सुरक्षा 24 x 7 | पुढारी

सुरक्षा 24 x 7

चला बुवा. सुटलो, आता पुढचे 6 महिने तरी एक्स्प्रेस वेवरून जीव मुठीत धरून जायला नको, थोडा तरी बिनधास्त प्रवास करता येणार.
फक्त सहा महिनेच? मला तर वाटत होतं की एक्स्प्रेस वे हा प्रवाशांच्या आयुष्यभराच्या सोयीसाठी आहे.
म्हणजे बांधताना त्याच हेतूने बांधलाय म्हणा तो; पण पुढे लोकांनी एकेक नियम धाब्यावर बसवायला सुरुवात केली.
कोणते नियम?
अगदी साधेसाधे नियम हो. वेगमर्यादा पाळणं, सीटबेल्ट वापरणं, प्रवेश बंदच्या पाटीमध्येही दामटून गाडी न घालणं, वगैरे वगैरे.
नियम पाळण्याचा आळस किंवा कंटाळा असेल.
ते काहीही असो; पण त्यातून हा महामार्ग काहींचं आयुष्य संपवायचं कामही करायला लागला. म्हणून ह्या बातमीचं महत्त्व!
कोणती एवढी बातमी आलीये?
सुरक्षा जनजागृती अभियानाची बातमी.
कोण आणि कोणासाठी चालवतंय हे अभियान?
परिवहन विभाग ऊर्फ आर.टी.ओ.चालवतंय आणि योजलं आहे ते सर्वांच्या हितासाठी.
अच्छा, म्हणजे आता एक्स्प्रेस वे वरून जाणार्‍या प्रत्येक वाहनाला तारेचा पिंजरा करणार का? का एकेका वाहनाबरोबर एकेक शस्त्रधारी पोलिस आणि एकेक अ‍ॅम्ब्युलन्स जाणार?
उगाच फाटे फोडू नका हो. इरादा नेक आहे, त्याचं तोंड भरून कौतुक करा.
अवश्य करतो. सुरक्षेचं स्वागत कोण करणार नाही? पण फक्त सहाच महिने ते सौख्य मिळावं हे पटत नाही तितकंसं.
त्यासाठी केवढं नियोजन करावं लागतंय ते बघा. 30 सेप्रेट अधिकारी नेमायचे, त्यांची 12 पथकं तयार करायची, त्यांनी 24 तास महामार्गावर गस्त घालायची, थोडा का व्याप आहे?
असला तर असूदे. ते त्यांचं कामच आहे; पण जनतेचं काहीच कर्तव्य असू नये का?
ते रस्त्याचे कर, टोल टॅक्स वगैरे जे पडेल ते निमूटपणे भरतातच की!
हाच खरा प्रश्न आहे बघा. लोकांना वाटतं आपण कर भरला की, हात वर करायला मोकळे झालो; पण ते तेवढंच नसतं. कर भरला की लगेच कोणी त्याचं मालक होत नाही. रस्ता सर्वांसाठी असेल तर सर्वांनी नियम पाळूनच तो वापरला पाहिजे.
आजकाल लोकांना एवढ्या बारकाव्यात शिरायला वेळ नसतो, घाई असते.
त्यांच्यासाठीच ‘अती घाई, संकटात जाई’ वगैरे पाट्याही असतात. सावधगिरीचे इशारे असतात.
ते नियम, इशारे आपण एकट्याने पाळून थोडाच फरक पडतो राव?
करेक्ट. पण हा विचार सगळेच करतात तेव्हा फार फरक पडतो. सध्या तसाच प्रकार झालाय. कोणीच कोणतेच नियम मनावर घेत नाही.
मग तुमच्या मते ह्याला कोणापाशीच, काहीच उत्तर नाहीये का?
एक उत्तर आहे, सुरक्षेची काळजी घेणं, हमी देणं हा जगण्याचा भाग व्हायला हवा. सुरक्षा हा छंद किंवा चैन नाहीये, ही जगण्याची धाटणी आहे हे लोकांच्या मनावर बिंबायला हवं. शिर सलामत, तो पगडी पचास. सुरक्षेचा विचार क्षणोक्षणी मनात हवा. मला काय त्याचं? ही हवा डोक्यात शिरायला नको. मग अभियानाचीही गरज पडणार नाही!

  • झटका

Back to top button