संघटनेतील सावळागोंधळ काँग्रेस पक्षाच्या मुळावर | पुढारी

संघटनेतील सावळागोंधळ काँग्रेस पक्षाच्या मुळावर

एकेकाळी महाराष्ट्रातील काँग्रेस संघटना म्हणजे काँग्रेस पक्षाचा भला भक्कम बालेकिल्ला होता. स्वातंत्र्य काळापासून ते नव्वदच्या दशकापर्यंत काँग्रेस पक्ष राज्यातील प्रभावी पक्ष होता. गेल्या दहा वर्षांत मात्र हे चित्र बदलले आणि काँग्रेस बँकफूटवर गेली. देशभरातच पक्षाची पीछहाट चालू आहे. त्याला महाराष्ट्र अपवाद राहिलेला नाही. आता तर पक्षातील सावळागोंधळ कळसाला पोहोचल्याचे दिसत आहे. अलीकडील घटनांनी हा गोंधळ अधोरेखित झाला आहे. पक्षात कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही, हे पुन्हा एकदा प्रकर्षाने पुढे आले आहे.

शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातील विधान परिषदेच्या जागांसाठी सध्या निवडणूक सुरू आहे. अलीकडेच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत पक्षाचे उमेदवार चंद्रकांत हांडोरे पराभूत झाले होते आणि अचूक गणित मांडून, पद्धतशीर व्यूहरचना करून भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपला अतिरिक्त उमेदवार विजयी केला होता. सध्या सुरू असलेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारीवरून चाललेला संशयकल्लोळ लक्षात घेता, विजयाचे गणित अनपेक्षितपणे बदलण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
काँग्रेस पक्षातील गैरमेळ

नाशिक पदवीधर मतदार संघात काँग्रेसचे सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. 2009 पासून ते या मतदार संघात निवडून येत आहेत आणि मतदार संघावर काँग्रेसची चांगली पकड आहे. ऐनवेळी त्यांनी उमेदवारी दाखल केली नाही आणि त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर या मतदार संघाची जबाबदारी होती. त्यांनी सुधीर तांबे यांची शिफारस केली होती. पण मेहुणे सुधीर तांबे आणि भाचे सत्यजित यांनी बंडखोरी केली. बाळासाहेबांना धक्का दिला. पण सत्यजित यांची पडद्याआड भाजपशी हातमिळवणी चालल्याच्या हालचाली मुरब्बी बाळासाहेबांना उमगल्या नाहीत. सत्यजित यांच्यासाठी भाजपच्या धनंजय जाधव (नगर) आणि धनराज विसपुते (धुळे) यांनी माघार घेतली, यावरून पडद्याआडच्या हालचालींवर प्रकाश पडतो. काँग्रेस नेतृत्त्व या सार्‍या प्रकरणात गाफील राहिले आणि आता हक्काची जागा गमावण्याचा प्रसंग उद्भवला आहे.

एकेकाळी विदर्भ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. आता त्याची बरीच पडझड झालेली आहे. पक्षातील सावळागोंधळ नागपूर शिक्षक मतदार संघातही दिसून येत आहे. काँगे्रसने विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे नेते सुधाकर अडबाले यांना पाठिंबा दिला आहे. त्यांच्यासाठी शिवसेनेने गंगाधर नाकाडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश इटकेलवार यांना माघारीचे आदेश दिले आहेत.

या घडामोडी होत असताना काँग्रेसचे माजी आमदार आशिष देशमुख यांनी मात्र शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांना आपला पाठिंबा दिला आहे. पक्षातील या बेबनावाचा लाभ कोणाला होणार, हे उघडच आहे. राहुल गांधी भारत जोडो पदयात्रा करीत आहेत. त्यांना चांगला प्रतिसाद आहे. पण महाराष्ट्र काँग्रेस पक्षात मात्र निर्नायकी निर्माण झाल्याचे दिसत आहे. सध्या पक्ष चौथ्या स्थानावर आहे. अशीच परिस्थिती राहिली, तर हा सावळागोंधळ पक्षाच्या मुळावर येण्याचीच शक्यता आहे. मूळातच देश पातळीवर काँग्रेस पक्ष स्थिती दहनीय आहे.

अशातच पक्षाला अधूनमधून बंडखोरीचे धक्के बसत आहेत. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी आता तरी पक्षातील खदखदीबाबत गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. पक्षातील नाराज लोकांची समजूत घालून पक्ष पुन्हा कसा भरारी घेईल याकडे लक्ष द्यावे लागेल अन्यथा पक्षाला लागलेली घरघर कधीच संपणार नाही.

सुरेश पवार 

Back to top button