लवंगी मिरची : पॉवरफुल्ल महिला | पुढारी

लवंगी मिरची : पॉवरफुल्ल महिला

संपूर्ण राज्यात, देशात, नव्हे तर संपूर्ण जगात महिला दिन जोरात साजरा झाला; पण मी काय म्हणतो राजा, सगळीकडे महिलांचेच राज्य आहे.
बरोबर आहे यार तुझं म्हणणं, पटलं मला. आता आमच्याच घरचे घे ना, आजीला विचारल्याशिवाय आजोबा काही करू शकत नाहीत, माझे वडील, तर आईच्या इतके धाकात आहेत की, तिची परवानगी घेतल्याशिवाय ते बाहेरच्या माणसाला हो पण म्हणू शकत नाहीत. आता माझी काय कथा वेगळी सांगू? आमची ही म्हणजे, तिचा कम्प्लीट कंट्रोल आहे बघ आमच्या घरावर.
अशीच परिस्थिती कमी-जास्त सगळीकडे असते. एक महिला एकाच वेळेला तिची सासू, सासरा, नवरा, लेक, जावई, मुलगा, सून, नातू आणि शेजार पाजारच्या पाच-दहा घरांचा कारभार बघत असते. तर मग माझं म्हणणं आहे की, महिला पॉवरफुल्ल आहेत की त्यांच्याशिवाय घरातील पानच हालत नाही!
हो ना यार. काही काही गावांमध्ये गावाचा कारभार पण महिलाच पाहतात. म्हणजे आमच्या गावचे उदाहरण घे. सरपंच महिला, ग्रामविकास अधिकारी महिला, निवडून आलेल्या पंचांमध्ये बारा पैकी सात महिला, जिल्ह्याच्या बालकल्याण अधिकारी महिला, जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक पण महिलाच, एवढेच काय कलेक्टरच्या पोस्टवर पण एक बाईच बसलेल्या आहेत.
अरे हे तर काहीच नाही. राज्यामध्ये काही काही मॉडेल पोलिस ठाणे निर्माण केली आहेत. तिथे पोलिस निरीक्षकपासून ते प्रत्येक कॉन्स्टेबल महिलाच आहेत. अगदी रात्रीच्या गस्तीला पण महिला पोलिसच असतात. म्हणजे त्या गावाची कायदा सुरक्षाव्यवस्था कोण पाहतं? महिलाच ना?
माझ्या घरचा सगळा कारभार, खरेदी, कपडे खरेदी माझीसुद्धा,
पोरांचीसुद्धा आणि स्वतःचीसुद्धा माझी बायकोच करते. काही निर्णय घ्यायचा असेल, तर ती माझा सल्ला अजिबात विचारात घेत नाही. सल्ला घेणार ती फक्त तिच्या आईकडून म्हणजे माझ्या सासूबार्ईकडून. त्या पण एक महिलाच आहेत. म्हणजे अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्षपणे माझं घर महिलाच चालवत आहेत. त्यामुळे माझं म्हणणं तेच आहे की, महिला दिन साजरा झालाच पाहिजे? अनेक महिलांनी देशाचा सन्मान वाढविला आहे, तर अनेक महिलांनी आपल्या शौर्याने देश रक्षणासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे. इतकी महान संस्कृती आहे आपल्या देशाची! आज प्रत्येक क्षेत्रात महिला आपल्या कर्तबगारीचे दर्शन घडवत आहेत. त्यांच्या यशाने भारताची शान जगभरात आणखीनच वाढत आहे. जागतिक पातळीवर अनेक महिलांनी आपला ठसा उमटविला आहे, अशा महिलांना एक दिवस नाही, तर नेहमीच नमन केले पाहिजे.

Back to top button