शॉवर स्पीकर | पुढारी

शॉवर स्पीकर

सध्या सूर्य आग ओकत आहे. अशा या उन्हाच्या तडाख्यात शॉवरने अंघोळ करण्याची मजा काही औरच असते. सध्याच्या या गॅजेट वर्ल्डमध्ये तर चक्क शॉवरमध्येच स्पीकर आल्याने गाणी ऐकत थंडे – थंडे पाणीसे नहाना तो बनता है ना? असे सर्वच जण म्हणत असतात. याहून कमालीची गोष्ट म्हणजे हा ब्लूटूथ हायड्रो पावर स्पीकर तुमच्या शॉवरच्या पाण्यावर चार्ज होतो आणि एकदा चार्ज झाला की दहा ते बारा तास तुम्ही गाणी ऐकण्याचा आनंद लुटू शकता. यामुळे पाण्यावर चालणारा हा ब्लूटूथ स्पीकर बाथरूम सिंगर्सची सकाळ आनंददायी करेल हे नक्की!

इलेक्ट्रो टर्बाईनच्या मदतीने चालणार्‍या या स्पीकरची सध्या क्रेझ पाहायला मिळत आहे. या ब्लूटूथ हायड्रो पावर स्पीकरचे इन्स्टॉलेशनदेखील सोपे आहे. शॉवरची तोटी काढून त्याजागी हा स्पीकर बसवायचा त्यानंतर स्पीकरच्या समोरच्या बाजूला शॉवरची तोटी बसवायची इतके सोपे. यानंतर पाण्याच्या प्रेशरमुळे यातील इलेक्ट्रो टर्बाईन्समुळे हा स्पीकर चार्ज होतो. एकदा चार्ज झाल्यानंतर याचा वापर दहा ते बार तास केला जाऊ शकतो. तसचे या स्पीकरवर दिलेल्या बटनांच्या मदतीने तुम्ही याला सुरू बंद करू शकता. याशिवाय गाणेदेखील बदलू शकता, इतकेच काय, तर आवाजही कमी जास्त करू शकता. हा स्पीकर वॉटरप्रूफ असल्याने पाण्यात भिजण्याचा प्रश्नच नाही. यामध्ये असणार्‍या 2200 एमएएचच्या बॅटरीमुळे हा स्पीकर तुम्ही शॉवरपासून बाजूलादेखील काढू शकता. शॉवरच्या पाण्यावर एकदा का हा चार्ज झाला की ब्लूटूथ स्पीकरप्रमाणे याचा वापरदेखील करता येऊ शकतो. हे ब्लूटूथ हायड्रो पावर स्पीकर विविध कलर्समध्ये बाजारात उपलब्ध आहेत. याच्या किमती बारा ते पंधरा हजार रुपयांच्या घरात आहेत.

स्पीकर सांगेल पाण्याचे तापमान

या स्पीकरमध्ये भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये असणार्‍या कलर बदलणार्‍या एलईडी लाईटमुळे याला एक हटके लूक येतो. याशिवाय या स्पीकरला मोबाईल अ‍ॅपद्वारेदेखील कंट्रोल करता येते. या अ‍ॅपच्या मदतीने स्पीकरमधील एलईडी लाईटचा कलरदेखील बदलता येऊ शकतो. याशिवाय हे अ‍ॅप तुम्हाला पाण्याचे तापमान आणि झालेला पाण्याचा वापरदेखील सांगेल.

पाण्याच्या प्रेशरमुळे होतो चार्ज

पाण्याच्या प्रेशरमुळे यामध्ये असणार्‍या हायड्रो इलेक्ट्रिक जनरेटरला ऊर्जा मिळते आणि ही ऊर्जा अर्थात करंट स्पीकरमधील बॅटरी चार्ज करतो.

Back to top button