लवंगी मिरची : चेहरा आणि डोळे

लवंगी मिरची : चेहरा आणि डोळे
Published on
Updated on

नुकतीच एक बातमी वाचण्यात आली आणि ती म्हणजे बँकेमध्ये आता तुमची ओळख तुमच्या चेहर्‍याने होणार आहे. म्हणजे तुम्हाला सोबत पासबुक नेण्याची गरज नाही. स्वतः कुठलाही व्यवहार करण्यासाठी तुमचा चेहरा पुरेसा आहे. मग आता प्रश्न असा उभा राहतो की, जिथे आपला चेहरा आपण घेऊन जातो त्या प्रत्येक ठिकाणी महिलावर्ग मेकअप वगैरे केल्याशिवाय जात नाही. व्यवस्थित राहणे आणि व्यवस्थित दिसणे याबाबतीत महिलांचा फार मोठा कटाक्ष असतो. साध्या कार्यक्रमाला जातानासुद्धा त्या व्यवस्थित तयार होऊन जातात. आता तर बँकेमध्ये चेहर्‍यावरच ओळख पटणार आहे तर मग बँकेतील काम पंधरा मिनिटांत संपेल; पण त्यापूर्वी मेकअप एक तास चालेल, अशी एक शक्यता आहे .

पुढे कधीकाळी तंत्रज्ञान इतके प्रगत होईल की, ज्यामुळे माणसाची ओळख त्याच्या प्रत्यक्ष अस्तित्वामुळे होऊ शकते याची शक्यता माहीत असल्यामुळे बहुधा परमेश्वराने प्रत्येक व्यक्तीच्या बोटांवरील रेषा वेगळ्या ठेवल्या, त्याचबरोबर डोळ्यांमधील लेन्स प्रत्येकाचे वेगळे ठेवले. एवढा मोठा चमत्कार की, ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला वेगळे काहीतरी देण्याचा प्रयत्न फक्त देवच करू शकतो यात संशय नाही. पूर्वी डोळ्यांचा वापर डोळ्याला डोळे भिडवण्यासाठी किंवा डोळ्यांमधून जरब टाकण्यासाठी किंवा अगदीच प्रेम प्रकरणांमध्ये नेत्र पल्लवी करण्यासाठी होत असायचा. तो आता बँकेतील व्यवहार करण्यासाठी होणार आहे. एक प्रसिद्ध उर्दू शेर आहे,'कौन कहता है के मोहब्बत में बात नही होती, ये हकीकत तो निगाहों से बयां होती है.' आता ही हकीकत किंवा ही निगाहे इथून पुढे बँकेचे व्यवहारांमध्ये वापरण्यास केंद्र शासनाने नुकतीच परवानगी दिली आहे. बँकेत जायचे, डोळ्यांची उघडझाप करायची, स्वतःची ओळख त्यामधून निर्माण होईल.

पैसे घ्यायचे आणि निघायचे, व्यवहार संपला. इथून पुढे बँकेत जाताना लोक चेहरा स्वच्छ धुऊन त्यावर हलकेसे पावडर टाकून जाताना दिसले तर नवल वाटू देऊ नका. कारण तुमचा चेहरा, तुमचे डोळे हीच तुमची ओळख होणार आहे. जगाने तंत्रज्ञानात आणखी एक क्रांती केली आहे आणि आपला देश यात आघाडीवर आहे याचाही आपण भारतीयांना अभिमानच वाटेल. आपण आधार कार्ड काढतो, पासपोर्ट काढतो तेव्हा या सर्व बाबींची नोंद केली जाते आणि मग जगभरात आपण कुठेही गेलो तरी आपण कोण आहोत याची तत्काळ ओळख समोरच्या व्यक्तीला पटते. त्यामुळे बँकेत जाताना व्यवस्थित तयार होऊन जा म्हणजे तुमचा चेहरा प्रसन्न दिसेल हे नक्की. परंतु अकाऊंटला पैसे असतील तरच व्यवहार होऊ शकेल हे मात्र विसरायला नको.

आता जगभरात तंज्ञज्ञानाचा विस्फोट झाला आहे. त्यामुळे कोणत्याही व्यवहारात पारदर्शकता यावी, यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्याला आता बँकिंग क्षेत्रही अपवाद नाही. फसवणुकीच्या कारणामुळे डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक व्यक्तीची माहिती ऑनलाईन घेतली जाते. बँक असो अथवा कोणतेही क्षेत्र असो, डिजिटल हजेरी घेतले जाते. त्यामध्ये डोळे, चेहरा, फिंगरचा वापर केला, याचाच अर्थ तुमचे डिजिटल अस्तित्व शोधले जाते. बायोमेट्रिक प्रणालीमुळे जे लोक कार्यालयात वेळेत पोहोचत नाहीत, त्यांच्यासाठी केलेली एक डिजिटल प्राणाली आहे. त्यामुळे शिस्त मोडणार्‍यांसाठी हा एका चांगला उपाय आहे. आता कोणतेही क्षेत्र असो, त्याठिकाणी प्रणाली आवश्यक बाब ठरली. त्यामुळे आता सर्वांना वेळेचे बंधन पाळणे अनिवार्य ठरले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news