फुटबॉलचा जादूगार! | पुढारी

फुटबॉलचा जादूगार!

जगभरातील कोट्यवधी शौकिनांना शोकसागरात लोटून फुटबॉलचा जादूगार पेले यांनी अखेरचा निरोप घेतला. सुमारे दोनशे देशांमध्ये नुसत्या खेळल्या जाणा-याच नव्हे, तर लोकप्रिय असलेल्या एखाद्या खेळाचा सम्राट जगाचा निरोप घेतो, तेव्हा त्या दुःखाची खोली काय असू शकते, याची कल्पना पेले यांच्या निधनानंतर येते. दिएगो मारडोनापासून मेस्सीपर्यंत काहींनी फुटबॉलच्या मैदानावर एखाद्या जादूगाराप्रमाणे चेंडू खेळवला. परंतु तरीसुद्धा पेले यांना फुटबॉलच्या इतिहासातील सार्वकालिक श्रेष्ठ खेळाडू म्हणून ओळखले जाते, यावरून त्यांची थोरवी लक्षात येऊ शकेल. एका सामान्य कुटुंबात जन्मलेला आणि दारिर्द्य पाचवीला पुचलेला एक मुलगा किती वेगवान प्रगती करून यशाचे सर्वोच्च शिखर सर करू शकतो, हे पेले यांच्या जीवनप्रवासाकडे पाहून लक्षात येते. चहाच्या दुकानात काम करून छोट्या पेलेला चार पैसे मिळवावे लागत होते.

फुटबॉल शिकताना तो फुटबॉल विकत घेऊ शकत नव्हता, परंतु बूटसुद्धा घेण्याची त्याची ऐपत नव्हती. त्यामुळे मोज्यामध्ये वृत्तपत्र घालून त्याला वरून बांधून खेळावे लागत होते. वडिल डॉनडिन्हो हेही फुटबॉल खेळाडू. 1950 मध्ये विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात उरुग्वेकडून ब्राझील पराभव झाल्यावर पेलेने वडिलांना धाय मोकलून रडताना पाहिले. रडणा-या वडिलांचे सांत्वन करताना, यकाळजी करू नका मी तुम्हाला एक दिवस विश्वचषक जिंकून देईन, असे दहा वर्षांचा पेले म्हणाला. वडिलांना तेव्हा कल्पनाही नसावी की, आपल्या या मुलाकडून अशी काही कामगिरी होईल. पण त्या मुलाने अवघ्या आठ वर्षांत आपले शब्द खरे करून दाखवले आणि ब्राझील विश्वचषक जिंकून दिला. विश्वचषकाच्या इतिहासात सर्वात कमी वयात (सतरा वर्षे 239 दिवस) गोल करणारा खेळाडू म्हणून पेले यांची नोंद आहे. पंधराव्या वर्षी पेले ब्राझीलच्या सर्वात मोठ्या सांटोस क्लबकडून खेळले आणि सोळाव्या वर्षी ब्राझीलच्या राष्ट्रीय संघात आपले स्थानही निश्चित केले. पेले यांनी केलेल्या हॅट्ट्रीकच्या जोरावर ब्राझीलने अंतिम फेरी गाठली आणि अंतिम फेरीत दोन गोल करून संघाला विजेतेपद मिळवून दिले. एकच नव्हे, तर आपल्या कारकीर्दीत तीन विश्वचषक त्यांनी ब्राझीलला जिंकून दिले. 1958 ला स्वीडनमध्ये, 1962 ला चिलीमध्ये आणि 1970 ला मेक्सिकोमध्ये देशाला चँपियन बनवले. पेलेची दहशत अशी होती की, 1966 साली विश्वचषकात पेलेला रोखण्यासाठी पोर्तुगाल आणि बुल्गारियाच्या खेळाडूंनी विशेष रणनीती आखली आणि ब्राझीलला पहिल्या फेरीतच बाहेर काढले. पन्नासच्या दशकात जगातील फुटबॉलला मिळालेली अनमोल देणगी म्हणजे पेले. दहा क्रमांकाची जर्सी घालून खेळणार्‍या पेले यांच्याकडे एकदा चेंडू आला की तो चेंडू गोलातच जाणार अशीच त्यांची ख्याती होती.

क्रिकेट हा भारतीयांचा धर्म म्हणून ओळखला जातो. क्रिकेट खेळणारे खेळाडू हे लोकांच्या गळ्यातील ताईत बनतात आणि चाहत्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवतात. क्रिकेटच्याही आशियाई चषक, विश्वचषक अशा स्पर्धा होत असतात, परंतु हा खेळ मोजके देश खेळतात. तरीही त्याची लोकप्रियता प्रचंड आहे. क्रिकेटच्या दसपटीने अधिक देश जो फुटबॉल खेळ खेळतात, त्यावरून त्याची लोकप्रियता आणि अशा खेळातील सर्वकालीन सर्वोत्तम खेळाडूचे श्रेष्ठत्वही लक्षात येऊ शकते. हे श्रेष्ठत्व असे तसे मिळत नसते, त्यासाठी त्याने एक हजाराहून अधिक गोल पार केलेले असतात. हॉकीमध्ये ध्यानचंद यांचा उल्लेख ज्या गौरवाने केला जातो, त्याच गौरवाने पेले यांचे नाव फुटबॉलमध्ये घेतले जाते. या दोघांनीही खेळताना स्वतःपेक्षा देशाला प्राधान्य दिले. वेग आणि चापल्याच्या बाबतीत दोघांचीही बरोबरी कुणी करू शकत नव्हते. ध्यानचंद यांनी तीन ऑलिम्पिकमध्ये भारताला विजेतेपद मिळवून दिले आणि पेले यांनी तीन विश्वचषकांमध्ये. पेले यांनी आपल्या करिश्म्याने फुटबॉल जगतात ब्राझीलला शिखरावर नेऊन ठेवले. स्वतः शिखरावर असतानाही पेले यांना तळातल्या माणसांचा कधी विसर पडला नाही किंवा आपल्या बालपणातील गरिबीचा त्यांना कधी विसर पडला नाही. त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली. ब—ाझीलमधील गरीब आणि दुर्बलांच्या जगण्याचा स्तर उंचावावा यासाठी ते सातत्याने आवाज उठवत राहिले.

तळागाळातल्या घटकांचे प्रवक्ते म्हणून आयुष्यभर त्यांनी भूमिका बजावली. आपला एक हजारावा गोल ब्राझीलमधील गरीब मुलांना समर्पित करण्यातून त्यांच्या याच बांधिलकीचे दर्शन घडते. सुमारे दोन दशकांच्या रोमहर्षक कारकीर्दीनंतर पेले यांनी सामाजिक कार्याला वाहून घेतले. अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांचे राजदूत म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली. 1992 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी पेले यांना पर्यावरणाचे राजदूत म्हणून नियुक्त केले. 1995 मध्ये क्रीडा क्षेत्रातील विशेष कामगिरीबद्दल त्यांन ब्राझीलच्या सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले. ब्राझीलचे राष्ट्रपती फर्नांडो हेनरिक कार्दोस यांनी त्यांना क्रीडा खात्याचे विशेष मंत्री म्हणून नियुक्त केले आणि युनेस्कोचे सद्भावना राजदूतही बनवले. त्या काळात ब्राझीलच्या फुटबॉलमधील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी एक कायदा त्यांनी मंजूर करून घेतला, त्याला मपेले कायदाफ म्हणून ओळखले जाते. अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी या महान खेळाडूचा गौरव करण्यात आला. आकाशाला हात टेकूनही त्याचे पाय कधी जमिनीवरून सुटले नाहीत, हे त्याच्या यशाचे मोजमाप करताना लक्ष)त घ्यावे लागेल. अशा या महान खेळाडूचा गेले काही दिवस कॅन्सरशी संघर्ष सुरू होता. कॅन्सरवर मात करून ते पुन्हा आपल्या चाहत्यांमध्ये येतील, असे वाटत होते. परंतु दुर्दैवाने तसे घडू शकले नाही. संघर्ष करीतच त्यांनी शांतपणे जगाचा निरोप घेतला. त्यांना भावपूर्ण आदरांजली!

Back to top button