लवंगी मिरची : पदवीधर?

लवंगी मिरची : पदवीधर?
Published on
Updated on

जगन : फार विचारात पडलेला दिसत आहेस मगन, काय चाललंय डोक्यात?
मगन : अरे काही नाही रे. पदवीधर आमदार होण्यासाठी अर्ज भरावा म्हणतोय.
जगन : पहिली गोष्ट म्हणजे अर्ज करायची तारीख उलटून गेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुझी तर दहावी पण निघालेली नाही. मग तुझा अर्ज कसा स्वीकारतील ते लोक ?
मगन : मान्य आहे की, माझी दहावी निघालेली नाही. मी माझी डिग्री एम. ए. बी. एफ. म्हणजेच 'मॅट्रिक अ‍ॅपीयर्ड बट फेल्ड' अशी सांगत असतो; पण आपल्या गावातले सगळे डिग्रीहोल्डर सल्ला कोणाचा घेतात? माझाच ना! परवाच पाटलाचा रमेश आला होता. इंजिनिअर होणार आहे तो. विचारत होता कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करू की मेकॅनिकल? ज्ञानाच्या बाबतीत म्हणशील तर माझं ज्ञान पदवीधरांपेक्षा जास्त आहे.
जगन : हो पण अरे, पदवीधर मतदारसंघातून निवडून येणार्‍या आमदाराने त्यांचे प्रश्न सोडवायचे असतात.
मगन : हे बघ काही पण सांगू नकोस. पदवीधरांचे मुख्य प्रश्न दोनच. नोकरी मिळत नाही म्हणजे बेरोजगारी आणि दुसरा म्हणजे लग्न होत नाही म्हणून परेशान. आता मला सांग, नोकरी नाही म्हणून ज्याचं लग्न होत नाही त्याला काय पदवीधर आमदार सोयरिकी घेऊन येणार आहे काय? काही पण बोलतोस यार तू.
जगन : अरे तसं नाही. पदवीधरांचे प्रश्न त्यांचा आमदार विधिमंडळात मांडू शकतो, त्यांच्या समस्यांना वाचा फोडू शकतो. कारण, तो स्वतः पदवीधर असतो.
मगन : ते काही नाही .पुढच्या टर्मला अपक्ष म्हणून अर्ज भरतो.
जगन : अरे, पदवीधरला अपक्ष उभ राहून कसं चालेल? प्रत्येक पदवीधर कोणत्या ना कोणत्या पक्षाला बांधलेला असतो.
मगन : हे बघ राजकारण मला तू शिकवू नकोस. आधी अर्ज भरायचा अपक्ष म्हणून. नंतर कोणता ना कोणता पक्ष घोळ झाल्यामुळे पाठीमागे उभा राहतोच. थोडंबहुत व्यक्तिगत वजन आपण टाकायचं. निवडून येणे एवढे अवघड नाही रे. माझी तर एकच घोषणा असेल, निवडून द्या आणि लग्न करा. देशाची लोकसंख्या एवढी वाढते आहे की, सगळ्यांना नोकर्‍या मिळणे शक्य नाही; पण प्रत्येकाला कुठेतरी चिकटवून दिलं की झालं.
जगन : अरे, पण तुझ्या पदवीचं काय करशील?
मगन : काही नाही रे. पुढच्या टर्मपर्यंत मुक्त विद्यापीठाची पदवी मिळवतो आणि उभा राहतो. होऊन होऊन काय होईल तर ग्रामपंचायतीला पडलो, तसा पदवीधरला पडेल. तुझ्याकडे तर डिग्री आहे ना, मतदानही करशीलच.
जगन : मतदान तर करणारच आहे; पण आधी स्पष्ट व्हायला पाहिजे की, कोणाचा कोणाला पाठिंबा आहे. कोण खरंच परिवाराचे प्रश्न सोडविणार आहे.
मगन : प्रश्न कोणाचा सुटो वा न सुटो, पण निवडून येणार्‍याचा सुटलेला असतो. मला तर कधी कधी वाटतं काही उमेदवार हे पुढे पदवीधर मतदारसंघातून उभे राहण्यासाठी पदव्या मिळवत आहेत की काय? हे पदवीधर मतदारसंघ म्हणजे बायपास सर्जरीसारखे आहेत. लोकांमधून उभे राहण्याची गरज नाही, फारसा खर्च नाही. आपले पाच-दहा हजार मतदार सांभाळले की निवडून येण्याचे गणित पक्के. चल हो बाजूला. आधी दहावी काढतो आणि पुढच्या निवडणुकीआधी मुक्त विद्यापीठाची पदवी घेऊन उभा राहतो की नाही पाहा.
जगन : ते होत राहील रे. आधी स्वतःच्या लग्नाचे पाहा. वय उलटून चाललंय, कोणी पोरगी देणार नाही.
मगन : एकदा का निवडून आलो आणि आमदार झालो की मोठे मोठे लोक सोयरिक घेऊन येतील. मग उडवून टाकीन लग्नाचा बार. आहे काय आणि नाही काय?

  • झटका 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news