’विनी द पूह’ आणि जिनपिंग! | पुढारी

’विनी द पूह’ आणि जिनपिंग!

‘विनी द पूह’ हे कार्टून पात्र आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यामध्ये काय संबंध आहे? असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. अर्थातच या दोघांमध्ये सकृतदर्शनी काहीही संबंध नाही. मात्र, ‘विनी द पूह’ ही सुस्त अस्वलाची व्यक्तिरेखा आता जिनपिंग यांचे जणू काही प्रतीकच बनलेली आहे. चिनी लोकांना जिनपिंग आणि ‘पूह’मध्ये भलतेच साम्य आढळते. तसेच पेंगुळलेले डोळे, सुटलेले पोट आणि चालण्या-बोलण्याची तर्‍हाही तशीच. त्यामुळे जिनपिंग यांची खिल्ली उडवायची असेल, तर हटकून ‘पूह’चा वापर केला जातो. त्यामुळेच चीनचा हा शक्तिशाली नेता ‘पूह’वरही चिडून असतो. या कार्टूनवर चीनमध्ये बंदीच आहे. आताही हाँगकाँगमध्ये ‘विनी द पूह’ हा चित्रपट प्रदर्शित होणार होता; पण त्याच्या स्क्रिनिंगवर बंदी आणण्यात आली आहे!

हा चित्रपट याच आठवड्यात हाँगकाँगमध्ये प्रदर्शित होणार होता. छोट्या बजेटचा हा चित्रपट 200 ठिकाणी केवळ सहा महिन्यांमध्येच विकला गेला आहे. डिस्ट्रिब्युटर सेव्हन पिलर्सकडून दिल्या गेलेल्या माहितीनुसार हा चित्रपट 23 मार्चला हाँगकाँगच्या 32 चित्रपटगृहांमध्ये दाखवला जाणार होता. मात्र, त्याचे प्रदर्शन थांबवण्यात आले आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने तर ‘आम्ही आता आमचे केस उपटून घेत आहोत’ असा त्रागा केला आहे. ‘विनी द पूह’ ही कार्टून व्यक्तिरेखा जगभरातील बच्चे कंपनीत लोकप्रिय आहे. त्याचे कॉमिक पुस्तकही विकले जाते आणि त्यावर टीव्ही मालिका, अ‍ॅनिमेशनपटही बनवले जातात. हे गोड अस्वल जिनपिंग यांच्या नजरेत खुपण्याचे कारण म्हणजे ते आता त्यांची खिल्ली उडवण्याचे माध्यम बनलेले आहे. त्यामुळेच या चित्रपटावरही संक्रांत आली आहे. ‘पूह’चा वापर सोशल मीडियात जिनपिंग यांची खिल्ली उडवणार्‍या अनेक मिम्समध्येही करण्यात आलेला आहे. असे मिम्स बनणे 2013 मध्ये सुरू झाले. ज्यावेळी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना भेटण्यासाठी जिनपिंग गेले. त्यावेळेपासून ‘पूह’ने जिनपिंग यांची डोकेदुखी वाढवलेली आहे. त्यामुळेच आता जगभरात 4 हजार पडद्यांवर दाखवला गेलेला हा चित्रपट हाँगकाँगमध्ये प्रदर्शित होऊ शकलेला नाही.

चित्रपटाचे दिग्दर्शक फ—ेक-वॉटरफील्ड यांच्या म्हणण्यानुसार यामागे काहीतरी काळेबेरे आहे. आधी हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला होता; पण रातोरात काही तरी झाले आणि प्रदर्शन थांबवण्यात आले. दिग्दर्शकाला यामागचे ‘गूढ’ समजत नसले, तरी त्यामागे काय कारण असेल हे अवघ्या जगाला माहिती आहे! ब्रिटिश लेखक ए. ए. मिल्ने आणि इलस्ट्रेटर ई. एच. शेफर्ड यांची ‘विनी द पूह’ ही निर्मिती आहे. या पात्राशी संबंधित कथांचे पहिले पुस्तक 1926 मध्ये ‘विनी द पूह’ या नावानेच प्रकाशित झाले होते. त्यानंतर अशी अनेक पुस्तके आली. या गोष्टी अनेक भाषेत भाषांतरित झाल्या. 1961 मध्ये ‘पूह’वर अ‍ॅनिमेशनपट बनवण्याचे हक्क वॉल्ट डिस्ने कंपनीने घेतले. कंपनीच्या अ‍ॅनिमेशनमुळे ‘पूह’ आणखी लोकप्रिय झाला. मात्र, आता जिनपिंग यांच्यामुळे बिचारा अडचणीत सापडला आहे. तिसर्‍यांदा राष्ट्राध्यक्ष बनून चीनचे सर्वेसर्वा बनलेल्या जिनपिंग यांच्याविरोधात खुद्द चिनी लोकांमध्येच असंतोष आहे. या असंतोषाला, रोषाला व्यक्त करण्यासाठी ‘पूह’ हे एक साधन बनलेले आहे. त्यामुळेच जिनपिंग यांच्या सत्तेच्या डोळ्यात ‘विनी’ खुपत आहे!

– सचिन बनछोडे

Back to top button