सरयू तीरावरी अयोध्या…

सरयू तीरावरी अयोध्या…
Published on
Updated on

अखिल भारतवर्षाला आनंद देईल, अशी बातमी नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात आली आहे आणि ती म्हणजे अयोध्येतील राममंदिराच्या उभारणीचे भव्यदिव्य काम पुढील वर्षाच्या आरंभीच पूर्ण होणार आहे. तमाम देशवासीयांनी उत्साहाने स्वागत करावे, अशी ही बातमी. राजकीय पक्षांनी श्रेय घेण्याचा किंवा टीकेचे राजकारण करण्याचा हा मुद्दाच नाही. याचे कारण श्रीराम आणि श्रीकृष्ण या व्यक्तिरेखा, त्यांच्यामार्फत प्रसृत झालेली मानवसमाजाच्या कल्याणाची शिकवण हे या देशाचे एकमेवाद्वितीय असे तत्त्वज्ञान आहे. 'भरतभूच्या तत्त्वज्ञानाचा गाळीव अर्क कोणता', या प्रश्नाचे दोन शब्दांतील उत्तर 'रामायण' आणि 'महाभारत' असे द्यावे लागेल. या खंडप्राय देशाच्या कोणत्याही कोपर्‍यातला आणि कोणत्याही आर्थिक स्तरावरचा माणूस असो, तो त्याच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत राम आणि कृष्ण यांच्या विशाल छायेखालीच जगत असतो. त्याच्या सर्व जीवन व्यवहारांत, तो घेत असलेल्या प्रत्येक श्वासात ही दोन व्यक्तिमत्त्वे असतात.

'रामायण' हे देवत्व प्राप्त झालेल्या आकाशाएवढ्या उंचीच्या व्यक्तित्वाने जमिनीवर व्यतीत केलेल्या आदर्श जीवनाचे दर्शन घडवते, तर 'महाभारत' जमिनीवरील माणसाने आकाशाएवढ्या उंचीचे कर्तृत्व आणि तत्त्वज्ञान अंगी कसे बाणवायचे, याचे मार्गदर्शन करते. ही व्यक्तिमत्त्वे दीपस्तंभाप्रमाणेच मानवजातीला सदाचरण शिकवत आली. त्यामुळेच रामाचा जन्म झालेली अयोध्यानगरी श्रद्धेचा विषय ठरली. मूळ रामजन्मभूमीवर इतिहासकाळात झालेले आक्रमण, त्यानंतर त्याबाबत न्यायालयात गेलेला वाद, त्यावर सर्व पक्षांकडून झालेले राजकारण या सार्‍याला बाजूला ठेवून आता न्यायालयाने वादग्रस्त जागा रामजन्मभूमीचीच असल्याचे पुरावे मान्य केले आणि राममंदिराच्या उभारणीचे निर्देश निःसंदिग्धरीत्या दिले, याकडे लक्ष देण्याची गरज होती.

ती जबाबदारी सरकारी यंत्रणेसह सर्व संबंधितांनी चोखपणे पार पाडली. संपूर्ण रामकथाच देशवासीयांना कमालीची स्फूर्ती, चेतना देणारी असल्याने आणि त्यातही अयोध्या आणि रामजन्मस्थान हा करोडोंच्या श्रद्धेचा विषय असल्याने न्यायालयाच्या निकालानंतर नऊ महिन्यांतच म्हणजे जून 2020 मध्ये राममंदिराचे भूमिपूजन करण्याचे ठरवण्यात आले; मात्र चीनने गलवान येथे कुरापत काढल्याने तो मुहूर्त थोडा पुढे ढकलून दि. 5 ऑगस्ट 2020 ला मंदिराचे भूमिपूजन मोठ्या धडाक्यात झाले. न्यायालयाच्या निर्देशानुसार मंदिर उभारणीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना करण्यात आली, तसेच स्वतंत्र जागी यथायोग्य अशी मशिदही उभारण्याच्या दिलेल्या निर्देशानुसारची कार्यवाहीही सुरू झाली. या प्रस्तावित मंदिराचा आराखडाही नेत्रदीपक असाच होता. एकूण आठ एकरपैकी 2.7 एकर जागेवर प्रत्यक्ष राममंदिर होत आहे. हे मंदिर तीन मजली उंचीचे असून प्रत्येक मजल्याची उंची वीस फुटांची आहे.

संपूर्ण मंदिर 161 फूट उंचीचे असेल. त्याची लांबी 360 फूट आणि रुंदी 235 फूट असणार आहे. मंदिराला एकूण पाच शिखरे असून तब्बल 160 खांबांवर ते तोलले जाईल. प्राचीन काळच्या मंदिरांमध्ये वापरले गेलेले तंत्र आश्चर्यचकित करणारे होते. आता आजच्या बांधकामशास्त्राने केलेल्या प्रगतीचा कस लावून उभारले जाणारे हे मंदिर किमान एक हजार वर्षे टिकेल, अशा पद्धतीचे असणार आहे. त्यात सिमेंट-लोखंड आदींचा वापर करण्यात आलेला नाही, तर केवळ दगडांचा वापर केलेला आहे. त्याचा दगडी पायाही मजबूत करण्यात आला असून तीव— भूकंपातही या मंदिराचे नुकसान होणार नाही. मोठ्या पुराचा उपसर्ग मंदिराला होऊ नये, यासाठी चारही बाजूंनी उंच अन् मजबूत भिंती उभारण्यात येत आहेत. त्यामुळे पूर्ण झाल्यावर हे मंदिर देखणे असेच होईल, असे निश्चित म्हणावे लागेल. या भव्य-दिव्य मंदिराच्या उभारणीचा प्रारंभ दि. 5 ऑगस्ट 2020 ला झाला आणि दोन वर्षांमध्ये म्हणजे या वर्षीच्या सप्टेंबरमध्ये त्यापैकी 40 टक्के बांधकाम पूर्णही झाले. याच वेगाने उरलेले काम त्यानंतरच्या सव्वा वर्षात म्हणजे जानेवारी 2024 ला पूर्ण होईल, अशी सुवार्ता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्रिपुरामधील आगरताळा येथे एका कार्यक्रमात दिली.

राष्ट्रीय अस्मिता आणि आस्थेपासून वेगळा न काढता येणारा आणि भारतीय संस्कृतीतील एका भावनेचा भव्य आविष्कार म्हणजे काय असतो, याचे ते मूर्त रूप अयोध्येतील हे राममंदिर ठरत आहे. बहुविध धर्म, भाषा आणि जातीपातीची बंधने तोडून देशाला एका समान धाग्यात बांधण्याची अखंडित ऊर्जा त्यात असल्याने उभ्या देशाचे ते स्फूर्तीस्थान ठरेल. त्यामुळेच मंदिराचे काम अखेरच्या टप्प्यात आले असल्याचे वृत्त राष्ट्रभावना चेतवणारे ठरेल. अर्थात, राममंदिराची उभारणी हे केवळ हिंदू धर्माच्या हितरक्षणासाठीचे आणि दुसर्‍या धर्माविषयी दुस्वास निर्माण करणारे असणार नाही. कारण, राम हे व्यक्तिमत्त्व भारतासाठी अस्मितेचा मुद्दा आहेच, शिवाय सर्वधर्मीयांमध्येही आदरस्थानीच आहे. त्याला देशाच्या सीमा कधीच नव्हत्या. विश्वात्मक देवाचे प्रतीक असलेल्या या व्यक्तिमत्त्वाचे म्हणजेच आदर्श विचार-आचार प्रणालीचे जन्मस्थळ अशी ज्या जागेबाबत करोडोंची भावना आहे, त्या जागी राममंदिर ठरलेल्या मुदतीत पूर्ण होवो आणि गदिमांच्याच शब्दांतील 'सरयू तीरावरी अयोध्या' या मनुनिर्मित नगरीमध्ये नव्या जमान्यातील नवे तीर्थक्षेत्र उदयाला येवो, अशीच प्रार्थना अवघे देशवासीय निश्चितच करतील.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news