प्रासंगिक : लढाऊ विमानाचे चिलखत | पुढारी

प्रासंगिक : लढाऊ विमानाचे चिलखत

- श्रीकांत देवळे

भारतीय लढाऊ विमाने पाडण्याचे स्वप्न यापुढे चीन आणि पाकिस्तान ही शत्रूराष्ट्रे पाहू शकणार नाहीत. कारण, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने अर्थात डीआरडीओने रडार आणि क्षेपणास्त्रांना गुंगारा देणारे असे तंत्रज्ञान विकसित केले आहे, जे लढाऊ विमानांचे सर्वांत मोठे सुरक्षा कवच मानले जाते. डीआरडीओच्या जोधपूर येथील संरक्षण प्रयोगशाळेने चॅफ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा विकास पुण्याच्या उच्च ऊर्जा संशोधन प्रयोगशाळेच्या (एचईएमआरएल) सहकार्याने केला आहे. चॅफ तंत्रज्ञान लढाऊ विमानांना शत्रूच्या रडारपासून सुरक्षित ठेवेल. या तंत्रज्ञानाचा वापर सर्वप्रथम जगुआरसारख्या लढाऊ विमानांमध्ये केला जाईल. कारण जगुआर विमानांवरच त्याची चाचणी घेण्यात आली आहे. भारतीय वायुदलाने हिरवा कंदील दाखविताच मिराज, सुखोई यांसह अन्य लढाऊ विमानांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.

जगात केवळ ब्रिटनमधील तीन कंपन्याच चॅफ तंत्रज्ञान तयार करतात. डीआरडीओकडून चॅफच्या निर्मितीसाठी हे तंत्रज्ञान स्वदेशी कंपन्यांकडे हस्तांतरित करण्यात येईल. महत्त्वाची बाब अशी की, डीआरडीओने विकसित केलेले चॅफ कार्टिलेज हे जगातील सर्वश्रेष्ठ तंत्रज्ञान आहे. यापूर्वी चॅफ तंत्रज्ञानाने युक्त विमानाचा लक्ष्यभेद रडारवर आधारित क्षेपणास्त्रे करू शकायची. परंतु; भारताच्या चॅफचा भेद करणे अशक्य आहे. म्हणजेच, या चॅफ तंत्रज्ञानामुळे भारतीय लढाऊ विमाने जगातील अन्य देशांच्या तुलनेत सर्वाधिक सुरक्षित विमाने बनतील. चॅफ हे लढाऊ विमानात बसविण्यात आलेले काऊंटर मेजर डिस्पँडिंग म्हणजे शत्रूच्या रडारवर आधारित क्षेपणास्त्रांना गुंगारा देणारे असे उपकरण आहे; जे इन्फ्रारेड आणि अँटी रडारपासून विमानाचा बचाव करते.

वस्तुतः चॅफ हे एक प्रकारचे फायबर आहे. केसापेक्षाही पातळ असणार्‍या या फायबरची जाडी अवघी 25 मायक्रॉन एवढी असते. डीआरडीओने कोट्यवधी फायबरपासून 20 ते 50 ग्रॅम वजनाचे एक कार्टिलेज तयार केले. चॅफ हे उपकरण विमानाच्या मागील भागात बसविले जाते. लढाऊ विमानाच्या वैमानिकाला जेव्हा शत्रूच्या क्षेपणास्त्राच्या हल्ल्याचा संकेत मिळतो, तेव्हा त्याला चॅफ कार्टिलेजला हवेत फायर करावे लागते. सेकंदाच्या दहाव्या भागाएवढ्या अवधीत त्यातून कोट्यवधी फायबर निघतात आणि हवेत एक अदृश्य ढग तयार करतात आणि क्षेपणास्त्र लढाऊ विमान सोडून या ढगालाच आपले लक्ष्य समजून त्याचा भेद करते आणि विमान बचावते.

डीआरडीओने चॅफ विकसित करण्यासाठी चार वर्षांची कालमर्यादा निश्चित केली होती. परंतु; अडीच वर्षांतच ते विकसित करून दाखविले. सध्या या तंत्रज्ञानाच्या आयातीसाठी आतापर्यंत वायुदलाला वर्षाकाठी 100 कोटी रुपये एवढा खर्च करावा लागत आहे. आता त्याच्या निम्म्या किमतीत वायुदलाला हे तंत्रज्ञान तर मिळेलच, शिवाय हे तंत्रज्ञान मित्रराष्ट्रांना विकण्याचा विचारही भारत करू शकतो.

चॅफ तंत्रज्ञानाचे तीन प्रकार आहेत. पहिले कमी अंतराच्या मारक क्षमतेचे चॅफ रॉकेट. याला एसआरसीआर असे म्हणतात. दुसरे मध्यम अंतराच्या मारक क्षमतेचे चॅफ रॉकेट म्हणजे एमआरसीआर. तिसरे दीर्घ पल्ल्याच्या मारक क्षमतेचे चॅफ रॅकेट म्हणजे एलआरसीआर. भारतीय नौदलाने अरबी समुद्रात आपल्या युद्धनौकांनी या तीनही प्रकारच्या रॉकेटची नुकतीच चाचणी घेतली. यावेळी या तंत्रज्ञानाची कामगिरी चांगली झाली.

रडारमधून मायक्रोवेव्ह तरंग सोडले जातात आणि त्यावरून संबंधित वस्तूची दिशा आणि स्थिती कळते. चॅफ तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रडारला गुंगारा देता येतो. असे स्वदेशी प्रकारचे तंत्रज्ञान वापरून भारत लष्करीदृष्ट्या यशस्वी होईलच. परंतु; त्याचबरोबर जागतिक दर्जाला अनुरूप तंत्रज्ञान तयार करण्यास भारत सक्षम आहे, हा आत्मविश्वासही निर्माण करेल. या तंत्रज्ञानाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी हे तंत्रज्ञान आता उद्योग क्षेत्राकडे हस्तांतरित केले आहे.

Back to top button