लवंगी मिरची : नव्या वर्षाचा संकल्प | पुढारी

लवंगी मिरची : नव्या वर्षाचा संकल्प

सौ ः अहो, ही बातमी वाचली का? एका दांपत्याची साखरपुड्याची अंगठी म्हणे 21 वर्षांनी टॉयलेटच्या पाईपमध्ये सापडली.
श्री ः कुणाकडून हरवली होती?
सौ ः अहो, एन्गेजमेंट रिंग होती, कुणाच्या बोटात असेल ती? बायकोच्याच असणार ना!
श्री ः तरीच, अंगठी हरवूनही 21 वर्षे सुखाचा संसार झाला त्यांचा, नवर्‍याकडून हरवली असती तर साखरपुड्यानंतर लग्न करण्याचा घनघोर प्रसंगच उद्भवला नसता!
सौ ः काहीही बोलू नका, पण अंगठी हिर्‍याची होती हं!
श्री ः तरीही बिचारा मुग गिळून गप्प बसला, करतो काय बिच्चारा!
सौ ः हिर्‍यांची अंगठी होती ती!
श्री ः समजलं गं मला, परत परत तेच काय सांगतेस?
सौ ः तुम्ही आजपर्यंत कधी दिलीय का मला हिर्‍याची अंगठी?
सौ ः हे पहा, एवढी तुम्हाला हिर्‍यासारखी लखलखणारी बायको मिळाली, पण अद्याप मला हिर्‍याचा दागिना केलेला नाही तूम्ही, मनव्या वर्षात मी बायकोला हिर्‍याचा दागिना देईनफ, असा संकल्प करा!
सौ ः ते जाऊ द्या, संकल्पाचे काय?
श्री ः अगं करतो मी संकल्प, त्याचं काय एव्हढं?
सौ ः अग्गो बाई, आजपर्यंत कधीही इतक्या लवकर तुम्ही माझे म्हणणे ऐकले नव्हते, आजच कसे काय हे ऐकलं?
श्री ः तुला आठवतंय, गेल्या वर्षी मी कोणता संकल्प केला होता?
सौ ः हो, तुम्ही रोज पहाटे पाच वाजता उठून योगासने करण्याचा संकल्प केला होता.
श्री ः त्याचं काय झालं?
सौ ः 31 डिसेंबर साजरा करून रात्री उशीरा झोपल्याने वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुम्ही दहा वाजता उठला, तेही मी दहा वेळेला हाका मारल्यावर!
श्री ः दुसरा संकल्प कोणता केला होता?
सौ ः बायकोच्या हातच्या सर्व पालेभाज्या खाण्याचा. विशेषतः शेपू आणि तांबडा माठ!
श्री ः त्याचं काय झालं?
सौ ः तुम्ही बाजारातून पालेभाज्या आणण्याचेच बंद केलं!
श्री ः आता इतकं सगळं लक्षात असूनही तू मला पुन्हा नव्या वर्षाचा संकल्प करण्यास सांगत आहेस! धन्य आहे तुझी… तूला नव्या वर्षात हिर्‍याचा दागिना मिळालाच म्हणून समज!!

Back to top button