31 मार्चपर्यंत पूर्ण करा ही 5 कामे | पुढारी

31 मार्चपर्यंत पूर्ण करा ही 5 कामे

आर्थिक वर्ष 2022-23 मधील अखेरचा महिना मार्च सुरू आहे. या महिन्यात काही महत्त्वाची कामे पूर्ण करायची आहेत. शक्यतो उद्यावर ही कामे ढकलू नका. कबिराचा दोहा तुम्हाला माहिती असेलच… ‘कल करे सो आज कर, आज करे सो अब…’

आधार-पॅन लिंक करणे

आधार-पॅन लिंक करणे हे त्यातल्या त्यात सर्वांत महत्त्वाचे काम. ते 31 मार्च 2023 पर्यंत केले नाही, तर पॅन निष्क्रिय होईल. 31 मार्चनंतर ते केले, तर उगीच विलंब शुल्क म्हणून सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसकडून 1000 रुपयांचा भुर्दंड बसेल.
कर बचत गुंतवणूक

2022-23 साठी तुम्ही अद्याप कर गुंतवणूक केली नसेल, तर ती लवकर करा. पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना, 5 वर्षांची मुदत ठेव आणि ‘ईएलएसएस’ आदींत गुंतवणूक करून कलम 80 सी अंतर्गत कर सवलत मिळते. त्यासाठी 31 मार्चपर्यंत या योजनेत गुंतवणूक करावी लागेल.

पीएम वय वंदना योजना

ज्येष्ठ नागरिकांनी पीएम वय वंदना योजनेत गुंतवणूक करण्यासाठी 31 मार्च 2023 ही अखेरची मुदत आहे. योजनेला मुदतवाढीसाठीची कोणतीही अधिसूचना सरकारने जारी केलेली नाही. ही 60 वर्षे आणि त्यावरील नागरिकांसाठीची पेन्शन योजना आहे.

अमृत कलश योजना

स्टेट बँक ऑफ इंडियाची अमृत कलश योजनेत गुंतवणुकीसाठीची मुदत या महिन्यात संपणार आहे. या योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 7.6 टक्के, तर इतरांना 7.1 टक्के व्याज दिले जाते. या मुदत ठेव योजनेत 400 दिवसांसाठी गुंतवणूक करावी लागते.

मुच्युअल फंड नामांकन

म्युच्युअल फंडात नामांकनाची प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल, तर ती त्वरित करा. कारण यासाठी सर्व फंड हाऊसेसकडून 31 मार्च ही त्यासाठीची शेवटची मुदत आहे. नामांकन न केल्यास तुमचे म्युच्युअल फंड खाते गोठवले जाऊ शकते.

Back to top button