दिग्विजयी मुक्ताफळे !

दिग्विजयी मुक्ताफळे !
Published on
Updated on

काही नेत्यांना येन केन प्रकारे चर्चेत राहण्याची सवय असते; त्यासाठी प्रसंगी कितीही टीका झाली तरी त्याची त्यांना पर्वा नसते. 'नाम नहीं बदनाम सही,' अशीच त्यांची वृत्ती असते. अशांची यादी करायची झाली तर त्यात काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांचे नाव सर्वात वरच्या क्रमांकावर येईल!

भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करून त्यांनी नवीन वादच निर्माण केला आहेच; परंतु त्याहीपेक्षा गंभीर म्हणजे, भारतीय लष्कराच्या कारवाईसंदर्भात शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे विरोधकांनी काँग्रेससह दिग्विजय सिंह यांना लक्ष्य केले आहेच; परंतु काँग्रेस पक्षानेही त्यांच्या या वक्तव्याबाबत असहमती दर्शवून ते त्यांचे व्यक्तिगत मत असल्याचे म्हटले आहे. 'भारत जोडो' यात्रेमध्ये व्यग्र असलेल्या राहुल गांधी यांनीही, 'आमचा लष्करावर पूर्ण विश्वास असून, लष्कराला कारवाईचे कोणतेही पुरावे देण्याची गरज नाही,' अशा स्पष्ट शब्दांत सिंह यांना फटकारले. खरेतर कोणत्याही पक्षाच्या नेत्याने लष्करासंदर्भात, लष्करी कारवाईसंदर्भात अत्यंत जबाबदारीने वक्तव्य केले पाहिजे.

सार्वजनिक जीवनात काम करताना त्याबाबतची पथ्ये आणि संकेतही पाळले पाहिजेत, हे अशा नेत्यांना ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे. लष्कर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर सज्ज असते, या स्थितीत जवानांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने भूमिका बजावली पाहिजे. त्यातून कोणीही सुटलेला नाही. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असते आणि ते सतत सुरूच असते. त्याबद्दल कुणाचे काही म्हणणे नसते; परंतु लष्कराला राजकारणात ओढण्याचा प्रयत्न करून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न म्हणजे प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार म्हणावा लागेल. सत्ता येत आणि जात असतात.

सत्तेतील पक्षही बदलत असतात; परंतु देशाचे संरक्षणविषयक धोरण, परराष्ट्र धोरण निरंतर चालत असते. त्यात काळानुरूप आणि परिस्थितीनुरूप बदल होत असले तरी त्यामागे देशहिताची वृत्ती कायम असते. त्यामागे कुणाचा व्यक्तिगत दृष्टिकोन नसतो. त्याचमुळे रशिया-युक्रेन युद्धानंतर जग दोन गटांमध्ये विभागले असताना प्रचंड दबाव असतानाही भारताने संतुलित आणि संयमी भूमिका घेतली.

एकीकडे रशियाला युद्ध थांबविण्याची विनंती करतानाच दुसरीकडे युक्रेनशीही संवाद तुटू दिला नाही. रशिया हा भारताचा जुना मित्र; पण मधल्या काळात अमेरिकेशी जवळीक वाढल्यानंतर तो काहीसा दुरावल्याचे चित्र होते; परंतु भारताने कठीण परिस्थितीत पुन्हा या जुन्या मित्राला साथ दिली आहे. ती देताना त्यांच्या युद्धखोरीपासून स्वतःला दूर ठेवले.

हे परंपरेने चालत आलेल्या परराष्ट्र धोरणाचे यश म्हणता येईल. संरक्षणासंदर्भातही अशीच निरंतरता असते. आपले शेजारी देश तेच आहेत आणि देशांतर्गत सरकारे बदलली तरी त्यांच्या धोरणांमध्ये किंवा वृत्तीमध्ये फरक पडत नाही. राजकीय पातळीवर काहीही भूमिका घेतली तरी संरक्षणासाठी सैनिकांना सतत डोळ्यात तेल घालून काम करावेच लागत असते.

दिग्विजय सिंह यांनी सर्जिकल स्ट्राईकसंदर्भात केलेले वक्तव्य सवंग तर आहेच; परंतु बेजबाबदारही आहे. लष्करी जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला नव्हता, ही कारवाई केल्याचा कुठलाही पुरावा नाही, हे त्यांचे वक्तव्य लष्कराला संशयाच्या भोवर्‍यात ओढणारे आहे, म्हणूनच ते गंभीर आहे.

सिंह यांचा वाचाळपणा देशाला नवीन नाही. 2014 च्या निवडणुकीच्या आधी काँग्रेसची जी नाचक्की झाली, त्यामध्ये त्यांनी वेळोवेळी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांचा मोठा वाटा होता. एकीकडे भारतीय जनता पक्ष आक्रमक होत असताना सिंह यांच्यामुळे काँग्रेसला वारंवार बचावात्मक पवित्र्यात जावे लागत होते. आतासुद्धा त्यांनी जी वेळ निवडली आहे, ती अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे. राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो' यात्रेमुळे देशभरात काँग्रेससाठी चांगले वातावरण निर्माण झाले आहे. ही यात्रा अंतिम टप्प्यात जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचत असताना त्यांनी हे वक्तव्य केले.

एकीकडे राहुल गांधी समाजातील सर्व घटकांना आपलेसे करण्याचा प्रयत्न करून काँग्रेसचा जनाधार वाढवत असताना सिंह यांनी आपल्या वर्तनाने त्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला आहे. या वक्तव्यामुळे पक्षाला आपली ताकद सारवासारव आणि खुलासे करण्यासाठी वाया घालवावी लागली. काँग्रेसने त्यांच्या या वक्तव्यापासून स्वतःला वेगळे केले असले तरी विरोधकांना पक्षाला लक्ष्य करण्यासाठी आयते निमित्त मिळत असते.

त्याअर्थाने काँग्रेस पक्षाचेही मोठे नुकसान होते आहे, हे कळूनही काही फरक पडण्यासारखी स्थिती नाही. ते करण्यासाठी कुणा बाहेरच्या व्यक्तीची गरज नाही, पक्षातील मंडळीच ते इमाने इतबारे करीत आहेत. सर्जिकल स्ट्राईकसंदर्भातील या वक्तव्याने तेच साधले गेले आहे. राहुल गांधी यांच्या यात्रेचे नाव भारत जोडो असले तरी त्यांचे सहकारी भारत तोडण्याचे काम करीत असल्याची टीका करण्याची संधी भारतीय जनता पक्षाला मिळाली.

दिग्विजय सिंह हे पक्षातील एवढे ज्येष्ठ नेते आहेत आणि पहिल्या दिवसापासून ते भारत जोडो यात्रेत सहभागी आहेत, त्यांच्यावर कारवाई तरी कशी करणार? त्यामुळे झालेले नुकसान गुमान पाहात राहण्याशिवाय पर्याय उरत नाही. खरेतर काँग्रेस पक्षानेच नव्हे, तर सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या नेत्यांसाठी आचारसंहिता घालून दिली पाहिजे.

देशाच्या संरक्षणविषयक मुद्द्यांबाबत तसेच धार्मिक विषयांबाबत बोलून सामाजिक स्वास्थ्य बिघडवणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचे धोरण अवलंबले पाहिजे. नेता कितीही मोठा असला तरी त्याचा मुलाहिजा ठेवता कामा नये. राजकारणापलीकडे जाऊन देशहिताच्या भूमिकेतून अशा कारवाया झाल्या, तरच वाचाळांना आळा बसेल आणि देशातील वातावरणही बिघडणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news