प्रज्वलित मनाचे तरुण हेच भविष्यातील नेतृत्व

प्रज्वलित मनाचे तरुण हेच भविष्यातील नेतृत्व
Published on
Updated on

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी 'प्रज्वलित मनाचे तरुण हेच उद्याचे नेतृत्व करतील,' असे भाकीत केले होते. ब्राझील, चीन, अमेरिका, रशिया, जपान या देशांच्या तुलनेत भारतात तरुणांची वाढती संख्या हे देशाच्या भावी क्षमतेचे एक महत्त्वाचे रहस्य आहे. या अनुषंगाने हा निर्णय स्वागतार्ह आहे. 21 व्या शतकात भारत जगावर राज्य करेल ते प्रगत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून, असे भाकीत स्वामी विवेकानंद यांनी शिकागो परिषदेत केले होते. ते आता खरे ठरत आहे. माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जी. अब्दुल कलाम यांनी 'प्रज्वलित मने' नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. यात त्यांनी भारत हा तरुणांचा देश आहे आणि प्रज्वलित मनाचे तरुण हेच उद्याचे नेतृत्व करतील, असे भाकीत केले होते. सध्या भारतीय लोकसंख्येपैकी 65 टक्के लोकसंख्या ही तरुणांची आहे.

ब्राझील, चीन, अमेरिका, रशिया, जपान या देशांच्या तुलनेत भारतात तरुणांची वाढती संख्या हे भारताच्या भावी क्षमतेचे एक महत्त्वाचे रहस्य आहे. या अनुषंगाने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उभे राहण्यासाठीची उमेदवारांची वयोमर्यादा 25 वर्षांवरून 21 वर्षे करण्याचा विचार सुरू आहे. सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडण्यात आला असून, केंद्र त्यादृष्टीने विचारमंथन करत आहे. 1986 मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळात 18 व्या वर्षी तरुणांना मतदानाचा अधिकार दिला.

आता 21 वर्षे वय झालेल्या कोणत्याही तरुणास विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक लढविण्याचा अधिकार द्यावा, असा सूर निघत आहे. या भूमिकेस काँग्रेस पक्षासह शिवसेना, राष्ट्रीय जनता दल यांसारख्या अनेक प्रादेशिक पक्षांनीही पाठिंबा दिला आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत लोकसभेचे चित्र अधिक तरुणांच्या दिशेने प्रभावी बनत आहे. मागील लोकसभेचे वर्गीकरण मोठे अद्भुत आहे. त्यामध्ये 50 वर्षांहून अधिक वयोगटातील 357 खासदार आहेत, तर 129 खासदार 41 ते 50 या वयोगटातील आहेत. ही आकडेवारी पाहता आपणास असे लक्षात येते की, भविष्यकाळात तरुणांचा सहभाग वाढणे महत्त्वाचे आहे.

या नव्या नियोजित कायद्यामुळे युवकांचा राजकारणातील सहभाग वाढेल. गांधीजी म्हणत असत की, तरुणांनी राजकारणात भाग घेतला पाहिजे. राजकारणाचा अभ्यास केला पाहिजे. राजकारणात सक्रिय होऊन विधायक कामे केली पाहिजेत. राजकारणाचे गुन्हेगारीकरण थांबविण्यासाठी राजकारणाचे आध्यात्मिकीकरण व्हावे, असा गांधीजींचा आग्रह होता. महर्षी अरविंद यांचा सांस्कृतिक राष्ट्रवादसुद्धा हेच सांगतो की, विज्ञान आणि संस्कृतीमध्ये समन्वय साधून संस्कृतीचे तेजस्वी स्वरूप भविष्यकाळात अधिक मजबूत करण्याचे कार्य जागृत तरुणवर्गच करू शकतो. या महामानवाची मुक्तीगाथा हेच सांगते की, तरुणांनी देशाच्या विज्ञान, संस्कृती आणि धर्म यांमध्ये सुवर्णमध्य साधून भविष्यात नवे नेतृत्व केले पाहिजे. डॉ. कलामांचा तरुणांचा देश हा आग्रह सार्थ होता. युवकांचा राजकारणातील सहभाग वाढल्यामुळे निरक्षीरविवेक वाढेल. राष्ट्र अधिक बलशाली होईल. निर्णयक्षमता अधिक चांगली घेता येईल आणि भावी पिढी आश्वासक बनून चांगल्या पद्धतीने कार्य करू शकेल.

नव्या नेतृत्वाचा उदय :

विधानसभा आणि लोकसभा या कायदे मंडळांमध्ये तरुणांचा भरणा अधिक वाढला तर देशात नवे नेतृत्व उदयास येईल. भविष्यात बदलते प्रश्न, बदलते जग आणि बदलत्या समाजजीवनाचा विचार करता नव्या नेतृत्वाची गरज आहे. असे नवे नेतृत्व भारतमातेचे पांग फेडण्यासाठी आणि विज्ञान-तंत्रज्ञानातील भारताची उंची गाठण्यासाठी प्रभावी ठरेल. या नव्या नेतृत्वाच्या उदयाच्या दृष्टीने हा निर्णय फलदायी ठरू शकेल. सुधारणा, कामगिरी आणि परिवर्तन (रिफॉर्म, परफॉर्म अँड ट्रान्स्फॉर्म) हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सूत्र आहे. या तिन्ही बाबतीमध्ये तरुणवर्ग अधिक विजिगीषू आहे, अधिक निर्णयक्षम आहे. अधिक दूरदृष्टीने विचार करणारा आहे. तरुणांमध्ये आणखी एक चांगला गुण दिसतो तो म्हणजे, ते अ‍ॅक्ट या फॉर्म्युल्याचे पालण करतात. तेव्हा तरुणांची ही शक्ती महत्त्वाची वाटते. आणखी एक सूत्र प्रिंन्स्टन विद्यापीठातील प्रा. आयव्ही लेटबटर्ली यांनी मांडलेले आहे. त्यांच्या मते, संशोधन करण्याची वृत्ती ही महत्त्वाची असते. संशोधनामुळे प्रश्न कळतात आणि मग कृती ठरवता येते. हा कृती कार्यक्रम संवादाच्या माध्यमातून लोकांपर्यंत घेऊन जाता येतो. वारंवार आपल्या कामगिरीचे मूल्यमापन करून सुधारणा करता येते. 'पळा पळा कोण पुढे पळे तो' या सूत्राचे गमक या रेस फॉर्म्युल्यामध्ये आहे. प्रा. लेटबटर्ली यांचे हे सूत्र भारतीय तरुण चांगल्या पद्धतीने कृतीत आणू शकतील आणि नवे नेतृत्व सर्वच क्षेत्रांमध्ये प्रभावीपणे उदयास येऊ शकेल. शेती, उद्योग, शिक्षण, आरोग्य, सामाजिक सुरक्षा या सर्वच क्षेत्रांत नव्या नेतृत्वाची गरज असून, हे नेतृत्व नव्या दिशेने जाण्यासाठी कार्य करू शकेल.

जनसंपर्क, कार्यपद्धती याबाबतीत युवकवर्ग अधिक आश्वासक कामगिरी करू शकतो. 2022 ते 2047 हा काळ स्वातंत्र्याचे अमृतपर्व म्हणून वर्णन केला जात आहे. पंतप्रधान मोदी यांनी वर्णन केलेल्या या अमृतकाळात भारताच्या भाग्योदयाची भावी स्वप्ने साकारायची आहेत. गांधीजींच्या स्वप्नातला भारत असो किंवा पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या स्वप्नातला भारत असो किंवा पंडित राममनोहर लोहिया यांच्या विचारांचा भारत असो; या सार्‍यांचे सूत्र एकच आहे, ते म्हणजे भारताचे भवितव्य तरुणांच्या हाती आहे. तरुणवर्गाला नव्या निर्णयाने देशाचे भाग्य उजळण्याचे सामर्थ्य लाभणार आहे. तेव्हा या अमृतपर्वातील खरी बैठक तरुणांचीच आहे हे लक्षात घेऊन युवावर्गाला अभ्युदयासाठी भावी काळात संधी प्राप्त करून देणे हे देशातील सर्वच राजकीय पक्षांचे कर्तव्य आहे. यादृष्टीने भारतातील सर्वच राजकीय पक्ष एक नवी राजकीय सोच किंवा विचारप्रणाली विकसित करत आहेत, ही फार मोठी समाधानाची बाब आहे. कारण, सर्वांच्या सहमतीनेच चांगले निर्णय होतात आणि हे चांगले निर्णय देशाचे भवितव्य ठरवण्यासाठी प्रेरक ठरतात.

याबाबत थोडी सावधपणाने वाटचाल केली पाहिजे. देशाच्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणावर तरुणांचा सहभाग आहे ही गोष्ट खरीच आहे; परंतु नवे आणि जुने यांच्यामध्ये समन्वयाची गरज असते. नवे नेतृत्व अधिक वेगाने पुढे जाते, तर जुने नेतृत्व मर्यादांचे भान ठेवते. तेव्हा येणार्‍या 20 वर्षांत तप्त मुशीतून सोने जसे तावून सुलाखून निघते, तसे तावून सुलाखून निघालेल्या युवाने त्यांचे स्वागत करत असताना आपण जुन्या आणि नव्यांच्या अनुभवांचे आदानप्रदान करणे गरजेचे आहे, हेही विसरता कामा नये. जुन्या राजकीय नेत्यांची कार्यपद्धती, त्यांचा साधेपणा, त्यांचे संस्कारी राजकारण, त्यांचा सेवाभाव, त्यांची त्यागसमर्पण वृत्ती हे गुण तरुणांनी त्यांच्याकडून घेतले पाहिजेत. जुन्या आणि नव्यांच्या संयोगातून म्हणजेच सुवर्णमध्यातून नवे नेतृत्व अधिक परिपक्व बनू शकेल.

– प्रा. डॉ. वि. ल. धारुरकर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news