गॅजेट : पेन टॅबलेट

संगणकाचे रूपडे इतके बदलले आहे की, टेबलवरील सीपीयू आणि मॉनिटरचा डबा आता टॅबलेट रूपाने आपल्या खिशात बसू लागला आहे. आजच्या या गॅजेट वर्ल्डमध्ये तर क्षणागणिक नवनवे गॅजेटस् संगणकीय वापर आणखी सोपा बनवत चालले आहेत. यापैकी एकच म्हणजे पेन टॅबलेट. पेन टॅबलेट म्हणजे थोडक्यात काय तर, एका पेन अर्थात स्टायलस आणि त्यासोबतचे एक टॅब म्हणजेच पाटी. एकदा का ही पाटी तुम्ही तुमच्या संगणकाशी जोडली की, मग एखादे चित्र असो, भूमितीच्या आकृत्या असो किंवा बीजगणितातील समीकरणे या पेन टॅबलेटचा वापर करून ती तुम्ही अगदी कागदावर रेखाटल्याप्रमाणेच संगणकावर रेखाटू शकता.
असे काम करते पेन टॅबलेट
डिजिटल रायटिंग पॅड यूएसबीच्या मदतीने संगणकाशी जोडावे लागते. त्यानंतर आवश्यक ते सॉफ्टवेअर संगणकात इन्स्टॉल केले की झाले, मग तुम्ही याचा वापर घर, कार्यालय असो किंवा शाळा कुठेही अगदी सहजरीत्या करू शकता. या रायटिंगपॅडसोबत दिलेल्या पेनचे बटन्स आपल्या आवश्यकतेनुसार सेट करता येतात. जसे की, इरेझर किंवा राईट क्लिक. ड्रॉईंग टॅब्लेटचा वापर करून तुम्ही टच स्क्रीन सिस्टीम असो किंवा माऊसपेक्षा अधिक कलात्मक डिझाइन्स तयार करू शकता. यासोबतच्या पेनमधील सेन्सर्समुळे अगदी आपल्या एचबी पेन्सिलप्रमाणे अधिक जोरात रेखाटल्यास गडद रेषा उमटते आणि हलक्या हाताने रेखाटल्यास हलकी रेषा उमटते अगदी तसेच फिचर्स या पेनमध्ये देण्यात आले आहेत. यामुळे तुम्ही याचा वापर करून स्केच असो, स्ट्रक्चरल ड्रॉईंग, फ्लोअर प्लॅन, लँडस्केप, एरियल-व्ह्यू ड्रॉईंग अगदी सहजरीत्या रेखाटू शकता.
यामध्ये करू शकता वापर
संगणकामधील पॉवर पॉईंट, पीडीएफ फाईल, वर्डफाईल किंवा एक्स एल प्रोग्राममध्ये या पेन टॅबलेटचा आपण वापर करू शकतो. याशिवाय थ—ीडी आर्ट करण्यासाठी विविध सॉफ्टवेअर्समध्ये देखील याचा वापर केला जातो. या टॅबलेटवर पेनने लिहिलेली अक्षरे उमटू लागतात. याशिवाय या पेन टॅबलेटमधील स्टायलस अर्थात पेनच्या वापराचा सराव झाला की, कॉम्प्युटर माऊसपेक्षा हे वापरणे सोपे समजले जाते.
ऑनलाईन शिक्षणासाठी उत्तम
सध्याच्या या ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांसाठी हे पेन टॅबलेट उपयुक्त आहे. वहीवर अथवा पाटीवर लिहिल्याप्रमाणेच या टॅबलेटवर लिहिल्यास ती अक्षरे संगणकातील प्रोग्राममध्ये उमटू लागतात. यामुळे आपल्याला हव्या तशा नोटस् बनवता येतात. याशिवाय शिक्षक याचा ब्लॅक बोर्डसारखा वापर करू शकतात. अगदी तीन-चार हजारांपासून असे पेन टॅबलेट बाजारामध्ये उपलब्ध आहेत.