इजिप्तमध्ये सापडला फेरो रामसेसचा पुतळा | पुढारी

इजिप्तमध्ये सापडला फेरो रामसेसचा पुतळा

कैरो ः इजिप्तमधील पुरातत्त्व संशोधकांनी हेलीओपोलिस नावाच्या पुरातत्त्व साईटवरील सूर्यमंदिरात एक प्राचीन पुतळा शोधून काढला आहे. सध्याच्या कैरोजवळ हे प्राचीन शहर होते. तेथील सूर्यमंदिरात आढळलेला हा पुतळा स्फिंक्सच्या रूपातील असून त्याचा चेहरा फेरो रामसेस दुसरा याचा आहे. प्राचीन इजिप्तमध्ये सूर्योपासना मोठ्या प्रमाणात होत असे. त्यामुळे तिथे अनेक ठिकाणी सूर्यमंदिरांचे अवशेष सापडलेले आहेत. प्राचीन इजिप्शियन संस्कृतीमध्ये सूर्यदेवाला ‘रा’ असे नाव होते. हेलिओपोलिसमधील सूर्यमंदिर हे अन्य मंदिरांपेक्षा खास होते. ‘हेलियोपोलिस’ हे खरे तर ग्रीक नाव असून शहराचे मूळ इजिप्शियन नाव ‘लुनू’ असे आहे. याच ठिकाणी पहिल्या सूर्योदयाबरोबर जगाची निर्मिती झाली असे प्राचीन इजिप्शियन संस्कृतीमध्ये मानले जात असल्याने याठिकाणी असलेल्या सूर्यमंदिराला विशेष महत्त्व होते.

‘स्फिंक्स’ हा इजिप्त व ग्रीक संस्कृतीमधील एक काल्पनिक प्राणी आहे. त्याचे धड सिंहाचे असते तर चेहरा माणसाचा असतो. ग्रीकमध्ये हा चेहरा स्त्रीचा असतो तर इजिप्तमध्ये पुरुषाचा. प्राचीन इजिप्शियन फेरो म्हणजेच राजांचा चेहरा असलेले स्फिंक्सचे छोटे पुतळे इजिप्तमध्ये आढळलेले आहेत. आता जो पुतळा सापडला आहे तो भग्नावस्थेत आहे. त्याचा केवळ चेहराच शिल्लक असून तो फेरो रामसेस द्वितीय या राजाचा आहे. हा राजा इसवीसन पूर्व 1279 ते इसवी सनपूर्व 1213 या काळात सत्तेत होता. असे पुतळे प्राचीन काळी महत्त्वाच्या इमारती किंवा मंदिरांच्या प्रवेशद्वाराजवळ बसवले जात असत. फेरो रामसेस द्वितीय याचा हा पुतळाही सूर्यमंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ बसवला होता.

Back to top button