बेशरम रंग! | पुढारी

बेशरम रंग!

भारतीय संस्कृतीशी बॉलीवूड चित्रपटांनी जणू फारकत घेतली आहे. तेथे दिवसेंदिवस अभिव्यक्ती आणि कलेच्या नावाखाली जो धुडगूस घातला जात आहे, तो काळजी वाटायला लावणारा आहे. त्यामुळे आता हा विषय प्रेक्षकांवरच सोडून द्यायला हवा. वाद उफाळणे आणि काही काळानंतर तो शमणे हे नेहमीचेच झाले आहे.

बॉलीवूड आणि वाद हे समीकरण नवे नाही. वेळोवेळी असे वाद निर्माण होऊन चित्रपट प्रदर्शनानंतर ते आपोआपच कालबाह्य झाले आहेत. त्याचा फायदा मात्र चित्रपटांना झाला. त्यामुळे जाणूनबुजून असे वाद निर्माण केले जातात किंवा ते निर्माण व्हावेत म्हणून खोडसाळपणा केला जातो, यावर वेळोवेळी चर्चा होत आली आहे. आता नवा वाद शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यामुळे निर्माण झाला आहे. या गाण्यातील अश्लीलता आणि त्यातील रंगसंगती यामुळे एक गट खवळला आहे. अर्थात, विरोध होत आहे म्हटल्यावर समर्थनही होणारच. त्या परंपरेप्रमाणे काहीजण समर्थनासाठीही उतरले आहेत. रंग आला म्हणजे धर्म आला आणि धर्म आला म्हणजे राजकारण तापणे स्वाभाविकच.

कोरोनानंतरच्या काळात प्रेक्षकांची अभिरूची बदलली आहे. त्यांना काहीतरी नवे हवे आहे. बॉलीवूडचे जे काही बोटांवर मोजण्याइतके चित्रपट पडद्यावर झळकले, त्यातले दोन-तीनच तेही जेमतेम यश मिळवू शकले. दुसरीकडे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील ‘पुष्पा’, ‘कांतारा’, ‘केजीएफ 2’सारखे चित्रपट नावीन्य आणि सर्वस्वी वेगळ्या सादरीकरणामुळे प्रेक्षकांची गर्दी खेचण्यात यशस्वी झाले. बदललेला हा प्रेक्षक बॉलीवूडला उशिरा का होईना लक्षात आला आहे. त्यादृष्टीने मोठे अभिनेते सतर्क झाले आहेत. आमीर खानने तर जोपर्यंत चांगला विषय हातात येत नाही, तोपर्यंत पडद्यावर न येण्याचा निर्णयच घेतला आहे. अक्षय कुमारनेही तसा विचार सुरू केला आहे. शाहरुखने मात्र वेगळे पाऊल उचलले, असे म्हणावे लागेल. प्रेक्षक येत नसेल तर त्याला ओढत आणायचा, हे सूत्र तो जुळवू पाहतो की काय, अशी शंका या वादावरून येऊ लागली आहे. कारण, गाणेच असे आहे की वाद आपसूक निर्माण व्हावा. भगवी वस्त्रे, गाण्याच्या ओळी, अश्लीलतेचे दर्शन यामुळे गाणे प्रदर्शित होताच वाद सुरू झाला. सध्या त्यावरून धर्माच्या अंगानेचर्चा सुरू झाली आहे. राजकीय नेत्यांच्या, कलाकारांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. रंगावरून वाद होत असताना गाण्यात दीपिकाने घातलेली बिकिनी, शाहरुखचा ड्रेस किती महागडा याचीही चर्चा झाली. थोडक्यात, जे अपेक्षित होते ते याद्वारे पदरात पाडून घेतल्यासारखे चित्र दिसत आहे.

गेल्या काही महिन्यांत बॉलीवूडमध्ये ‘बॉयकॉट ट्रेंड’ आला आहे. त्याचा फटका आमीर खानलाही बसला आहे. आता शाहरुखच्या‘पठाण’लाही बॉयकॉट करण्यावरून चर्चा रंगली आहे. चित्रपटच बघायला जायचे नाही, हे ठरवणारा हा वर्ग शाहरुखचे नुकसान कितपत करतो, हे पुढे पाहायला मिळेलच; पण बॉलीवूडची वाटचाल धोकादायक वळणावर आली आहे, हे यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे. चित्रपटात तेच दाखवले जाते; जे प्रत्यक्षात घडते, असे पूर्वी म्हटले जायचे. नंतरच्या काळात हे चित्र एवढे बदलले की, आता चित्रपटात दाखवितात त्याप्रमाणे वागण्याची चढाओढ लागलेली दिसते. त्यातूनच सामाजिक वातावरण कलुषित होत चालले आहे. पुढे ही परिस्थिती आणखी टोकाला जाऊ नये यासाठी सामूहिक विवेकबुद्धी शाबूत ठेवणे गरजेचे बनले आहे.

शाहरुख आणि वाद नेहमीचेच

एरवीदेखील शाहरुख आणि वाद हे समीकरण नवे नाही. त्याचा ‘माय नेम इज खान’ चित्रपट प्रदर्शित व्हायचा होता, तेव्हा त्याला पाकिस्तानी खेळाडूंबद्दलचा उमाळा दाटून आला होता. आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना परवानगी देण्याबद्दल त्याने वक्तव्य केले होते. त्यानंतर संतापलेल्या शिवसेनेने त्याच्या ‘माय नेम इज खान’ चित्रपटाला विरोध केला होता. त्याचा ‘रईस’ चित्रपट प्रदर्शित व्हायचा होता, तेव्हा तो प्रमोशनसाठी ट्रेनने मुंबईहून दिल्लीला निघाला. त्याच्यामुळे गुजरातच्या वडोदरा स्टेशनवर चाहत्यांनी मोठी गर्दी केली आणि चेंगराचेंगरीत एका चाहत्याचा मृत्यू झाला होता. चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी घडलेल्या या घटना योगायोग कशा असू शकतात, असा प्रश्न निर्माण झाला होता. याशिवाय तिसरा मुलगा अबराममुळेही तो चर्चेत असतो. अबरामच्या जन्माआधी त्याने गर्भलिंग निदान चाचणी केल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणात नंतर पोलिसांनी त्याला ‘क्लीन चिट’ दिली होती. याशिवाय 2012 मध्ये सुरक्षारक्षक आणि एमसीएच्या अधिकार्‍यांवर हल्ला केल्याने वानखेडे स्टेडियमवर त्याला प्रवेश नाकारण्यात आला होता. जयपूरमध्ये धूम्रपान केल्यानेही तो अडचणीत आला होता.

– मनोज सांगळे

Back to top button