चुका दुरुस्तीची प्रवृत्ती | पुढारी

चुका दुरुस्तीची प्रवृत्ती

व्यक्तिमत्त्वाचे मूलभूत उद्दिष्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीत असलेल्या उपजत गुणांचा पूर्ण विकास करणे, असे मत गोल्डस्टीन, रॉजर्स व मॉस्लो या तत्त्ववेत्त्यांनी व्यक्त केले आहे. मॉस्लोने तर यासाठी बीधोवेन, लिंकन, आईन्स्टाईन, रुझवेल्ट या जगप्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांचा अभ्यास केला आहे. कोणतीही व्यक्ती स्वतःचे कौशल्य एका उत्तुंग स्तरावर नेऊन ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करीत असते. MPSC परीक्षेत वर्ग-2 पद मिळालेला विद्यार्थी वर्ग-1 पदासाठी, तर काही उमेदवार खअड साठी प्रयत्नशील असतात. यासाठी प्रत्येकात जिद्द, प्रयत्नांतील सातत्य आणि स्वतः केलेल्या चुकांमध्ये दुरुस्ती करण्याची प्रवृत्ती रुजण्याची गरज असते. चार्लस् डार्विनने त्याचा origin of species हा ग्रंथ 22 वर्षार्ंच्या अथक परिश्रमांनंतर प्रकाशित केला आणि तो प्रकाशित केल्यानंतर त्यास वाटले की, हा ग्रंथ मी खूपच लवकर प्रसिद्ध केला. त्यात आणखी बर्‍याच घटना घालून तो परिपूर्ण करता आला असता. याबाबतीत गोध या शिल्पकाराचे विचार ध्यानात घेतले पाहिजेत. वयाच्या 82 व्या वर्षी तो म्हणाला, Ever mounting higher higher, Ever further must I gaze.”

तात्पर्य – जसजसा तुम्ही करिअरचा आलेख उंचावत नेता, तसतसा तुमचा द़ृष्टिकोन व आवाका रुंदावत गेला पाहिजे. हे भारतीय दंडसंहिता (IPC) तयार करणार्‍या लॉर्ड मेकॉलेचे उद्गार याबाबत बोलके आहेत. मेकॉलेने तयार केलेली दंडसंहिता ही जगात सर्वश्रेष्ठ आहे. सोप्या व सरळ भाषेत दंडसंहिता तयार करूनही तो त्याच्या कार्याबद्दल समाधानी नव्हता. आपल्या मित्राला लिहिलेल्या पत्रात तो म्हणतो, आपल्या देशातील तरुणी ज्या कादंबर्‍या वाचतात त्यापेक्षाही चांगली व त्यांना आवडणारी कादंबरी लिहिल्याशिवाय मला समाधान मिळणार नाही. जीवनाच्या सर्व क्षेत्रांत त्याला प्रभुत्व मिळवायचे होते. येहुदी मेन्युहीनसुद्धा संगीतातील श्रेष्ठ व्यक्तीचा मान मिळाल्यानंतरही रोज कित्येक तास व्हायोलिनवर सराव करायचा.

ज्यांना त्यांच्या क्षेत्रात परिपूर्णता मिळवायची असते, त्या क्षेत्रातील अत्युच्च शिखर गाठायचे असते, ते कधीही अंधानुकरण करीत नाहीत. इतरांनी टीका केली तरी चालेल; पण स्वतःच्या पद्धतीने व मार्गाने ते सतत प्रामाणिक प्रयत्न करीत राहतात. लाँगफेलो या कवीने त्याच्या ‘”The Ledder of Augustin” या कवितेत लिहिले आहे की, “The heights by great men reached and kept, were not attained by sudden flight, But they while their compainons slept, were toiling upward in the night.” महान व्यक्ती प्रसिद्धीच्या उंच शिखरावर पोहोचताना इतरांपेक्षा जास्त वेगाने अविश्रांत परिश्रम करीत असतात.

म्हणूनच त्यांना उत्तुंग यश प्राप्त होते. स्पर्धा परीक्षांना बसणार्‍या उमेदवारांनासुद्धा स्वतःचे वेगळेपण सिद्ध करावयाचे असते. लाखात उठून दिसायचे असते. त्यासाठी स्वतःची स्वतंत्र शैली ठरवून यश मिळवायला हवे. जसजसा त्यांच्या करिअरचा आलेख उंचावत जाईल, तसतशा त्यांच्या कर्तृत्वाच्या कक्षा रुंदावत जातील. त्यासाठी सर्वसमावेशक द़ृष्टिकोन निर्माण झाला पाहिजे. व्यक्तिमत्त्वाचे परिपूर्णत्व म्हणजे वैयक्तिक श्रेष्ठत्व नसून, तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा व कर्तृत्वाचा समाजाला झालेला महत्तम फायदा. व्यक्तिमत्त्वाची यशस्विता व महानता तिच्या समाजासाठी होणार्‍या उपयुक्ततेवर ठरते. तुम्ही समाजासाठी जितके जास्त उपलब्ध असाल, कार्य कराल, तितके तुम्ही यशस्वी व्हाल.

  • देविदास लांजेवार 

Back to top button