनुषंगिक रणनीतीच्या हेतूनेच त्यांनी 12 जून रोजी पाटणा येथे विरोधी नेत्यांच्या बैठकीचे आयोजन केले आहे.

नवीन संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमावर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली 20 पक्षांनी बहिष्कार टाकत आपली एकता दाखवून दिली होती. ज्या पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार घातला, ते लोकशाही परंपरा जोपासणारे नव्हे, तर; परिवारवाद जोपासणारे पक्ष असल्याचे सांगत भाजपने वेळ मारून नेली खरी; पण विरोधी आघाडी मजबूत होत असल्याचा स्पष्ट संदेश भाजपपर्यंत पोहोचलेला आहे. सीबीआय, ईडीसारख्या तपास संस्थांच्या कारवायांवरून विरोधी पक्ष हैराण आहेत. कदाचित आता एकत्रित आलो नाही, तर भविष्यात काही खरे नाही, याची जाणीव त्यांना झाली असावी. त्याचमुळे भाजपविरोधात संघटित होण्यासाठी हे पक्ष उत्सुक असावेत, असे मानण्यासही वाव आहे. बर्‍याच कालावधीनंतर डावे पक्ष सक्रिय झाले आहेत, हे विरोधी गोटासाठी सुचिन्ह आहे.गत लोकसभा निवडणुकीवेळी विरोधी पक्ष एकत्र आले नव्हते, असे नाही; पण त्यावेळी विरोधी पक्षांनी अनेक चुका केल्या होत्या. त्या चुकांची पुनरावृत्ती आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधकांना टाळावी लागेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुढील काही महिन्यांत होत असलेल्या राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या प्रमुख राज्यांत भाजपला पराभूत करण्याची किमया विरोधकांना साध्य झाली, तर लोकसभा निवडणुकीच्या द़ृष्टीने विरोधकांचे काम आणखी सोपे होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कमी होत असल्याचा विरोधी पक्षांचा दावा आहे. तर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही भाजपला चकित करू, असा विश्वास काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अमेरिका दौर्‍यादरम्यान व्यक्त केला होता. केवळ पंतप्रधान मोदी यांच्या लोकप्रियतेवर विसंबत चाललेल्या भाजपला कर्नाटक निवडणुकीच्या निकालाने हादरा दिला होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या द़ृष्टीने भाजप काही वेगळे करणार काय, याकडेही सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

राहुल गांधी यांच्याकडून भाजपची घेराबंदी

एकीकडे तमाम विरोधी पक्ष एकत्र येत असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीदेखील भाजपची चहुबाजूंनी कोंडी करण्यासाठी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. अमेरिका दौर्‍यातील त्यांचे कार्यक्रम, भाषणे व त्यांना मिळत असलेला प्रतिसाद राजकीय पंडितांसाठी चकित करणारा आहे. या दौर्‍यादरम्यान त्यांनी केलेली काही विधानेही गाजत आहेत. भारतातील लोकशाही कोलमडून पडली, तर त्याचा जगावर परिणाम होईल, या विधानाचा त्यांनी पुनरुच्चार केला. केंद्रातील सत्ताधार्‍यांकडून आपला मोबाईल फोन टेप केले जात असल्याचा गंभीर आरोपही राहुल गांधी यांनी केला आहे.

वास्तविक ‘पेगासस’चे प्रकरण उघडकीस आल्यापासूनच गांधी या फोन टॅपिंगच्या मुद्द्यावरून आक्रमक आहेत; पण विदेशात जाऊन त्यांनी या मुद्द्याला धार देण्याचे काम केले आहे. शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक यांनी सौदी अरेबिया, श्रीलंका आणि थायलंडचा दौरा केला होता. एकप्रकारे हे भारत जोडण्याचे काम होते, हे गांधी यांचे वाक्य मात्र वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. गुरू नानक थायलंडला कधी गेले होते? असा सवाल करीत तमाम शीख नेत्यांनी गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. तर एखाद्या विषयावर माहिती नसेल तर बोलू नये, असा सल्ला शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर बादल यांनी राहुल गांधी यांना दिला आहे. तिकडे भाजपनेही हात धुवून घेताना राहुल गांधी यांना त्यांच्या विधानांसाठी किती वेळा माफ करायचे, असा प्रश्न उपस्थित केला आहे. विरोधी पक्षांची आघाडी मजबूत होत असून, तळागाळात मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. हे राहुल गांधी यांचे वाक्य मात्र भाजपसाठी चिंतेत टाकावयास लावणारे आहे. तसेच मुस्लिम लीग सेक्युलर असल्याचे सांगत राहुल गांधी यांनी भाजपचा रोष ओढवून घेतला आहे. भाजपने त्यांच्यावर पलटवर करत बॅरिस्टर जिना यांची मुस्लिम देशाच्या फाळणीला जबादार असताना मुस्लिम लीग कशी काय सेक्युलर, असा सवाल भाजपने केला आहे. राहुल गांधी यांच्यावर टीकेची झोड उठवत त्यांना इतिहासाचे ज्ञान कमी असून, त्यांनी विचार करून बोलावे, असा सल्ला भाजप नेत्यांनी दिला. राहुल गांधी परदेशात जाऊन सातत्याने भारताचा अपमान करत असून, त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता खुपत असल्याचे म्हटले आहे.

  • श्रीराम जोशी 

Back to top button