लवंगी मिरची : वाघाचे विनंती पत्र | पुढारी

लवंगी मिरची : वाघाचे विनंती पत्र

नाही, नाही, नाही..! त्रिवार सांगतो, डरकाळी फोडून निक्षून सांगतो. काय वाट्टेल ते झालं तरी आम्ही महाराष्ट्र सोडणार नाही. सीमावासीयांच्या पाठीशी एकदिलानं राहण्याचं सांगता आणि त्याचवेळी आमची मात्र महाराष्ट्रातून स्थलांतराच्या नावाखाली हकालपट्टी करण्याचा विचार करता? याला काय न्याय म्हणायचा का? हा तर अन्यायच आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय, तुमच्या मागे तर व्याघ्र्रप्रेमाचा केवढा मोठा इतिहास आहे. तुमच्या पाठीशी सदैव वाघ राहिला. वाघाच्या काळजानं तुम्ही धाडस करून मुख्यमंत्री झालात आणि आता आमच्यावरली माया पातळ का बरं करता? तुम्ही वनमंत्री मुनगंटीवारांना हे सांगितलं पाहिजे की, वाट्टेल ते झालं तरी माझे वाघ महाराष्ट्रातच राहतील. सुरतमार्गे गुवाहाटीला गेले ते वेगळे होते. हे जंगलातले गरीब बिचारे वाघ आहेत. अगदीच नाईलाज म्हणून ते बंडखोरी करतात.

मानवी वस्तीवर हल्ला करतात. त्यात काही जीव जातात; पण त्याला सर्वस्वी आम्हीच दोषी असतो, असं कसं म्हणात येईल? महोदय, मान्य आहे की आमची संख्या वाढलीय. 2014 मध्ये आम्ही 190 होतो. आता आमची संख्या 500 वर गेलीय. तसं पाहिलं तर हे डबल इंजिनवाल्या सरकारचं यशच म्हणाला हवं; पण तो मुद्दा वेगळा आहे. आमचं म्हणणं इतकंच आहे की, कोणत्या कारणाने आणि न्यायाने आम्हाला महाराष्ट्रातून स्थलांतरित केलं जात आहे. जरा विचार करा मुख्यमंत्री महोदय, देशाचे पंतप्रधान दक्षिण आफ्रिकेतून चित्ते आणतात. त्यांची संख्या वाढावी म्हणून सरकारी पातळीवर केवढी मोठी यंत्रणा प्रयत्न करते आहे.

मग मारे काहीही न करता आमची लोकसंख्या वाढते आहे, हा आमचा गुन्हा आहे की काय? पाठवून पाठवून कुठे रवानगी करता आहात, बिहारमध्ये? महाराष्ट्रातल्या वाघांना बिहारने आश्रय द्यावा, ही लाजिरवाणीच गोष्ट समजली पाहिजे. त्या नितीश कुमार यांचा कावा महाराष्ट्राने वेळीच ओळखावा. ते आम्हाला जंगलात ठेवणार नाहीत; प्राणिसंग्रहालयात ठेवतील. एक प्रकारे महाराष्ट्रावर सूड उगविल्याचा आनंद घेतील. त्यापेक्षा आम्हाला आजन्म बंदिवासात ठेवा; पण महाराष्ट्रात ठेवा, अशी कळकळीची विनंती आम्ही करतो आहोत. आम्ही 97 टक्के विदर्भातले आहोत. महाराष्ट्राने सतत विदर्भावर अन्यायच केला असं म्हटलं जातं.

आपण आम्हाला स्थलांतरित केले तर तो समस्त विदर्भवासीयांचा अपमान ठरेल. माननीय उपमुख्यमंत्री ते सहन करणार नाहीत, अशी आम्हाला आशा वाटते. परप्रांतीयांविरोधात खळ्ळ्खट्याक् करणारे ते मनसेचे नेते आमच्याकडं लक्ष देतील आणि बिहारमध्ये आम्हाला पाठविण्यापासून सरकारला रोखतील. तुमचे कधीकाळचे नेते मविआच्या साथीने आवाज उठवतील, असं आम्हाला वाटतं. तसं झालं नाही तर अवघ्या महाराष्ट्राचे वाघप्रेम काळाच्या ओघात पातळ झालं आहे, असं समजून आमच्या काही बांधवांना नाईलाजानं घाली मान घालून पुढील जीवन बिहारमध्ये घालवण्याची वेळ येईल. कृपया मुख्यमंत्री महोदय, लक्ष द्या आणि हे टाळा, अशी पुढचे दोन पंजे जोडून विनंती आहे.

आपला महाराष्ट्रातील
अन्यायग्रस्त वाघ परिवार…

झटका

Back to top button